पेट्री, जुलिअस रिचर्ड : (३१ मे, १८५२ ते २० डिसेंबर, १९२१) जुलिअस पेट्री यांचा जन्म जर्मनीतील बार्मेन येथे झाला. जीवाणूशास्त्रज्ञ रॉबर्ट कॉख यांचे सहाय्यक म्हणून ते काम करत असतांना त्यांनी जीवाणूंच्या वाढीसाठी एक काचेची झाकण असलेली बशी (growth container) बनविली व त्या उपकरणाच नाव जुलिअस पेट्रीच्या नावावरून पेट्री डिश असे ठेवण्यात आले. प्राथमिक व उच्चतर शालेय शिक्षणानंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्याचे ठरवले. त्यासाठी ते कैसर विल्हेल्म अकॅडेमी फॉर मिलिटरी फिझिशियन्स येथे दाखल झाले व त्यांनी वैद्यकीय पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी बर्लिन येथल्या चॅरीट हॉस्पिटल येथे सहाय्यक वैद्य म्हणून वैद्यकीय अनुभव मिळवला. पुढील सहा वर्षे पेट्री यांनी लष्करात वैद्य म्हणून काम केले. याच काळातील दोन वर्षे त्यांना खाईतलिज केझोन्थाईत्सआम्थन (Kaiserliches Gesundheitsamt) या संशोधन सुविधेत नियुक्त करण्यात आले. तिथे त्यांनी रॉबर्ट कॉख यांचा प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम केले. येथे कॉख यांच्या प्रयोगशाळेतच त्यांना जीवाणूशास्त्राबद्दल आवड निर्माण झाली. त्यांच्या या प्रयोगशाळेतील वास्तव्यादरम्यान कॉख यांच्या निर्देशनातून पेट्री यांनी एक उथळ (shallow), दंडगोलाकार (cylindrical), बंध झाकणाची (covered) संवर्धक बशी (culture dish) तयार केली ज्याला आपण पेट्री डिश किंव्हा पेट्री प्लेट म्हणून ओळखतो.
एखाद्या रोगजंतुला ओळखणे आणि त्याची स्वतंत्रपणे वाढ करणे हे त्या काळात द्रवरूप माध्यमाच्या वापरामुळे अवघड होते, कारण त्यात नको असलेले जंतुसुद्धा वाढत असत. दरम्यान रॉबर्ट कॉख यांचे मित्र वॉल्टर हेस यांच्या पत्नी फॅनी हेस यांनी घनरूप माध्यमाचा पर्याय शोधून काढला. यातूनच पेट्री यांना एका झाकण असलेल्या प्लेटची कल्पना सुचली. यात दोन हेतू साध्य झाले. या प्लेटच्या तळाशी घनरूप माध्यम ओतता आले आणि झाकण लावल्यामुळे त्या माध्यमावर नको असलेल्या जंतूंचा शिरकाव थांबला. ही प्रत्येक प्लेट म्हणजे एक स्वतंत्र प्रयोगच होता. ही प्लेट हाताळायला सोपी होती. उबवण पेटीत किंवा शीतपेटीत हलवायलादेखील सोपी होती. एकदा काम झाले म्हणजे निर्जंतुक करून दुसर्या प्रयोगासाठी ती सहजतेने वापरता येत होती.
पेट्री प्लेट अस्तित्वात येण्यापूर्वी जीवाणूंचे संवर्धन द्रवरूप माध्यमात केले जायचे. परंतु रॉबर्ट कॉख यांना घन स्वरूपातल्या संवर्धक माध्यमाच्या (solid culture medium) वापराने जीवाणूच्या अलग-अलग वसाहती (isolated colonies) मिळवण्याचा फायदा लक्षात आला. त्याच्या घन-संवर्धन माध्यम बनवण्याच्या प्रयात्नांतर्गत कॉख यांनी बटाट्याच्या चक्त्यांवर, काचपट्टीवर व बाटलीमध्ये जिलेटीनच्या ठोकळ्यांचा वापर करून पहिला. हे सगळे सुरू असताना पेट्री यांच्या लक्षात आले की जर द्रवरूप अगार माध्यमाला बशीच्या बुडाशी ओतून वरून सोप्या पद्धतीने उघड-झाक करता येईल असे झाकण लावले तर कॉख यांची कल्पना अस्तित्वात येऊ शकते व त्यांनी ते करून दाखवले.
कॉख यांच्या प्रयोगशाळेत काम करत असतांनाच पेट्रीने काच नलिकेतील अगार स्लांटवर वाढलेल्या जीवणूंचे दुसर्या पेट्री डिशवर उपसंवर्धन करत क्लोनिंग करण्याच्या पद्धतीचादेखील शोध लावला. ह्या पद्धतीचा वापर आजच्या काळातदेखील सुरू आहे. जीवाणूशास्त्रातला पेट्री यांचा सहभाग रॉबर्ट कॉख यांची प्रयोगशाळा सोडल्यानंतरपण सुरू राहिला. तीन वर्षे त्यांनी क्षयरोग्यांसाठी हवापालट करण्याचे ठिकाण चालवले. एक वर्ष त्यांनी बर्लिन येथे स्वच्छता संग्रहालयात निदेशकाचे काम केले व पुढे ते खाईतलिज केझोन्थाईत्सआम्थन येथे संचालक म्हणून परतले. त्यांच्या विविध शोधांव्यतिरिक्त पेट्री यांनी स्वच्छता व जीवाणूशास्त्र या विषयांवर जवळपास १५० शोधपत्रिका प्रकाशित केल्या आहेत.
जर्मनीतल्या झेत्स येथे पेट्री यांचे निधन झाले.
संदर्भ :
समीक्षक : रंजन गर्गे