गरीबी, आर्थिक अडचण, अज्ञान, नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे शिक्षणापासून वंचित असणाऱ्या; मात्र शिकण्याची इच्छा असणाऱ्या मुलांना रात्रीच्या वेळी शिक्षणाची संधी देणारी शाळा म्हणजे रात्रशाळा. समाजात आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करत शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी आहेत. त्यासाठी त्यांना कोणाचा तरी आधार असतो; मात्र काही मुलांना शिकण्याची इच्छा असूनसुद्धा अनेक कारणांमुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही. अशी मुले शिकण्याच्या जिद्दीपोटी एकाच वेळी शिक्षण आणि काम अशी दुप्पट मेहनत घेतात आणि रात्रशाळेत आपल्या शिक्षणाची इच्छा पूर्ण करत असतात. दिवसभर नोकरी करून रात्री शिक्षण घेण्याची संधी रात्रशाळेमुळे गरजू विद्यार्थ्यांना मिळते.

रात्रशाळा ही संकल्पना मुख्यत्वे महाराष्ट्रातच असल्याचे आढळून येते. महात्मा जोतिराव फुले यांनी इ. स. १८५५ मध्ये पुणे येथे पहिली रात्रशाळा सुरू केली. तसेच गरीब, गरजू, कष्टकरी विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षण मिळावे या उद्देशाने ब्रॅडले यांनी इ. स. १८६६ मध्ये मुंबई येथे रात्रशाळा सुरू केली. इ. स. १९४७ ते १९९३ दरम्यान औद्योगिक शहरात व गिरणगावात रात्रशाळेचा प्रसार झाला. विद्यार्थ्यांची गरज ओळखून रात्र कनिष्ठ महाविद्यालय आणि रात्र महाविद्यालये ही रात्रशाळांना जोडून सुरू करण्यात आली. महाराष्ट्रात सुमारे १७५ रात्रशाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्याये आहेत. त्यांपैकी सुमारे १३० रात्रशाळा, सुमारे १७ कनिष्ठ महालिद्यालये आणि सुमारे ३ वरिष्ठ महाविद्यालये हे मुंबईमध्ये असून येथील सुमारे १५ हजार विद्यार्थी आणि संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे २० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

रात्रशाळेचे महत्त्व :

  • रात्रशाळेमुळे शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचले आहे.
  • रात्रशाळेमुळे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दिवसभर नोकरी करून रात्री शिक्षण घेण्याची संधी मिळते.
  • रात्रशाळेमुळे कष्टकरी विद्यार्थ्यांचे जीवन बदलत आहे.
  • रात्रशाळेमुळे साक्षरतेचे प्रमाण वाढण्यास साह्य होते.
  • रात्रशाळा ही एक प्रकारची मुक्त शाळा असल्यामुळे या शाळेत प्रवेश घेण्यास वयाचे बंधन नसते.
  • रात्रशाळेत विद्यार्थ्यांना इतर शाळांप्रमाणेच सुविधा पुरविली जातात इत्यादी.

रात्रशाळेतील शिक्षक अनुभवी आणि विद्यार्थ्यांना समजावून शिकविणारे असतात. रात्रशाळेत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, उत्तम प्रकाशयोजना, स्वच्छ परिसर असतो. त्यामुळे रात्रशाळेत आनंददायी वातावरण असते आणि विद्यार्थी हसतखेळत अध्ययन करीत असतात. रात्रशाळेचा पट उंचविण्यासाठी अभ्यासक्रमात मदत करण्यासाठी काही एन. जी. ओ. कार्यरत असतात. ते रात्रशाळा दत्तक घेतात आणि तेथे येणाऱ्या अडचणी सोडवत असतात. या सर्वांमुळे रात्रशाळा अनेक विद्यार्थांना वरदान ठरत आहेत. रात्रशाळेत शिक्षण घेऊन अनेकजण सरकारी सेवेत उच्च पदावर कार्यरत आहेत; तर काहीजण राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे.

रात्र शाळेच्या समस्या :

  • शिक्षकांचे प्रलंबित वेतन आणि शाळांना शासनाकडून मिळणारे अनुदान न मिळणे.
  • रात्रशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रवास करण्यासाठी वाहनांची उपलब्धता नसणे.
  • स्वत:च्या वाहन वापरामुळे आर्थिक भूर्दंड.
  • शासनाकडून प्रवासभत्ता नसणे.
  • रात्रशाळा परिसरात काम न मिळाल्याने कामासाठी वस्त्यांचे स्थलांतर होणे आणि त्यामुळे विद्यार्थीसंख्या कमी होणे.
  • पट वाढण्यासाठी वाढलेल्या वस्तीच्या ठिकाणी रात्रशाळा स्थलांतरित करण्यास परवानगी मिळणे.
  • रात्रशाळेत शिक्षकेतर कर्मचारी अत्यल्प असल्यामुळे चपराशापासून मुख्याध्यापकापर्यंतचे सर्व काम शिक्षकालाच करावे लागल्यामुळे अध्यापनाकडे दुर्लक्ष होणे.
  • रात्रशाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय यांमधील विद्यार्थीसंख्येची सरासरी उपस्थिती पुरेशी नसणे.
  • रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणारे सर्व शैक्षणिक साहित्य व सेवा-सुविधा न मिळणे.
  • मुली व स्त्रीयांसाठी रात्रीचा वेळ धोक्याचा इत्यादी.

रात्रशाळा ही काळाची गरज असून शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना पुन्हा शिक्षण प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी ती एक उत्तम पर्याय आहे.

समीक्षक : के. एम. भांडारकर