ओहम, जॉर्ज सायमन : ( १६ मार्च १७८९ – ६ जुलै १८५४) जॉर्ज सायमन ओहम यांचा जन्म जर्मनीच्या बव्हेरियामधील एरलांगेन येथे झाला. त्यांच्या वडलांनी त्यांना गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयातील उच्च पातळीचे शिक्षण दिले. नंतर त्यांना स्वित्झर्लंडला पाठविले. तिथल्या शाळेत त्यांनी गणित शिक्षकाची नोकरी धरली. शिवाय गणिताचा खासगीत अभ्यास केला. एरलांगेन विद्यापीठात त्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली. गणिताचे प्राध्यापक म्हणून ते तेथेच काम करू लागले. बव्हेरियन सरकारतर्फे नंतर ते बामबेर्क येथील शाळेत भौतिकशास्त्र व गणित शिकवू लागले. कलोन येथील जेझुंइट्स कॉलेजातही ओहमनी दोन्ही विषय दहा वर्षे शिकवले. तेथील प्रयोगशाळा चांगली होती म्हणून ओहमनी तिथे भौतिकशास्त्रातील प्रयोग करण्यास सुरुवात केली. विद्युतमंडलाचा आणि त्यातून वहाणाऱ्या विद्युत् प्रवाहाचा त्यांनी तपशीलवार अभ्यास केला. या त्यांच्या कामावर आधारित ‘गॅल्व्हानिक विद्युतमंडलावरचे गणितीय संशोधन’ अशा शीर्षकाचे पुस्तकही त्यांनी प्रसिद्ध केले. मात्र त्यांच्या महाविद्यालयाने व संशोधकांनी त्यांच्या या कार्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे ओहमनी कलोन येथील महाविद्यालयाचा राजीनामा दिला. बव्हेरियाच्या राजाने ओहम यांची योग्यता जाणून त्यांना न्यूरेंबर्ग येथील पॉलिटेक्निक स्कूलमधे प्राध्यापकाची जागा देऊन त्यांचा सन्मान केला. पुढे म्यूनिक विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली.
विद्युतधारा म्हणजे वाहकातील इलेक्ट्रॉनचा प्रवाह. जेव्हा वाहकातील इलेक्ट्रॉन्स एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे गतिमान होतात तेव्हा ते इतर इलेक्ट्रॉन्स आणि वाहकातील अणू व आयन यांच्यावर आदळतात. त्यामुळे इलेक्ट्रॉनच्या प्रवाहास अडथळा निर्माण होतो. विद्युतप्रवाहास अडथळा निर्माण करण्याच्या वाहकाच्या या गुणधर्माला विद्युतरोध असे म्हणतात. ज्या पदार्थाना अत्यंत कमी विद्युतरोध असतो त्यांना विद्युतवाहक म्हणतात. उदा., चांदी, तांबे. बहुतेक सर्व धातू, आपले शरीर, पृथ्वी, ग्रॅफाइट, इत्यादी. या सर्व पदार्थातून विद्युतप्रवाह सहजतेने वाहतो. म्हणून या पदार्थांना विद्युतवाहक म्हणतात. वीज वाहून नेण्यास बहुधा तांब्याच्या तारेचा उपयोग करतात. शुद्ध पाणी हे विद्युतवाहक नाही. पण त्यात एखादा क्षार अथवा आम्ल मिसळल्यास तो द्राव विद्युतवाहक होतो. काही पदार्थातून विद्युतधारा वाहूच शकत नाही. म्हणजे त्यांच्या अंगी सर्वात जास्त विद्युतरोध असतो. त्यांना विद्युतविरोधक किंवा विसंवाहक म्हणतात. उदा., रबर, कोरडे लाकूड, काच, मेण, अभ्रक, एबोनाइट. जे पदार्थ उत्तम विद्युतवाहक आहेत तेही विजेच्या प्रवाहाला विरोध करतातच, पण कमी प्रमाणात. वाहकाची भौतिक स्थिती (लांबी, काटछेदी क्षेत्रफळ, तापमान आणि पदार्थ) कायम असताना वाहकातून वाहणारी विद्युतधारा त्या वाहकाच्या दोन टोकातील विभवांतराशी समानुपाती असते. याला ‘ओहमचा नियम’ म्हणतात.
जर वाहकातून वाहणारी विद्युतधारा 𝙸 आणि त्याच्या दोन टोकातील विभवांतर V असेल तर,
यामध्ये R हा रोध असून दिलेल्या वाहकासाठी तो स्थिर असतो. एस.आय. पद्धतीत रोधाचे एकक ओहम (𝛀)आहे.
वाहकाचा रोध (R) हा त्या वाहकाच्या लांबीच्या (𝓁) समप्रमाणात असतो तर त्याच्या काटछेदाच्या क्षेत्रफळाच्या (A) व्यस्त प्रमाणात असतो.
𝟈 हा स्थिरांक आहे. या स्थिरांकास वाहकाची रोधकता किंवा विशिष्ट रोध असे म्हणतात. एस.आय.पद्धतीत रोधकतेचे एकक ओहम-मीटर आहे. रोधकता हा पदार्थाचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहे. निरनिराळ्या पदार्थांची रोधकता भिन्न असते. चांदीची रोधकता १.६० x १०-८ ओहम-मीटर आहे तर लोखंडाची रोधकता १० x १०-८ ओहम-मीटर आहे. रोधकांचा उपयोग परिपथातून जाणारी विद्युतधारा नियंत्रित करण्यासाठी होतो. जिथे जिथे वीज वाहून नेणाऱ्या तारांचा संबंध येऊ नये अशी गरज असते तिथे तिथे विद्युतविरोधक वापरावाच लागतो.
विद्युतपरिपथामधील विद्युतप्रवाह, वाहकाच्या दोन टोकांमधील विद्युतविभवांतर व वाहकात होणारा विद्युतविरोध यांच्यातील परस्परसंबंध ओहमच्या नियमामुळे समजले. याशिवाय द्रवपदार्थाची विद्युतसंवाहकता, ध्वनीविज्ञान व प्रकाशकी या विज्ञानशाखेतही ओहम यांनी संशोधन केले. त्यांच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन अखेरीस लंडनच्या रॉयल सोसायटीने ओहम यांना कॉप्ली पदक दिले. त्यांना सोसायटीचे परदेशी सदस्यत्वही दिले. ओहम यांनी रोध आणि रोधकता याबाबत केलेल्या महत्त्वाच्या संशोधनाबद्दल विद्युतरोध मोजण्याच्या एककाला ओहम हे नाव देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
संदर्भ :
समीक्षक : सुधीर पानसे