प्राथमिक शिक्षण हे बालकांच्या भविष्याचा पाया आहे. प्राथमिक शिक्षण व मूल्य शिक्षण यांमुळे बालकांवर प्रत्यक्षपणे चांगले संस्कार घडत असतात. त्यामुळे शासनाने सर्व प्राथमिक शाळांच्या अभ्यासक्रमामध्ये सुरुवातीचे २० मिनिटे शैक्षणिक परिपाठास दिले आहे. दैनंदिन शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेच्या पटांगणात किंवा शाळेच्या सभागृहात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित जमवून परिपाठ घेतला जातो. परिपाठासाठी संपूर्ण शाळा हा एक घटक असतो. विद्यार्थ्यांच्या वर्तनाला समाज उपयोगी निर्मळ चारित्र्याचे वळण देणे आणि त्यांच्यावर योग्य संस्कार रुजविणे हे परिपाठाचे मुख्य उद्देश आहेत. परिपाठामध्ये शाळेची सफाई, सामुदायिक राष्ट्रगीत व प्रार्थना, विद्यार्थ्यांची स्वच्छता, समूहगीत, बोधकथा, सुविचाराचे स्पष्टीकरण, दिनविशेष व बातम्या सांगणे, शैक्षणिक सूचना, मौन इत्यादी कार्यक्रम अंतर्भूत केले जातात. परिपाठामध्ये अनौपचारिक शैक्षणिक मूल्य असतात. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वभावावर, वागणुकीवर, सहकार्यवृत्तीवर, भावनिकतेवर परिणाम होऊन विद्यार्थ्यांमध्ये चांगली मूल्ये रुजली जातात.

परिपाठ कार्यवाही : राष्ट्रगीत व प्रतिज्ञा : परिपाठाची सुरुवात ही सावधान-विश्राम या सूचनेने केली जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांना ५२ सेकंदांत राष्ट्रगीत संपेल अशा पद्धतीने म्हणण्याची सूचना दिली जाते. परिपाठामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांपैकी कोणत्याही एका भाषेत एक दिवस प्रतिज्ञा घेतली जाते. जर पहिल्या दिवशी मराठीत प्रतिज्ञा घेतली असेल, तर दुसऱ्या दिवशी ती इंग्रजीत किंवा काही ठिकाणी हिंदीत घेतली जाते. शक्य नसेल, तर फक्त मराठी भाषेतच प्रतिज्ञा घेतली जाते. त्याचे नियोजन आदल्या दिवशी वर्गानुसार विद्यार्थ्यांना करण्यास सांगितले जाते. त्यानंतर एका विद्यार्थ्याला भारताचे संविधान म्हणण्यास सांगून त्याच्या मागे बाकी विद्यार्थ्यांना म्हणण्यास सांगितले जाते. काही ठिकाणी ते सामूहिक रीत्या म्हटले जाते. प्रार्थना व श्लोक हेसुद्धा विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतले जातात.

भारताचे संविधान : राष्ट्रगीत व प्रतिज्ञा झाले की, एका विद्यार्थ्याला भारताचे संविधान म्हणण्यास सागांवे आणि त्याच्या मागे सर्व विद्यार्थी म्हणतील.

दिनविशेष : आज कोणता वार-दिवस आहे? मराठी महिना, तिथी कोणती आहे? शके कोणता आहे? या सर्व गोष्टींचा उल्लेख दिनविशेष किंवा पंचागात विद्यार्थ्यांकडून करून घेतला जातो. उगवलेल्या प्रत्येक दिवशी इतिहासात शैक्षणिक, क्रांतीकारी घटना, ऐतिहासिक शोध, महान मानवांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या इत्यादी घटना घडून गेलेल्या आहेत. दिनविशेषामध्ये असे वेगवेगळे दिनविशेष विद्यार्थ्याला सांगण्याविषयी सांगितले जाते.

