अनुप्रयोग आज्ञावली (ॲप्लिकेशन प्रोग्राम, Application programme; अनुप्रयोग आज्ञांकन). वापरकर्त्यांसाठी विशिष्ट कार्ये हाताळण्यासाठी तयार केलेले सॉफ्टवेअर. असे सॉफ्टवेअर संगणकाला वापरकर्त्याने दिलेल्या आज्ञा कार्यान्वित करण्यासाठी निर्देशित करते, तसेच वापरकर्त्यासाठी डेटावर प्रक्रिया करणारी कोणतीही आज्ञावली समाविष्ट करू शकते. यामध्ये वर्ड प्रोसेसर (word processor), स्प्रेडशीट्स (spreadsheet), डेटाबेस व्यवस्थापन (Database management), वस्तुसूची आणि वेतनपट आज्ञावली (इन्व्हेंटरी अँड पेरोल प्रोग्राम्स; Inventory and Pay-roll programme) आणि इतर अनेक अनुप्रयोग समाविष्ट आहेत. अनुप्रयोग सॉफ्टवेअर हे प्रणाली सॉफ्टवेअरपेक्षा वेगळे आहे. प्रणाली सॉफ्टवेअर (System Software) मुख्यतः परिचालन प्रणालीद्वारे संगणकाच्या अंतर्गत कार्यावर नियंत्रण ठेवते. तसेच संगणकीय पटल (मॉनिटर्स; Monitor), मुद्रक (प्रिंटर; Printer) आणि साठवणूक उपकरणे (स्टोरेज डिव्हाइसेस; Storage Devices) यांसारख्या परिधींवर देखील नियंत्रण ठेवते.
याला वापरकर्ता आज्ञावली असे सुद्धा म्हटले जाते. जेव्हा आपण एक दस्तऐवज तयार करणे सुरू करताे, तेव्हा वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअरने आधीपासूनच समास, अक्षरांची शैली आणि त्यांचे आकार तसेच दोन रेषांमधील अंतर पृष्ठासाठी तयार केलेले असते. परंतु या सर्वांमधे बदल सुद्धा करू शकतो. आपल्याकडे बरेच स्वरूपन पर्याय उपलब्ध आहेत. उदा., वर्ड प्रोसेसर अनुप्रयाेग रंग, शीर्षके आणि चित्रे जोडणे किंवा काढून टाकणे, जसेच्या तसे नक्कल करणे, हलवणे आणि आपल्या गरजेनुसार दस्तऐवज स्वरूप दर्शविणे सोपे करते.
अनुप्रयोग सॉफ्टवेअरचे प्रकार : व्यवसाय, ग्राफिक्स आणि मल्टीमीडिया, होम/वैयक्तिक/शिक्षण, आणि संप्रेषण यांमध्ये अनुप्रयाेग साॅफ्टवेअर माेठ्या प्रमाणात वापरण्यात येते
१. व्यवसायिक सॉफ्टवेअर : (Business software) मायक्रोसॉफ्ट ऑफिस हा सर्वांत सुप्रसिद्ध अनुप्रयोग सॉफ्टवेअर आहे. यात वर्ड प्रोसेसिंग (वर्ड, Word), स्प्रेडशीट (एक्सेल, Excel), डेटाबेस (ॲक्सेस, Access) आणि प्रस्तुती ग्राफिक्सचा (पावर पॉईंट, Power point) समावेश आहे.
वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर मजकूर आधारित दस्तऐवज तयार करतात. यांत ज्ञापने, पत्रे यांपासून ते शोध निबंध यांचा समावेश असतो, याचाच अर्थ लेखनासाठी आवश्यक आहे, ते सर्व यामध्ये लिखित करता येते. दस्तऐवजामधे सहज सुधारणा करता येते, अक्षरांची शैली, आकार किंवा रंग, परिच्छेद शैली, शब्दओघ, शब्द लेखन यात आपल्याला हवे तसे बदल करू शकतो. आपण शब्द, वाक्य किंवा संपूर्ण परिच्छेद हलवू शकतो. तसेच या बाबींसोबतच आलेख, सारण्या किंवा चित्रे घालू शकतो.
