अब्दुलाली, हुमायून : (१९ मे १९१४ – ३ जून २००१) भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ हुमायून अब्दुलाली यांचा जन्म जपानमधील कोबे या शहरात सुलेमानी बोहरा इस्माईल कुटुंबात झाला होता. हूमायून हे प्रसिद्ध पक्षीतज्ञ सलीम अली यांचे चुलत भाऊ होते. आपल्या काळातील इतर निसर्गशास्त्रज्ञांप्रमाणेच त्यांनी प्रारंभी शिकारीमध्ये रस घेतला. त्यांचे मुख्य योगदान कमी क्षेत्रावर आणि पक्षी संग्रहांवर आधारित होते. विशेषत: बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये त्यांनी आयुष्यभर काम केले.

हुमायून यांनी आपल्या अपूर्ण असलेल्या हुमायून अब्दुलाली – नॅचरलिस्ट पोर्ट्रेट अँड ट्रिब्यूट या आत्मचरित्रात (मृत्यूनंतर प्रकाशित) लिहिले आहे, की कोबे येथील इंग्रजी मिशन स्कूलमध्ये असतानाच गुराखी व पाश्चिमात्य वन्यजीवनाविषयीच्या अमेरिकन कथा वाचताना लहान वयातच त्यांची नैसर्गिक इतिहासाबद्दलची आवड विकसित झाली. अब्दुलाली कुटुंब मुंबईत परत आल्यावर हुमायून यांनी सेंट झेवियर्स हायस्कूलच्या प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला आणि नंतर सेंट झेवियर्स महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी प्राप्त करतानाच त्यांना नारायण वासुदेव पुरस्कार प्राप्त झाला होता. सेंट झेवियर्स महाविद्यालयात प्राणीशास्त्र शिकत असतानाच त्यांनी पक्षी निरीक्षण व पक्ष्यांचे नमुने गोळा करण्यास सुरुवात केली होती.

पदवीनंतर त्यांनी त्यांच्या वडलांच्या फैज आणि कंपनी या जपानला भंगार-लोहाची निर्यात करण्याच्या व्यवसायात एक वर्ष काम केले. ते त्यांचे चुलत भाऊ सलीम अली आणि इतर निसर्गप्रेमी मित्र यांच्यासमवेत प्राणी-पक्षी निरीक्षण तसेच शिकारीसाठी निरनिराळ्या ठिकाणी भ्रमंती करत. तळेगाव, नाशिक, उत्तर कर्नाटक, त्रावणकोर, भरतपूर, आसामधील मानस आणि काझीरंगा, औरंगाबाद, पश्चिम घाट आणि कान्हेरी लेण्या इत्यादी ठिकाणी त्यांनी भटकंती केली.

आपल्या आत्मचरित्रात त्यांनी त्यांच्या मुंबईतील आणि आसपासच्या साहसी कार्यांचे वर्णन केले आहे. बदके, तितर आणि वाघ यांची शिकार करणे तसेच विविध पक्षी, प्राणी, सरपटणारे आणि उभयलिंगी प्राणी शोधून काढले. सलीम अली यांनी हुमायून यांची बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये ओळख करून दिली. ते सोसायटीचे सदस्य झाले. त्यांनी आपल्या जीवनात पक्षी, साप, बेडूक आणि इतर जीवजंतूंविषयी ३५६ नोंदी प्रकाशित केल्या. त्यांनी २७० वैज्ञानिक शोधनिबंध आणि ५० पुस्तकांची परिक्षणे लिहिली आहेत. सेंट झेवियर महाविद्यालयात आणि मुंबईच्या आसपास शोधून काढलेल्या पक्षी नमुन्यांच्या आधारे सहा भागांची मालिका बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रकाशित केली.

