वनस्पतीचे खोड आणि मूळ यांच्या बाह्य आवरणाला साल म्हणतात. जून्या झाडाच्या सालीच्या आतील आवरणात जिवित ऊती असतात, मात्र बाह्य आवरणातील म्हणजेच खोडावरील ऊती मृत अवस्थेत असतात. जलवाहिन्या आणि रसवाहिन्या झाडाला पाणी आणि पोषकद्रव्य पुरवितात. झाडाची वाढ होऊ लागल्यावर साधारण वर्षभराने साल तयार होण्यास सुरुवात झालेली आढळते. वनस्पतींवरील अधित्वचा हा पेशींचा थर वनस्पतींना संरक्षण देतो. जून्या झाडांमध्ये; अधित्वचेचा थर, वल्कुट आणि प्राथमिक रसवाहिन्या त्वक्षा पेशींमुळे आतील ऊतींपासून वेगळ्या होतात. त्वक्षा पेशींचा थर जाड होत जातो, त्याबाहेरील ऊतींना पाणी आणि पोषकद्रव्ये पोहचत नाहीत आणि त्यामुळे त्या मृत होतात हीच झाडाची साल असते. त्वक्षा पेशींमध्ये सुबेरिन या मेदाचा थर असतो त्यामुळे ते जलरोधी बनते. वनस्पती आणि वातावरण यांच्यातील हवेचा विनिमय लहान वल्करंध्रांमार्फत होतो. जूनी साल काढून टाकल्यास अधित्वचा नवीन आवरण तयार करते.

सुबेरिन (त्वक्षी) व्यतिरिक्त झाडाच्या सालीत लिग्निन, टॅनिन आणि विविध जैवबहुवारिके या रसायनांचा समावेश असतो. सालीतील साधारण ४०% ऊतींमध्ये लिग्निन असते, जे सेल्युलोजसारख्या विविध बहुवारिक शर्करांच्या साहाय्याने वनस्पतींना यांत्रिक आधार देते. सालींमधील ऊतींमध्ये उच्च प्रमाणात असणारे टॅनिन अपघटनापासून संरक्षण देते. सूक्ष्मजीवांमुळे होणार्‍या हानीपासून सुबेरिन संरक्षण देते, त्यामुळे वनस्पतीच्या आतील संरचना सुरक्षित राहते.

दालचिनी झाडाच्या सालीचा उपयोग मसाल्याच्या पदार्थात केला जातो. त्याशिवाय अनेक झाडांच्या सालींचे विविध उपयोग आहेत. उदा., हेविया व इतर झाडांच्या सालीपासून मिळणार्‍या चीकापासून रबर तयार करतात. बदामाच्या झाडाच्या सालीतील रंगद्रव्य, रेशीम व लोकर रंगविण्यासाठी उपयुक्त असते. ओक वृक्षाच्या सालीपासून बूच मिळते. बाभूळ, चेस्टनट, हेमलॉक, ओक इ. वृक्षांच्या सालीचा उपयोग कातडी कमविण्यासाठी करतात. कॅस्केरा व क्विनीन ही औषधे कॅस्केरा सॅग्रेडा व सिंकोना वृक्षाच्या सालीपासून मिळवितात. कौरी, स्प्रूस, बाभूळ, लिंब, बदाम इ. वृक्षांच्या सालीपासून डिंक मिळतो. फ्लॅक्स व हेंप यापासून तलम तंतू मिळतात. ताग, रॅमी व केनाफ (अंबाडीचा एक प्रकार) यांच्या सालीपासून मिळणाऱ्या तंतूच्या विविध उपयोगी वस्तू बनवितात. उंबर, वड व रुई यांच्या सालीचा चीक औषधी असतो, तर नांग्या शेर व शेंड यांचा चीक विषारी असतो.

कापड, दोरी, भिंत आच्छादने, नकाशे किंवा चित्रासाठी पृष्ठभाग म्हणून वापर; याव्यतिरिक्त झाडांच्या खोडाचे पोत, आकर्षक रंग याचा उपयोग आजकाल वास्तूकलेमध्येही केला जातो.

संदर्भ : https://www.britannica.com/

समीक्षक : शरद चाफेकर