आगरवाल, श्याम स्वरूप : (५ जुलै १९४१ – २ डिसेंबर २०१३) श्याम स्वरूप आगरवाल यांचा जन्म बरेली या उत्तर प्रदेशातील औद्योगिक शहरात झाला. त्यांचे पदवीपूर्व शिक्षण लखनौ विद्यापीठ कनिंग कॉलेज मध्ये झाले. त्यानंतर त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण एमबीबीएस, किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमध्ये पूर्ण केले. (सध्याचे नाव किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी). हेविट गोल्ड मेडल आणि चान्सलर गोल्ड मेडल मिळवून ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमधून एम.डी. पदवी मिळवली. पोस्टडॉक्टरेटसाठी ते फेलोशिप मिळवून इंटरनॅशनल एजन्सी फॉर कॅन्सर रिसर्चमध्ये बरुच सॅम्युअल ब्लुमबर्गमध्ये फॉक्स चेस्ट कॅन्सर सेंटरच्या प्रयोगशाळेत गेले व तेथे त्यांनी संशोधन केले.
भारतात परतल्यावर ते आपल्याच महाविद्यालयात व्याख्याता पदावर काम करू लागले. १६ वर्षे हे काम करीत असता त्यांनी कॅनडातील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन अॅन्ड सर्जन येथून एफआरसीएस मिळवली. संजय गांधी पोस्टग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये मेडिकल जेनेटिक्स अॅन्ड क्लिनिकल इम्युनॉलॉजी विभाग सुरू करण्यासाठी त्यांना पाचारण करण्यात आले. विभागप्रमुख म्हणून त्यांनी तेथे काम पाहिले. निवृत्त झाल्यावर ते टाटा मेमोरिअल सेंटरमध्ये नव्याने सुरू झालेल्या अॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अॅन्ड एज्युकेशन इन कॅन्सरमध्ये संचालक आणि सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूटचे सल्लागार होते.
ते विवेकानंद पॉलिक्लिनिक अॅन्ड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये मानद संचालक रिसर्च अॅन्ड अॅकेडेमिक्स, इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडेमीमध्ये होते. आगरवाल यांचे संशोधन वैद्यकीय अनुवंशविज्ञान आणि रेण्वीयजीवविज्ञान शाखेतील होते. त्यांचे प्राथमिक संशोधन फॉक्स चेस्ट कॅन्सर सेंटरमध्ये डीएनए पॉलिमरेझ आणि डीएनए स्थिरीकरण व डीएनए दुरुस्तीवरील होते. आगरवाल व त्यांच्या सहायकांनी (Panax ginseng; पॅनॅक्स जिन्सेंग) या वनस्पतीच्या प्रतिक्षमता परिणामावर संशोधन केले. प्लांटा मेडिका या विज्ञान नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले. याच बरोबर मलेरियाच्या साथरोग रक्तरस परीक्षण, बालपणीच्या सिऱ्हॉसिस आणि बहुजनुकीय अनुवंशिकता आणि गर्भारपणातील थॅलॅसेमिया परीक्षण यावर संशोधन केले होते.
संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटच्या आश्रयाखाली त्यानी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चसाठी भोपाळ वायू गळतीमुळे झालेले जनुकीय परिणाम याचा अभ्यास केला. कर्नाटकातील हंडीगोडू संश्लेषण या प्रभावी गुणसूत्रातील दोषामुळे अवयव आणि पाठीचा कणा यातील दोष शोधून काढला. गुग्गुळ या वनस्पतीजन्य औषधातील गुग्गुलिपीड वेगळे केले. हे शरीरातील मेदाम्ले कमी करते. याच्या वैद्यकीय चाचण्या घेऊन त्याचे व्यापारी उत्पादनाला औषध नियंत्रण प्राधिकरणाकडून मंजूरी मिळवून दिली.
काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चकडून त्यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्यावतीने कमला मेनन रिसर्च पुरस्कार, उत्तर प्रदेश शासनाचा विज्ञानरत्न पुरस्कार, रनबक्षी रिसर्च पुरस्कार आणि लाईफ मेंबरशिप इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इम्युनोलोजी असे सन्मान लाभले.
हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे लखनौ येथे निधन झाले.
संदर्भ :
समीक्षक : मोहन मद्वाण्णा