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील ७५० राजघराणी असलेल्या प्रदेशातून वन्य जीव संरक्षण होत असे. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर अनिर्बंध चोरट्या शिकारींना ऊत आला. हुमायून अब्दुलाली यांच्या प्रयत्नाने जे. ए. सिंग या प्रमुख वन संरक्षण अधिकार्‍यांच्या सहाय्याने बॉम्बे वाइल्ड बर्ड अँड वाइल्ड ॲनिमल अ‍ॅक्ट १९५१ चा मसुदा तयार करण्यात आला. १ मे १९५३ पासून तो अंमलात आला. याच कायद्याचे पुढे वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अ‍ॅक्ट १९७२ मध्ये रूपांतर करण्यात आले. बोरिवली नॅशनल पार्कच्या शंभर चौरस किलोमीटर क्षेत्र संरक्षित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. बोरिवली नॅशनल पार्कमधून हायवे करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रकल्पाला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देऊन स्थिगिती आणली. पुढे हे काम कधीही सुरू होऊ शकले नाही. भारतातून एकेकाळी बेडकांच्या तंगड्या खाण्यासाठी निर्यात होत असत. पिकांच्या किडीवरील नियंत्रण बेडके उत्तम करतात. त्यामुळे हुमायून यांनी बेडकांच्या तंगड्या निर्यातीवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने तीन वर्षांचा संशोधन प्रकल्प पूर्ण करून शेतातील बेडकांच्या जठरामध्ये नव्वद टक्के कीटक असतात हे सिद्ध केले. त्यामुळे वन्य जीव संरक्षण कायदा १९७२नुसार राना प्रजातींच्या सर्व बेडकांना पकडण्यास, विच्छेदनास व त्यांच्या तंगड्या निर्यातीस कायमचा प्रतिबंध करण्यात आला.

पिक्नोनोटस कॅफर हुमायुनी (शुष्क प्रदेशातील लालबुड्या बुलबुल)

अमेरिकेत एके काळी ग्रे जंगल फाउल या भारतीय वन्य कोंबड्याच्या पिसांना हॅटमध्ये लावण्यासाठी मोठी मागणी होती. १९४०मध्ये त्यांनी कलकत्त्यामधून अमेरिकेत निर्यात केल्या जाणार्‍या तीन पार्सलांना पाठवण्यास प्रतिबंध करून प्रत्येक पार्सल मागे दहा हजार डॉलर दंड अ‍ॅडोबॉन सोसायटीकरवी करण्यास भाग पाडले. त्यामुळे भारतीय वन्य कोंबड्यास कायमचे संरक्षण मिळाले.

  निक्टिबॅक्ट्रकस हमायुनी (मुंबईतील रात्रसंचारी बेडूक)

त्यांनी पक्षी व काही भारतीय उपखंडातील वन्य प्राण्यांच्या वर्गीकरणाचे काम केल्याबद्दल त्यांचे नाव पुढील प्राण्यांना देण्यात आले आहे: Nyctibatrachus humayuni, निक्टिबॅक्ट्रकस हमायुनी-मुंबईतील रात्रसंचारी बेडूक (Bombay night frog); Otus alius, ओटस अलियस –निकोबार स्कूप्स घुबड (Nicobar scoops owl); Pycnonotus cafer humayuni, a desert form of the red-vented bulbul, the first bird named after him. पिक्नोनोटस कॅफर हुमायुनी – शुष्क प्रदेशातील लाल बुड्या बुलबुलची एक जात. हमायुनी अब्दुलाली यांचे नाव मिळालेला हा पहिला पक्षी आहे. Accipiter virgatus abdulali, अ‍ॅसिपिटर व्हिगॅटस अब्दुलाली – निकोबार बेसरा ससाणा (Nicobar besra sparrowhawk); Dendrelaphis humayuni, Nicobarese bronzeback tree snake डेंड्रोलेफिस हुमायुनी निकोबार ब्रॉन्झ सारख्या पाठीचा वृक्ष सर्प.

पुढे हुमायून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या कार्यकारी समितीवर निवडले गेले. काही काळाने, सलिम अली यांच्यासमवेत ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संयुक्त मानद सचिव म्हणून निवडले गेले. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामध्ये एशियन ऑर्निथोलॉजी, प्रथम पॅन-एशियन ऑर्निथोलॉजिकल काँग्रेस, कोयंबटूरमध्ये उल्लेखनीय योगदानासाठीचा पुरस्कार आणि  महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार, यांचा समावेश आहे.

त्यांचे मुंबईत निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा