फूल या पिकाची व्यापारी दृष्टीकोनातून केलेली शेती म्हणजे फुलशेती होय. फुलांच्या उत्पन्नातून आर्थिक लाभ मिळविणे हा फुलशेतीमागचा मुख्य उद्देश आहे. भारतात प्राचीन काळापासून ते आजपर्यंत मनुष्याच्या आयुष्यात फुलांना महत्त्वाचे स्थान आहे. फुले सौंदर्याचा अर्थ वाढवितात. सर्व धर्मांत फुलांना महत्त्व असून मंदीर, मशिद, चर्च, गुरुद्वार इत्यादी धार्मिक ठिकाणी फुले अर्पण केली जातात. सर्व धार्मिक विधी कार्यक्रम, वेगवेगळे सण-समारंभ इत्यादी वेळी फुलांचा वापर केला जातो. फुलांमुळे मनोवैज्ञानिक आजारातून बाहेर येण्यास मदत होते. फुलांवर अनेक साहित्य लिहिले गेले आहेत. बहुतेक हिंदू स्त्रिया शृंगार करताना फुलांचा वापर करतात. सुकलेले फुल कलेत वापरली जाते. आज अनेक ठिकाणी फुलांचा वापर होत असल्यामुळे फुलांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आहे, त्यांच्यासाठी फुलशेती हा उत्तम उत्पन्न मिळवून देणारा उद्योग ठरत आहे.
आज फुलशेती महत्त्वाचे व्यापारी पीक म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी, विशेषत: लहान शेतकरी, कमी भांडवलामध्ये फुलशेती करण्याकडे वळलेला आहे. फुलशेतीतून कमी जागेतून नियमित उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यास मदत होत आहे. फुलांचा वापर केवळ सुशोभिकरणापुरता मर्यादित नसून अनेक फुलांपासून तेल, सुगंधी द्रव्य किंवा अत्तर, गुलकंद, गुलाब जल इत्यादी उत्पादने तयार केली जातात.
- फुलशेती हा शेतीला पुरक किंवा जोडव्यवसाय आहे. यातून चांगले उत्पन्न मिळून शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा सुधारतो.
- लोकसंख्या, रुढी-परंपरा, आवडीनिवडीमध्ये बदल इत्यादींमुळे मनुष्य जीवनात फुलांचा उपयोग वाढत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस फुलांची मागणीही वाढत असल्यामुळे छोट्या फुलविक्रेत्यांपासून ते मोठ्या व्यावसायिकांचे उत्पन्न वाढत आहे.
- देशामध्ये फुलशेतीवर आधारित उद्योग स्थापित करून राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यास मदत होते.
- फुले विदेशांत निर्यात करून विदेशी चलन मिळवून आर्थिक सुधारणा होते.
- फुलांचा वापर वेगवेगळ्या उद्योगांमध्ये होत असल्याने रोजगार संधी निर्माण होते, बेरोजगारीची समस्या काही प्रमाणात सोडविता येते.
फायदे :
- फुलशेती हा व्यवसाय शाश्वत उपजीविकेसाठी लाभदायक आहे.
- पारंपारिक पिकांना जोड देऊन फुलशेतीतून वर्षभर उत्पन्न घेता येते.
- फुलशेती हा व्यवसाय कमी जागेत जास्त उत्पन्न मिळवून देते.
- फुलशेती उद्योगात स्थलांतर करण्याची आवश्यकता नसून गावातच पैसा मिळत असतो.
राष्ट्रीय फूल उत्पादन अभियान आणि पुष्प उत्पादन विकास कार्यक्रम : फुलांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मागणी विचारात घेता फूल उत्पादनाखालील क्षेत्र वाढविण्यास वाव असल्यामुळे आणि फुलशेती उद्योगाचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाकडून विविध योजना राबविण्यात येते.
- मोठ्या शहराच्या स्वभोवती हरितगृहातील तसेच हरितगृहाबाहेरील अपारंपरिक पिकांचे क्षेत्र वाढविणे.
- पारंपारिक फुलशेतीमध्ये बदल करून सुधारित व चांगले उत्पादन देणाऱ्या जातींच्या लागवडीसाठी उपयोग करणे.
- फुलांची निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने हरितगृहातील फुलांचे क्षेत्र व उत्पादन देणाऱ्या जातींच्या लागवडीसाठी उपयोग करणे.
- शेतकऱ्यांसाठी फुलांची लागवड, अद्ययावत उत्पादन आणि काढणीसंदर्भातील तंत्रज्ञाबाबत प्रशिक्षण आयोजित करणे.