सुविचार व बातम्या : सुविचार म्हणजे चांगला विचार. परिपाठात विद्यार्थी सुविचार सांगतो; परंतु अनेकदा सुविचाराचा अर्थ लहान विद्यार्थ्यांना समजत नसल्यामुळे शिक्षकांकडून त्याचे थोडक्यात स्पष्टीकरण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुविचाराचा अर्थ व विचार समजेल. दररोज नवनवीन शोध लागत असतात. नवनवीन कल्पना ऐकायला व पाहायला मिळतात. त्यांपैकी ज्या बातम्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या असतील, शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या असतील, संस्कार घडण्यासाठी चांगल्या असतील अशा बातम्या विद्यार्थ्यांना सांगण्यास किंवा वाचून दाखविण्यास सांगावे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सध्या राज्यात, देशात व जगात काय घडत आहे, त्याचे ज्ञान मिळेल.

प्रश्नमंजुषा : परिपाठामध्ये विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढविणारे, समाजातील अंधश्रद्धा कमी करण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण वाढविण्यासाठी प्रश्न विचारले जाते. प्रश्न हे लघू म्हजेचच एका वाक्यात उत्तर असणारी असतात. एका विद्यार्थ्याला परिपाठाच्या अगोदरच अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यासाठी द्यावेत. विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर जे विद्यार्थी देतात, त्यांचे विशिष्ट पद्धतीने टाळ्या वाजवून अभिनंदन केले जाते. जर प्रश्नांचे उत्तर विद्यार्थ्यांना आले नाही, तर त्याचे उत्तर विज्ञान शिक्षक किंवा इतर शिक्षकांकडून दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण रुजविण्यासाठी मदत होते.

शब्दवाचन व पाढे : इंग्रजी ही जगतिक भाषा आहे. विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची भिती कमी होण्यासाठी परिपाठामध्ये दररोज पाच किंवा सहा इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग व उच्चार म्हणवून घ्यावे. शक्य असल्यास त्यावरील एखादे वाक्य तयार करून दाखवावे. तसेच पाढे पाठांतरही घेता येते. परिपाठाच्या दिवशी जी तारीख असेल तो पाढा किंवा २ ते ३१ मधील कोणत्याही एका अंकाचा पाढा घ्यावा. अशा पद्धतीने परिपाठाच्या वेळेस पाढे पाठांतर करून घेतले, तर पाढ्यांसाठी वेगळा उपक्रम राबविण्याची गरज राहत नाही.

समूहगीत : परिपाठात एक विद्यार्थी किंवा शिक्षक आधी एखादे गीत म्हणतो आणि त्यांच्या पाठीमागे सर्व विद्यार्थी एकत्रितपणे ते गीत म्हणतात. आठवड्याच्या सहा दिवसांसाठी सहा वेगवेगळी अर्थपूर्ण समूहगीते निवडावी आणि ते विद्यार्थ्यांकडून पाठ करून घ्यावीत.

बोधकथा : परिपाठामध्ये एखाद्या विद्यार्थी एखादी छोटीसी बोधकथा सांगतो. त्यानंतर त्या बोधकथेचे मतितार्थ समजून सांगीतले जाते. आपलेही आचरण कसे असले पाहीजे, ते या कथेच्या शेवटी शिक्षकांकडून सांगितले जाते.

मौन : परिपाठाच्या शेवटी सर्व विद्यार्थी डोळे मिटून पसायदान म्हणतात. पसायदानानंतर एक मिनिटासाठी विद्यार्थी मौन अवस्थेत राहतात. नंतर परिपाठ कार्यक्रमाचे विसर्जन करून विद्यार्थ्यांना रांगेत वर्गात पाठविले जाते.

यांव्यतिरिक्त परिपाठामध्ये विद्यार्थ्यांचे केस, नखे, दात, कपडे यांची स्वच्छता यांकडेही शिक्षकांकडून लक्ष दिले जाते. शाळेमध्ये उपलब्ध वेळेचे योग्य नियोजन करून परिपाठ घेतला, तर विद्यार्थांमध्ये उत्साह निर्माण होऊन शैक्षणिक दिवसाची सुरुवात चांगली होते.

समीक्षक : के. एम. भांडारकर