दूरस्थ संवेदन ही संज्ञा एखाद्या वस्तूशी थेट संबंध न ठेवता त्याबाबत माहिती मिळविणे, याकरिता वापरण्यात येते. या माहितीचा वापर भूगोल, जमीन सर्वेक्षण, पृथ्व‍ी-विज्ञान या विषयांसह जलविज्ञान, जीवसृष्टी, पर्यावरणशास्त्र, हवामानशास्त्र, समुद्रशास्त्र, हिमनदी विज्ञान, भूविज्ञान तर लष्करी, बुद्ध‍िमत्ता, व्यावसायिक, आर्थिंक, नियोजन आणि मानवतावादी यांच्या अनुप्रयोगात वापरण्यात येतेे.

सध्याच्या वापरात असणारा दूरस्थ संवेदन हा शब्द सामान्यत: उपग्रह किंवा विमान आधारित संवदेन तंत्रज्ञाना वापर पृथ्वीवरील वस्तू शोधण्यासाठी आणि त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी संदर्भित करतात. प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या संकेतावरून (उदा., विद्युतचुंबकीय प्रारण) पृथ्वीवरील पृष्ठभाग, वातावरण आणि महासागर यांचा यामध्ये समावेश होतो.

. निष्क्रिय संवेदक वापरून केलेले दूरस्थ संवेदन, . सक्रिय संवेदक वापरून केलेले दूरस्थ संवेदन. १, २ व ३ किरणांचे मार्गक्रमण.

दूरस्थ संवेदनाचे सक्रिय दूरस्थ संवेदक (यामध्‌ये उपग्रहाद्वारे किंवा विमानाद्वारे वस्तूवर संकेताचे उत्सर्जन करण्यात येते आणि संवेदकाद्वारे त्यांचे प्रतिबिंब घेण्यात येते; Active Remote sensor) आणि निष्क्रिय दूरस्थ संवेदक (सूर्यकिरणांचे वस्तूंवर पडल्यामुळे होणारे परावर्तन संवेदकाद्वारे संसूचित करण्यात येते; Passive Remote sensor) असे दोन प्रकार आहेत.

सक्रिय संवेदक : बहुतेक सक्रिय संवेदक विद्युतचुंबकीय वर्णपटाच्या सूक्ष्मतरंगाच्या भागामध्ये काम करतात, त्यामुळे ते विविध परिस्थितीमध्ये वातावरणात प्रवेश करण्यास सक्षम असतात.

सक्रिय दूरस्थ संवेदनामध्ये लेझर उंचीमापी (लेझर अल्टिमीटर; LASER Altimeter), लिडार (LIDAR), रडार (RADAR), स्थानन उपकरण (रेंजिंग इंस्ट्रूमेन्ट; ranging instrument),  विकीर्णनमापक (स्कॅटेरोमीटर; scatterometer), ध्वनित्र (साऊंडर; sounder) इत्यादी उपकरणांचा समावेश असताे.

निष्क्रिय संवेदक : निष्क्रिय संवेदकामध्ये विविध प्रकारांचे रेडिओमीटर आणि वर्णपटमापक यांचा समावेश होतो. दूरस्थ संवेदन अनुप्रयोगामध्ये वापरले जाणारे बहुतेक निष्क्रिय प्रणाली विद्युतचुंबकीय तरंगाच्या (Spectrum) दृश्यअवरक्त, तापयी अवरक्त आणि सूक्ष्मतरंग या भागांमध्ये कार्य करतात.

निष्क्रिय संवेदकामध्ये त्वरणमापी (ॲक्सलरोमीटर; accelerometer), हायपरस्पेक्टरल रेडिओमापक (Hyperspectral rediometer), इमेजिंग रेडिओमीटर (Imaging radiometer), रेडिओमापक (रेडिओमीटर; Radiometer), ध्वनित्र (साऊंडर; sounder), वर्णपटमापक (स्पेक्टरोमीटर; spectrometer), स्पेक्टरोरेडिओमीटर (Spectroradiometer) इत्यादी उपकरणांचा समावेश होतो.

दूरस्थ संवेदन सॉफ्टवेअर

दूरस्थ संवेदन सॉफ्टवेअर हे एक अनुप्रयोग सॉफ्टवेअर आहे. यामध्ये संवेदकात प्राप्त झालेल्या माहितीवर प्रक्रिया करण्यात येते. दूरस्थ संवेदनाचे हे अनुप्रयोग आलेखिकी सॉफ्टवेअर सारखे काम करतात. परंतु आलेखिकी सॉफ्टवेअरपेक्षा ते उपग्रहापासून किंवा विमानाद्वारे प्राप्त माहितीवर भौगोलिक माहिती निर्माण करण्यास सक्षम असतात.

