जेव्हा एका देशात खरेदी केलेली वस्तू-सेवा दुसऱ्या देशात उत्पादनासाठी पाठविण्यात येते, तेव्हा त्या वस्तू-सेवाच्या हस्तांतरणावर आकारण्यात येणाऱ्या किमतीला बदली किंमत किंवा हस्तांतरण किंमत असे म्हणतात. त्याच प्रमाणे एका देशात खरेदी केलेला कच्चा माल दुसऱ्या देशात पाठवून तेथे तो उत्पादनासाठी वापरला जाईल अशा पद्धतीने वस्तूंचे/कच्च्या मालाचे/सेवांचे/भांडवलांचे हस्तांतरण होत असताना जी किंमत आकारली जाते, तिला बदली किंमत किंवा हस्तांतरण किंमत असे म्हणतात. आधुनिक काळातील उद्योगसंस्थांचा जन्म साधारणपणे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून झाला असे मानले जाते. नवीन तंत्रज्ञान, मर्यादित जबाबदारीचे तत्त्व व आधुनिक व्यवस्थापन संकल्पनांचा उदय यांमुळे अशा उद्योगसंस्थांची संख्या वाढू लागली. उत्पादनसंस्थांचा आकारही वाढू लागला. नवनवीन व्यवसाय करणे, अनेक देशांमध्ये व्यवसायाचा विस्तार करणे यांमुळे एक एक उत्पादनसंस्थेचा आकार व त्या संस्थेची उलाढाल अवाढव्य बनली. बहुराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या काही उत्पादनसंस्थांची उलाढाल अनेक देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नांच्या बेरजेहूनही अधिक भरेल, अशी एकविसाव्या शतकातील स्थिती आहे; परंतु असा व्यवसाय करीत असताना त्यावर काही मर्यादाही पडतात. उदा., त्या मोठ्या उत्पादनसंस्थेतील प्रशासकीय धोरणे, निर्णय कळविण्यात गफलती-चुका-विलंब झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते. यासाठी अशा विशाल उत्पादनसंस्थांची विभाग, परिक्षेत्र, उपविभाग अशी विभागणी केली जाते. काही वेळेस अशी विभागणी एखादी उपकंपनी स्थापन करून केली जाते, तर काही वेळेस ती कागदोपत्री राहते.
उत्पादनसंस्थेचे सर्वसाधारण उद्दिष्ट नफ्याचे महत्तमीकरण करण्याचे असले, तरी प्रत्यक्षात हे धोरण अमलात आणताना अनेक अडचणी येतात. विविध प्रांतांमध्ये किंवा देशांमध्ये कारभार असणाऱ्या उत्पादन संस्थांना हे अधिक प्रकर्षाने जाणवते. उदा., तयार कपड्यांचे उत्पादन करणारी कंपनी विविध देशांमध्ये विविध किमतींना स्थानिक बाजारातून कापड खरेदी करेल. त्या कच्च्या मालाच्या किमती एकसारख्या नसतील. उत्पादन खर्चाची मोजदाद करणे किंवा अंतिम विक्री किंमत ठरविणे यांसाठी अशा बदली किमतीच्या निश्चितीची आवश्यकता असते. एकाच उत्पादनसंस्थेच्या विविध विभागांमध्ये ही किंमत बहुतेक वेळेस कागदोपत्री हिशेबात दाखविण्यापुरती राहते. त्या त्या विभागांना किंवा उपकंपन्यांना किमती ठरविण्याची मोकळीक किंवा स्वायत्तता दिली जाते. ती तो विभाग किंवा परिक्षेत्र कितपत नफा कमवीत आहे, त्याचे कामकाज फायदेशीर आहे किंवा नाही, त्या विभागाकडून उद्योगसंस्थांची सर्वसाधारण उद्दिष्टे गाठली जात आहेत किंवा नाही हे सर्व ठरविण्याचे एक गमक म्हणून बदली किंमतीकडे पाहिले जाते. वस्तूच्या अंतिम किमतीनुसार उत्पादनसंस्थेचा नफा ठरतो, त्यानुसार उत्पादनसंस्थेचा नावलौकिक ठरते. त्यामुळे या बदली किमतीस कमालीचे महत्त्व प्राप्त होते.
