एहरेनबर्ग, ख्रिस्तियन गॉटफ्रीड : (१९ एप्रिल १७९५ – २७ जून १८७६) ख्रिस्तियन गॉटफ्रीड एहरेनबर्ग यांचा जन्म डेलीझ्च येथे झाला. एहरेनबर्ग ह्यांचे वडील न्यायाधीश होते. लीपझिग युनिव्हर्सिटीत एहरेनबर्ग यांनी प्रथम धर्मशास्त्राचे (Theology) शिक्षण घेतले. तद्नंतर त्यांनी वैद्यकशास्त्रात प्राविण्य मिळवले. निसर्गाचा शास्त्रशुद्ध अभ्यास, प्राणी, वनस्पतिशास्त्र व भूविज्ञानात त्यांना विशेष रुची होती. डॉक्टरेट पदवी मिळविण्यासाठी त्यांनी कवकांवर संशोधन करून प्रबंध सादर केला.
विलहेल्म हेम्परिच यांच्याबरोबर इजिप्त, लिबिया, नाईल वॅली, लाल समुद्र व इतर पूर्व-मध्य भागात शास्त्रोक्त मोहिमेवर जाऊन त्यांनी हजारो प्राणी, पक्षी व वनस्पतींचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर सिरिया, अरेबिया व ॲबिसिनिया येथे जाऊनही त्यांनी संशोधन चालू ठेवले. परतल्यावर त्यांनी प्रवाळ व कीटकांवर अनेक शोधनिबंध लिहिले. तसेच सिंबोले फिजिके (Symbolae physicae) नावाचा ग्रंथ दोन खंडात लिहिला. ज्यामध्ये पक्षी, कीटक व सस्तन प्राण्यांबद्दल सखोल माहिती प्रसिद्ध केली.
बर्लिन युनिव्हर्सिटीत एहरेनबर्ग प्रोफेसर म्हणून रुजू झाले. नंतर दोन वर्षांनी मित्र हंबोल्ट याच्याबरोबर पूर्व-रशिया ते चीन हा प्रांत पालथा घालून त्यांनी जीवसृष्टीचा शास्त्रोक्त अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी आपले लक्ष सूक्ष्मजीवांच्या अभ्यासाकडे वळवले. तब्बल २० वर्षे दगड, माती, धूळ, पाणी व त्यातील गाळ यांची सूक्ष्मदर्शकाखाली कसून तपासणी चालू ठेवली व हजारो प्रकारच्या नवनवीन जीवाणूंबद्दल उचित माहिती शोधून काढली, जी तोवर अज्ञात होती. आदिजीवसंघ (protozoa) या जातीमधील विविधप्रकार व उपप्रकार – पॅरामिशियम (Paramoecium), यूग्लीना (Euglena), डायाटम्स (Diatoms), फोरॅमिनिफेरा (Foraminifera), डायनोफ्लॅजेलेट्स (Dinoflagellates) ह्यांचे वर्गीकरण केले. जीवाश्मांचा शोध त्यांनी लावला आणि जवळपास ४०० शोध निबंध लिहिले.
भूविज्ञानशास्त्रातसुद्धा त्यांना रस होता. विविध प्रकारच्या भूरचना गोड्या व खार्या पाण्यामुळे होणारे खडकावर व जीवसृष्टीवरील परिणाम यांत त्यांना विषेश रस होता. नैसर्गिक उत्क्रांतीच्या दरम्यान जल, स्थल यांमध्ये होणार्या बदलात ह्या सूक्ष्मप्राणी व जीवांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. समुद्रात आढळणार्या, काजव्यासारख्या लुकलुकणार्या प्राण्यांचाही त्यांनी अभ्यास केला.
रॉयल स्वीडिश अकॅडेमी ऑफ सायन्सेस व रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे सभासद होण्याचा बहुमान त्यांना लाभला. त्यांना वोलॅस्टन मेडल हा जियालॉजिकल सोसायटी ऑफ लंडनने प्रदान केलेला सर्वोच्च बहुमान मिळाला. एहरेनबर्ग यांनी अमेरिकन अकॅडेमी ऑफ आर्ट्स ॲन्ड सायन्सेसचे परदेशी सदस्यत्त्व मिळाले. शेवटपर्यंत त्यांनी समुद्रातील व भूगर्भावरील सूक्ष्मजीवांचा सूक्ष्मदर्शकाद्वारे अभ्यास चालूच ठेवला. एहरेनबर्ग यांच्या मृत्युनंतर बर्लिन युनिव्हर्सिटीच्या संग्रहालयात अभ्यासलेले नमुने जतन करून ठेवण्यात आले. एहरेनबर्ग कलेक्शन अंतर्गत ४०,००० नमुने, त्यांनी रेखाटलेली जीवजंतुंची अंदाजे ५००० चित्रे, पत्रव्यवहार व शोधनिबंध पहायला मिळतात. तसेच विविध प्रकारचे विंचू व तत्सम प्राण्यांचाही त्यात समावेश आहे.
लूवेनहॉक मेडल जिंकणारे ते पहिले शास्त्रज्ञ होत. त्यांच्या जन्मगावी डेलीझ्चमध्ये एका उत्तम शाळेलाही त्यांचे नाव देण्यात आले आहे. स्वालबार्ड द्वीप समूहातील (Svalbard archipelago) एका बेटालाही त्यांचे नाव देण्यात आले आहे.
बर्लिन येथे त्यांचा मृत्यु झाला.
संदर्भ :
समीक्षक : रंजन गर्गे