पास्को, एडविन हॉल : (१७ फेब्रुवारी १८७८ – ७ जुलै १९४९) एडविन हॉल पास्को यांचा जन्म लंडनमध्ये झाला. शिक्षण केंब्रिजच्या सेंट जॉन कॉलेजमधे झाले. काही काळ ब्रिटनमधे नोकरी केल्यानंतर ते १९०५ मध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागात रुजू झाले. सुरुवातीलाच त्यांना कांगरा आणि सभोवतालच्या फार मोठ्या क्षेत्रात ४ एप्रिल १९०५ रोजी झालेल्या विनाशकारी भूकंपाविषयी काम करण्याची संधी मिळाली. त्याच वर्षी त्यांना ब्रह्मदेशात खनिजतेलाच्या क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यासाठी पाठविण्यात आले, कारण युरोपातील बर्‍याच तेल उद्योजकांना तेथे गुंतवणूक करायची होती. तेथील कामाचा अनुभव एडविनना खूपच उपयोगी ठरला. त्याआधारे भारतीय उपखंडातील तेलाच्या संशोधनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली. ब्रह्मदेशात काम केल्यावर, एडविन यांनी आसाम (१९१०-१९१२), पंजाब (१९१२) आणि ब्रिटिशकालीन ईशान्य सरहद्द प्रांत (१९१४-१९१५) येथे खनिजतेलासाठी संशोधन केले. १९१३ मध्ये त्यांना पर्शियन आखातातीलल कामाचा अनुभव मिळाला. त्यांचा हा सर्व अनुभव लक्षात घेऊन १९१३-१९१४ मध्ये स्लेड ऑइलफील्ड कंपनीने एडविन यांना त्यांच्याबरोबर खनिजतेलावर संशोधन करण्यासाठी निमंत्रित केले. १९२१ मध्ये ते भारतात परत आल्यावर भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने त्यांच्यावर संचालकपदाची जबाबदारी सोपवली. त्या सुमारास दगडी कोळशाच्या साठ्यांचा शोध घेण्याचे महत्त्वाचे काम सुरू होते. भूगर्भात चांगल्या दर्जाचा कोळसा नेमका कुठे असेल त्या जागा दाखवणाऱ्या तपशीलवार नकाशांची खाणमालकांना गरज होती. भूवैज्ञानिक नकाशे तयार करण्याचे तंत्र विकसित होत होते. उत्तम दर्जाच्या कोळशाचा साठा किती आहे ह्याची माहिती खाणउद्योगांऩा उपलब्ध करून देण्याला कंपनी सरकारचेही प्राधान्य होते. तंत्रज्ञानाचा दर्जा वाढवून लवकरात लवकर कोळसा खाणींचा व्यावसायिक विकास करणे आणि उत्तम दर्जाच्या कोळशाचे उत्पादन वेगाने वाढवणे यावर एडविन यांचाही कटाक्ष होता. त्यासाठी त्यांनी कोळसा क्षेत्रांचे सर्वेक्षण करणाऱ्या भूवैज्ञानिकांचा एक वेगळा चमू तयार केला, आणि त्यांच्या संशोधनाचे अहवाल प्रसिद्ध करायला प्राधान्य दिले. संचालक असतानाच एडविन यांनी इंडियन म्यूझियम या संस्थेचे विश्वस्त म्हणूनही काम बघितले. इंडियन स्कूल ऑफ माइन्स स्थापन करण्यात एडविन यांचा उल्लेखनीय पुढाकार होता. त्यांची अद्वितीय कामगिरी लक्षात घेऊन त्यांना सर हा किताब बहाल करण्यात आला. शासकीय सेवेतून ते १९३२ मध्ये निवृत्त झाले, १९३५ मध्ये त्यांची ब्रिटिश भूवैज्ञानिक सर्वेक्षण या संस्थेच्या, तसॆच अँग्लो-इराणीयन खनिजतेल कंपनीच्या भूशास्त्र समितीच्या सल्लागार समितीवर नेमणूक झाली. ३४ अभ्यास ग्रंथांचे आणि अन्य चार पुस्तकांचे ते लेखक होते. ते लंडन विद्यापीठाचे डॉक्टर ऑफ सायन्स होते. त्यांची दीर्घकाळ स्मरणात रहाणारी कामगिरी म्हणजे मॅन्युअल ऑफ जिऑलाजी ऑफ इंडिया अँड बर्मा ह्या भारतीय प्रस्तरविज्ञानावरील संदर्भग्रंथाच्या तिसर्‍या आवृत्तीचे त्यांनी केलेले संपादन. दुर्दैवाने तो ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला. आजही भूशास्त्राचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधक हा ग्रंथ संदर्भ म्हणून वापरतात. एडविन गोल्फ आणि टेनिस खेळायचे. पुरातन वास्तू आणि इतिहास यांमधे त्यांना विशेष रुची होती. ७ जुलै १९४९ रोजी ते निवर्तले.

संदर्भ :

  • Fermor, L, L, 1949, Sir Edwin Pascoe, Nature, 4176, 817-819 pp.
  • “No. 33343”. The London Gazette (Supplement). 30 December 1927. p. 2.

समीक्षक : विद्याधर बोरकर