सिद्दिकी, हसन नसीम : (२० जुलै १९३४ – १४ नोव्हेंबर १९८६) हसन नसीम सिद्दिकी यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बिजनोर झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण शासकीय हायस्कूलमध्ये झाले. मॅट्रिक परीक्षेनंतर ते उस्मानिया विद्यापीठतून इन्टरमिडिएट परीक्षा पास झाले. नंतर त्यांनी विज्ञान शाखेतील पदवी मिळवली. भूगर्भ शास्त्रातील पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठात प्रवेश घेतला. त्याच विद्यापीठात डॉक्टरेट करण्यासाठी त्यांनी पदव्युत्तर पदवीनंतर संशोधन करण्यास प्रारंभ केला. पण राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेमध्ये रुजू झाल्यावर त्यांची पीएच्.डी. जाहीर झाली. जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये त्यांनी आपल्या नोकरीची सुरवात भूजल शोध आणि संशोधन विभागात केली. त्यांनी सतरा वर्षे या विभागात काम करून वरिष्ठ वैज्ञानिक पदापर्यंत प्रगती केली. अधिक प्रशिक्षणासाठी ते रशियातील शिरशॉव्ह इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये गेले असता भारत शासनाने १९७३ साली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीची स्थापना केली. या संस्थेचे प्रमुख कार्यालय गोव्यात असल्याने त्यांना ई-श्रेणीतील वैज्ञानिकाचे आणि उपसंचालकाचे पद मिळाले. १९८५ साली ते या संस्थेचे संचालक झाले.
सिद्दिकी यांचे मुख्य कार्यक्षेत्र अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंटार्क्टिका होते. त्यांनी केलेले संशोधनामध्ये महासागरी तळामधील पेट्रोलियम, इतर खनिजे, समुद्र तळाशी जमा होणार्या पॉलिमेटलिक नोड्यूलचा शोध, सागरतळाशी असलेल्या गाळाचा शोध, सागरतळाशी असलेल्या फोरॅमिनिफेरा या आदिजीव अवशेषांचा अभ्यास, खोल पाण्यातील तापमान व सागर प्रवाहाचा अभ्यास यांसमावेश होता. आणि त्यांचे प्रयत्न सात प्रकारात विभागले जाऊ शकतात. उदा., पेट्रोलियम आणि खनिजांचे अन्वेषण, पायाभूत सुविधा विकास, प्लायमेटेलिक नोड्यल्सचा शोध, गाळाचा अभ्यास, फोरामिनिफेरावरील अभ्यास, पॅलेओक्लीमॅटिक अभ्यास आणि अंटार्क्टिका मोहीम. ते अनेक तेल प्रकल्पांशी संबंधित होते. सय्यद जहूर कासिम यांच्या पहिल्या अंटार्क्टिका मोहिमेचे ते उपप्रमुख होते. अंटार्टिका खंडातील कायमच्या दक्षिण गंगोत्री या भारतीय तळाची उभारणी करण्यासाठी त्यांनी सागरी विज्ञान कार्यक्रमांचे संयोजन केले. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांचा पहिला तळपृष्ठ भागाचा नकाशा त्यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आला. हा नकाशा सागरी मोहिमा, सागरी जल वाहतूक आणि पाणबुड्यांच्या हालचालीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या नकाशांच्या आधाराने समुद्रतळाच्या तेलवाहक पाइपचा आराखडा बनवण्यात आला. त्यांच्या एका निरीक्षणामध्ये लक्षद्वीप बेटाजवळ असलेल्या एका फोरामीनिफेरामुळे तेथील प्रदूषणाची पातळी समजण्यास मदत झाली. लक्षदीप किनारपट्टीवरील त्यांच्या अभ्यासामुळे चागोस-लॅकाडाव्ह गर्तेच्या उत्पत्तीबद्दल नवीन माहिती मिळाली. या भागात असलेल्या दिगो गारसिया या बेटावर सध्या अमेरिकेचा नाविक तळ आहे. त्यामुळे सामरिकदृष्ट्या या गर्तेचे महत्त्व वाढले आहे.
सिद्दिकी यांचे चौदा संशोधन लेख रिसर्च गेट या शास्त्रीय नियतकालिकेत सूचीबद्ध झालेले आहेत. सिद्दिकी हे ओशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी बोर्ड आणि नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम इत्यादी भारतीय सरकारी संस्थांशी संबंधित होते. त्यांनी केलेल्या पेट्रोलियम आणि खनिज संशोधनामुळे सागरतळाशी असलेल्या खनिज गोटे (नोड्यूल) संशोधनाचा भारतात पाया घातला गेला. चार दुर्मिळ खनिजे या सागरतळाशी असलेल्या गोट्यामध्ये आढळतात. यांना पॉलिमेटॅलिक नोड्यूल म्हणतात. यात मँगनीज अधिक असल्याने याचे दुसरे नाव मँगनीज नोड्यूल असेही आहे. विद्युत् घटामध्ये असलेले कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि मँगनीज यांचे आस्तित्व या खनिज गोट्यामध्ये असल्याने याला व्यापारी महत्त्व आहे. कारण खाणीमध्ये यांचे प्रमाण फार कमी असते. समुद्रतळाशी असलेल्या प्राचीन गाळाच्या अभ्यासावरून त्यावेळी असलेले वातावरण अभ्यासता येते. अनेक तेल संशोधन प्रकल्पाबरोबर उदा., ओएनजीसी आणि ऑइल इंडियासारख्या संस्थांशी डॉ. सिद्दिकी संबंधित होते. त्याचबरोबर समुद्रतळाशी टाकलेल्या पाइपलाइनी, त्यांची मार्ग आखणी आणि समन्वय या समितीवर ते होते. आंतरराष्ट्रीय समुद्रतळ प्राधिकरण, युनायटेड नेशन्समधील सात सभासद राष्ट्रांमध्ये भारताचा समावेश केवळ डॉ. सिद्दिकी यांच्यामुळे करण्यात आला.
भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी, जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, अन्वेषण भूभौतिकीशास्त्रज्ञ असोसिएशन आणि नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस इंडियाच्या सभासदात त्यांची निवड झालेली होती.
त्यांना पृथ्वी, वातावरण, महासागर आणि ग्रहविज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, पद्मश्री सन्मान, राष्ट्रीय खनिज पुरस्कार, गोवा सरकारचा राज्य पुरस्कार मिळाले तर इंडियन जिओफिजिकल युनियनने त्यांच्या सन्मानार्थ डॉ. एच. सिद्दिक स्मृती व्याख्यानमाला सुरू केली आहे.
त्यांचा हृदय विकाराने मृत्यू झाला.
संदर्भ :
समीक्षक : मोहन मद्वाण्णा