या सॉफ्टवेअरमध्ये विशेषीकृत फायलींचे स्वरूप असते, प्रतिमांची भौगोलिक माहिती आणि संवेदक मेटाडाटा संग्रहीत करणारे संवेदक त्यात असतात. लोकप्रिय दूरस्थ संवेदन फाइल आराखड्यामध्ये जीईओ टीआयएफएफ (GeoTIFF), एनआयटीएफ ( NITF), जेपीईजी 2000 (JPEG 2000), ईसीडब्ल्यू (ECW), एमआरएसआयडी (MrSID), एचडीएफ (HDF) आणि एनइटीसीडीएफ (NetCDF) या फायलींचा समावेश आहे.

दूरस्थ संवेदन सॉफ्टवेअरच्या आधारे खालील वैशिष्ट्यपूर्ण बदल करता येतात :

ओळख बदलविणे : एकाच क्षेत्राच्या वेगवेगळ्या वेळी घेतलेल्या प्रतिमांमध्ये झालेला बदल निश्चित करणे .

लंब विशोधन किंवा लंब दुरुस्ती : प्रतिमेला पृथ्वीवरील त्यांच्या स्थानपरत्वे बदल करणे.

वर्णपटीय विश्लेषण : विद्युतचुंबकीय वर्णपटाच्या न-दिसणाऱ्या भागांवरून एखादे वन घनदाट आहे किंवा नाही यांची माहिती घेणे.

प्रतिमेचे वर्गीकरण : विविध भू-आच्छादन वर्गांमध्ये प्रतिबिंबाच्या आधारावर चित्रबिंदूंचे (पिक्सेल; pixel) वर्गीकरण करणे (उदा. पर्यवेक्षी वर्गीकरण, अपर्यवेक्षी वर्गीकरण आणि वस्तू-अभिमुख वर्गीकरण)

जीडीएएल (GDAL; Geospatial Data Abstraction Library ) आणि ओएसएसआयएम (OSSIM; (Open Source Security Information Management) सारख्या सामान्य दूरस्थ संवेदन साधनांचा वापर करून अनेक दूरस्थ संवेदनाचे अनुप्रयोग तयार केले जातात.

दूरस्थ संवेदन सॉफ्टवेअर खालील प्रमाणे : जिओमॅटिका (Geomatica), पीसीआय जिओमॅटिक्स (PCI Geomatica), सागा जीआयएस (SAGA GIS; System for Automated Geoscientific Analyses;  एसएजीए जीआयएस-मुक्त स्रोत), टीएनटीएमआयपीएस (TNTmips), ईआरडीएएस इमॅजिंग (ERDAS IMAGINE), एन्व्ही (ENVI; ईएनव्हीआय), गुगल पृथ्वी (Google Earth; गुगल अर्थ), ग्रास जीआयएस (GRASS GIS; Geographic Resources Analysis Support System), ओपनईव्ही (OpenEV-मुक्त स्रोत), OPTICKS (ऑप्टिक्स; मुक्त स्रोत), रिमोटव्ह्यू (RemoteView), आयडीआरआयएसआय (IDRISI), इकोग्निशन (ECognition), आर्कजीआयएस (ArcGIS), स्नॅप (SNAP) इत्यादी.

दूरस्थ संवेदनाचे शेती, आपत्तीची देखरेख आणि उपशमन, सर्वेक्षण आणि शहरी नियोजन, जल संसाधन व्यवस्थापन, पर्यावरण निरीक्षण, राष्ट्रीय अवकाशासंबंधी माहितीची पायाभूत सुविधा, पायाभूत विकास योजना आणि देखरेख, खनिज संशोधन, दूरसंचार, समुद्र किनाऱ्यावरील जैवविविधतेची पाहणी करणे (Coastal Eco-System Monitoring), सैन्य दलामध्ये सुरक्षिततेसाठी आणि माहिती मिळविणे, जैव विविधतेच्या संरक्षणासाठी, पुरातत्त्व /प्राचीन अवशेषांच्या संशोधनासाठी, हवामान विभागासंदर्भात माहिती मिळविणे इत्यादी विविध क्षेत्रात अनुप्रयोग करण्यात आलेले आहे.

संदर्भ :

 समीक्षक : विजयकुमार नायक