स्प्रेडशीटमधे स्तंभ आणि पंक्तिंमध्ये डेटा (क्रमांक) आयोजित करतात आणि गणित गणना आणि फलन (पूर्व निर्धारित सूत्र) कार्यान्वित करतात. वापरकर्ते स्प्रेडशीटमध्ये स्वतःचा डेटा भरून आणि ॲप्लीकेशन प्रवेशाच्या डेटामधून नवे परिणाम तयार करण्यासाठी फलन कार्यान्वित करून त्याचा आलेख सुद्धा समाविष्ट करू शकतात.
डेटाबेस सॉफ्टवेअर स्प्रेडशीट प्रमाणेच असतात. त्यामध्ये ते टेबल (संबंधित पंक्ती आणि स्तंभ) असतात. स्प्रेडशीटच्या तुलनेत डेटाबेसमधे डेटाच्या सुलभ व्यवस्थापनासाठी आणि पुनर्प्राप्तीसाठी परवानगी सहज दिली जाते.
सादरीकरण ग्राफिक्स डेटा किंवा कल्पना सादर करण्यासाठी एक प्रभावी दृष्यात्मक साधन आहे. सॉफ्टवेअरमध्ये बार-चार्ट, पाय-चार्ट किंवा बुलेट पॉईंट सारख्या ग्राफिक्ससाठी पूर्वनिर्धारित मांडणीचा समावेश असतो. प्रत्येक पृष्ठाला एक घसर (स्लाइड; Slide) असे म्हटले जाते. घसरामधे मजकूर, चार्ट किंवा चित्रे समाविष्ट करू शकतात.
२. ग्राफिक्स आणि मल्टीमीडिया सॉफ्टवेअर : (Graphic and multimedia software) : व्यावसायिक जसे की अभियंते, वास्तुविशारद, प्रकाशक आणि ग्राफिक्स कलाकार यांना असे सॉफ्टवेअर आरेखन करण्यास मदत करते. यामधे डेस्कटॉप पब्लिशिंग सॉफ्टवेअर, पेंट/इमेज एडिटिंग सॉफ्टवेअर, क्लिप/आर्ट इमेज गॅलरी, मल्टीमीडिया ऑथरिंग टूल यांसारख्या सॉफ्टवेअरचा सुद्धा समावेश होतो.
3. घर/वैयक्तिक/शिक्षण सॉफ्टवेअर : (Home/Personal/Education software) :
४. संप्रेषण सॉफ्टवेअर : (Communication software)
विविध प्रकारांच्या अनुप्रयोग सॉफ्टवेअरमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे :
१. वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर – एमएस वर्ड, वर्ड पॅड आणि नोटपॅड
२. डेटाबेस सॉफ्टवेअर – ओरेकल, एमएस एक्सेस इ.
३. स्प्रेडशीट सॉफ्टवेअर – ऍपल नंबर, मायक्रोसॉफ्ट एक्सेल
४. मल्टीमीडिया सॉफ्टवेअर – रियल प्लेयर, मीडिया प्लेअर
५. सादरीकरण सॉफ्टवेअर – मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट, केनोट्स
६. एंटरप्राइज सॉफ्टवेअर – ग्राहक संबंध व्यवस्थापन प्रणाली
७. माहिती कामगार सॉफ्टवेअर – दस्तऐवजीकरण साधने, स्रोत व्यवस्थापन साधने
८. शैक्षणिक सॉफ्टवेअर – शैक्षणिक सॉफ्टवेअर शब्दकोश : एन्कार्टा, ब्रिटानिका मॅथॅटिकल
पहा : व्यावसायिक अनुप्रयोगडेटा.
संदर्भ :
- https://www.coursehero.com/file/p50ruob/There-are-four-categories-of-application-software-business-graphics-and/
- https://www.educba.com/what-is-application-software-its-types/
समीक्षक : विजयकुमार नायक