होम्स, आर्थर : (१४ जानेवारी १८९० – २० सप्टेंबर १९६५) आर्थर होम्स यांचा जन्म ईशान्य इंग्लंडमधील हेबर्न येथे झाला. रॉयल कॉलेज ऑफ सायन्समधून (आताचे इम्पीरियल कॉलेज, लंडन) भौतिकशास्त्र विषय घेऊन ते बी. एस्सी. झाले. शिक्षणात खंड पडल्याने भूशास्त्रातील पदवी मिळवायची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली. शिष्यवृत्तीवर दिवस काढणे न परवडल्याने त्यांनी मोझांबिकमधील एका खाणीत नोकरी पत्करली. हिवतापाने आजारी पडल्यामुळे तेथून त्यांना मायदेशी परतावे लागले. नंतर त्यांची इम्पीरियल कॉलेजमधे प्रयोगनिर्देशक पदावर नेमणूक झाली. त्याच कॉलेजमधून त्यांनी डॉक्टरेट पदवी प्राप्त केली.
मग ते ब्रह्मदेशातील (आताचे म्यानमार) एका खनिजतेल उद्योगसमूहात प्रमुख भूशास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. तो उद्योगसमूह आर्थिक अडचणीत आल्याने तीन वर्षातच त्यांना अत्यंत विपन्नावस्थेत इंग्लंडला परतावे लागले. कालांतराने डरहॅम विद्यापीठातील भूशास्त्रविभागात प्रपाठक पदावर त्यांची नेमणूक झाली. डोरिस रेनॉल्ड्स या त्यांच्या पत्नी भूशास्त्रज्ञ आणि एडिंबरा रॉयल सोसायटीच्या पहिल्या महिला फेलो होत्या.
रेडियमचा शोध लागल्यानंतर एका दशकानंतर, होम्स महाविद्यालयात विद्यार्थी असतानाच त्यांनी स्वत:च नवे तंत्र विकसित करून एका खडकातील किरणोत्सारी खनिजातील यूरेनियम आणि शिसे यांच्या गुणोत्तरावरून किरणोत्साराचे मापन करून त्या खडकाच्या निर्मितीचे कालनिर्धारण केले.
नामवंत भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड केल्विन यांनी पृथ्वीचे तापमान दरवर्षी किती कमी होते यावरून पृथ्वीचे वय दहा कोटी वर्षांहून अधिक नसावे असा निष्कर्ष काढला होता. पण होम्स यांच्या द एज ऑफ द अर्थ या पुस्तकात त्यांनी पृथ्वीचे वय काही शतकोटी वर्षे असेल असे प्रतिपादन केले होते. त्यांनी पृथ्वीवरील सर्वात प्राचीन खडकांचे वय १६० कोटी वर्षे असावे असाही निष्कर्ष काढला. त्यात सुधारणा करीत १९२७ मधे त्यांनी हे वय ३०० कोटी वर्षे, तर १९४० च्या दशकात ते ४५०±१०० कोटी वर्षे असल्याचे सांगितले. त्यांच्यामुळेच खडकांच्या निर्मितीच्या कालनिर्धारणासाठी पृथ्वीच्या किरणोत्साराचे महत्त्व अधोरेखित झाले.
एदुआर्द झिस यांनी खंडांच्या परिवहनाचा सिद्धांत मांडला होता. पण तो मान्य करण्यात घन-अवस्थेतील खंड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसे गेले हे स्पष्ट होत नसल्याने अडचण येत होती. तथापि, होम्स यांनी पृथ्वीच्या प्रावरणात अभिसरण कोष्ठ (कन्व्हेक्शन सेल्स) असतात, त्यायोगे किरणोत्सारामुळे उत्पन्न होणाऱ्या उष्णतेचे अभिसरण होते आणि खंड नावाचे पृथ्वीच्या कवचाचे तुकडे प्रावरणावरून सरकत जाण्यासाठी ऊर्जा मिळते, असा प्रस्ताव मांडला. कालांतराने भूपट्टसांरचनिकी आणि पुराभूचुंबकत्व या संकल्पना विकसित झाल्यानंतर त्यांचा हा प्रस्ताव निर्दोष असल्याचे सिद्धही झाले.
त्यांचे प्रिन्सिपल्स ऑफ फिजिकल जिऑलॉजी हे पुस्तक प्रकाशित झाले. एखाद्या प्रमाणित पाठ्यपुस्तकाप्रमाणे ते वापरले गेले. त्यांनी डरहॅम विद्यापीठात भूशास्त्राचे विभागप्रमुखपद, तर नंतर एडिंबरा विद्यापीठात शाही अध्यासन (रेजिअस चेअर) भूषविले. ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे, आणि रॉयल सोसायटी ऑफ एडिंबराचेही फेलो होते.
संदर्भ :
- https://www.edinburghgeolsoc.org/edinburghs-geology/geological-pioneers/arthur-holmes/
- Cherry L. E. Lewis, 2002. Arthur Holmes’ unifying theory: from radioactivity to continental drift, Geological Society London, Special Publications, v. 192; p. 167-183
समीक्षक : विद्याधर बोरकर