अनके देशांमध्ये वस्तूच्या विक्री किमतीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रणे असतात. त्याबद्दलचे विवाद सोडविताना बदली किमतीची प्रक्रिया, विश्लेषण, आकारणी विचारात घेतली जाते. तेथेही बदली किंमत निश्चितीचा विचार करावा लागतो. जर कच्चा माल स्पर्धात्मक बाजारात विकला जात असेल, तर बाजारात त्याची किंमत परस्पर ठरविली जाते आणि खुल्या बाजारातील किमतीला अनुलक्षून कच्च्या मालाच्या किमतीची जुळणी केली जाते. तेथे फारशा अडचणी येत नाहीत; पण जेथे बाजार अपूर्ण असतो, तेथे किंमत ठरविण्याची शक्ती त्या विभागाच्या किंवा उपकंपनीच्या हातात असते. मक्तेदारीची मात्रा व तुलनात्मक सौदाशक्ती हे लक्षात घेऊन किमती ठरविल्या जातात. येथे नेमका वाद निर्माण होऊ शकतो. उदा., अनेक देशांमध्ये औषधांच्या किमतींवर थोडेफार नियंत्रण आहे; पण औषधांसाठी जी रसायने किंवा मिश्रणे वापरतात, त्यांच्या किमतींवर औषधांची किंमत ठरविली जाते. या कच्च्या मालाचा अपूर्ण बाजार असेल किंवा त्या बाजाराचे मक्तेदारीसदृश स्वरूप असेल, तर स्पर्धात्मक बाजारापेक्षा जास्त किंमत आकारली जाते. किमतीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा यावर आक्षेप घेऊ शकते. जास्त किमतीचे समर्थन मागितले जाते. हे वाद न्यायालयामध्येही जातात.
बदली किंमत ही अधिक नफा मिळविण्याचा एक मार्ग आहे, असे म्हटले जाते. नफ्याच्या बरोबरीने बाजारातील हिस्सा वाढविणे, उत्पादनसंस्थेचे ख्यातीमूल्य वाढविणे, निर्याती वाढविणे अशाही उद्दिष्टांचा पाठपुरावा उत्पादनसंस्था करते. अशा वेळी बदली किंमत या मार्गाचा उपयोग करून विक्री वाढविणे, व्यवसाय वाढविणे, उत्पादनसंस्थेचा वृद्धीदर वाढविणे अशा प्रकारची उद्दिष्टे साधली जाऊ शकतात.
देशातील कर व्यवस्थेला तोंड देण्यासाठी बदली किंमत या साधनाचा उपयोग करता येतो. जर कर पातळी उच्च असेल, तर अल्प बदली किंमत आकारली जाते. जर आयात शुल्क मूल्याधारित असेल, तर बदली किंमत अल्प ठेवली जाते. त्यामुळे कराचा बोजा कमी होतो. जर कर पातळी खालच्या स्तरावरची असेल, तर उच्च बदली किंमत आकारली जाते.
विक्री किंमत, नफा पातळी, कराचे दायीत्व, उत्पादनसंस्थेचे उत्पन्न अशा प्रकारचे सर्व महत्त्वाचे निकष ठरविण्यासाठी बदली किमतीच्या लवचिक साधनाचा नेहमी उपयोग केला जातो.
संदर्भ :
- Mehta, P. L., Sultan Chand & Sons, Managerial Economics, New Delhi, 2013.
- Mithani, D. M.; Dastane, S. R., Managerial Economics, Mumbai, 2009.
समीक्षक : संतोष दास्ताने