नवीन बागेची स्थापना : लाभार्थी : अल्प-अत्यल्प भूधारकांकरिता क्षेत्र मर्यादा २ हेक्टर आणि इतर भूधारकांकरिता क्षेत्र मर्यादा ४ हेक्टर अशी आहे.
(अ) कट फ्लॉवर्स : हरितगृहातील आणि हरितगृहाबाहेरील अपारंपरिक पिकांचे क्षेत्र, उत्पादन व गुणवत्ता वाढविणे. यामध्ये गुलाब, ॲस्टर, बर्ड ऑफ पॅराडाईज, गोल्डन रॉड इत्यादी पिकांचा समावेश आहे.
अनुदान : अल्प-अत्यल्प भूधारकांना ५० टक्के म्हणजे कमाल ३५,००० रुपये आणि इतर भूधारकांना ३३ टक्के म्हणजे २३,९०० रुपये मिळण्याची सोय आहे.
(आ) कंदवर्गीय फुले : यामध्ये निशिगंधा, ग्लँडीओलस, लिलिज, डेलिया इत्यादी पिकांचा समावेश आहे.
व्याप्ती : व्यावसायिक फुलशेती ही एक चांगली संधी आहे. व्यावसायिक फुलझाडांची व्याप्ती ठरविणारे महत्त्वाचे घटक म्हणजे माती, हवामान, श्रम, वाहतूक आणि बाजार होय; मात्र लोकसंख्या वाढ, निवासासाठी बांधण्यात येणाऱ्या प्रचंड इमारती, त्यासाठी झाडांची कटाई इत्यादींमुळे लोकांना आता मुक्त जागा, विश्रांतीसाठी व मुलांना खेळण्यासाठी उद्याने इत्यादींसाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे अशा प्रश्नांची पूर्तता करण्यासाठी जैव सौंदर्याची योजना करणे आवश्यक आहे. म्हणून फुलबाग आधुनिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनत चालला आहे.
भारतात फुलशेती सतत बहरताना दिसत आहे. मानवाच्या दैनंदिन जीवनात फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर व मागणी होताना दिसत आहे. त्यामुळे फुलांची पत व उत्पादन वाढविण्यासाठी १९९० नंतर शेतकरी पारंपरिक फुलशेतीकडून आधुनिक व तांत्रिक अशा हरितगृहामधील फुलशेतीकडे वळले आहेत. देशात फुलांच्या उत्पन्नासाठी ऋतुनुसार लागणारे हवामान, जमीन, पाणी इत्यादी उपलब्ध साधनांमुळे फुलशेतीला इतर पिकांच्या मानाने चांगले दिवस येत आहेत. आधुनिकीकरण, जागतिकीकरण आणि नवीन बीजधोरण यांमुळे फुलशेती उद्योगाला चांगले दिवस प्राप्त झाले आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण जगाचा फुलबाजार सर्व देशांसाठी मोकळा करून दिला आहे. त्यामुळे परस्परांतील फूल व्यापाराला चालना मिळाली असून सुमारे १४० देश फूल उत्पादन आणि व्यापार क्षेत्रात उतरले आहेत. अमेरिका हा जागतिक बाजारपेठेत फुलांचा सर्वांत मोठा उपभोक्ता असून या देशाकडून दरवर्षी सुमारे १० हजार करोड रुपयांच्या फुलांची आयात करतो. फूल आयातीत जपानचा दुसरा क्रमांक लागतो. जागतिक बाजारपेठेत फूल उत्पादन व विक्री यांमध्ये भारताचा वाटा खूप कमी आहे. त्यामुळे भारताला फूल उत्पादनात व विक्रीत मोठा वाव आहे.
भारतामध्ये फुलशेतीच्या वाढीचा वार्षिक दर सुमारे १० ते १५ टक्क्यांदरम्यान आहे, तर वार्षिक आर्थिक उलाढाल ही सुमारे १०० कोटींच्या दरम्यान असावी. महाराष्ट्राच्या प्रगत शेतीमध्ये फुलशेतीला मोठी संधी निर्माण झाली असून अनेक शेतकरी फुलांची शेती करताना दिसत आहे. फुलशेती करताना कामाचा नियमितपणा आणि मर्यादित पाण्याची व्यवस्था (संरक्षित सिंचन व्यवस्था) या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या क्षेत्रात शेतकऱ्यांसह परसबाग करणारे, विस्तार कर्मचारी, रोपवाटिका मालक इत्यादी लोकही फुलांचे उत्पादन करून आर्थिक लाभ मिळवू शकतात.
संदर्भ : राऊळ, वि. ग., फुलशेती, पुणे, २००३.
समीक्षक : अनिल पडोशी