स्टॉलिक्झ्का, फर्डिनांड (७ जून १८३८ – १९ जुलै १८७४) फर्डिनांड स्टॉलिक्झ्का यांचा जन्म झेकोस्लोव्हाकियातील मोराव्हिया प्रांतात होचवाल्ड येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण झेकोस्लोव्हाकियातील क्रोमेरिझमधे जर्मन माध्यमाच्या शाळेत झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण प्रागमधे आणि नंतर ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना विद्यापीठात झाले. पदवी परीक्षेसाठी त्यांनी भूशास्त्र आणि पुराजीवशास्त्र हे विषय निवडले होते. व्हिएन्नामधे त्यांना भूशास्त्रातील संशोधक एदुआर्द झिस यांचे मार्गदर्शन लाभले. व्हिएन्ना विद्यापीठामधूनच त्यांनी डॉक्टरेट प्राप्त केली.

आपली पहिली सविस्तर वैज्ञानिक संस्मरणिका त्यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी लिहिली. ती आल्प्स पर्वताच्या ईशान्य भागातील क्रिटेशिअस कालखंडातील खडकात आढळणाऱ्या गोड्या पाण्यातल्या मृदुकाय संघातील जीवाश्मांविषयी होती. त्यांनी ती व्हिएन्ना विद्यापीठाला सादर केली होती. नंतर ऑस्ट्रियन भूवैज्ञानिक सर्वेक्षण या संस्थेत ते रुजू झाले. तेथेही त्यांनी आल्प्स पर्वतातील काही खडकांवर, तसेच हंगेरीतील काही खडकांवर संशोधन केले.

झेक प्रजासत्ताक राष्ट्राने सन्मानार्थ काढलेले पोस्टाचे तिकीट

तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या विभागात त्यांची नेमणूक झाली आणि भारत हीच त्यांची कर्मभूमी झाली. रूजू होताच त्यांच्याकडे तिरुचिरापल्ली ते पुदुचेरी यांदरम्यान आढळणाऱ्या क्रिटेशिअस कालखंडातील पाषाणसमूहातील जीवाश्मांच्या संशोधनाची जबाबदारी देण्यात आली. विविध प्रकारच्या सागरी अपृष्ठवंशीय प्राण्यांचे उत्कृष्टरित्या जतन झालेले जीवाश्म तिथे आढळतात याचा शोध नुकताच लागला होता. या जीवाश्म समुदायाचा त्यांनी बारा वर्षे कसून अभ्यास केला. या कालावधीत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने त्यांच्या या संशोधनावर आधारित संस्मरणिकांची एक फार मोठी मालिका प्रकाशित केली. आजही स्टॉलिक्झ्कांच्या या संशोधनाकडे जीवाश्मांवरील संशोधनाचा एक आदर्श वस्तुपाठ म्हणून पाहिले जाते.

हे संशोधन चालू असताना त्यांनी मुंबईच्या मलबारहिलच्या खडकांमधे आढळणाऱ्या बेडकांच्या जीवाश्मांचा अभ्यास करून एक शोधनिबंध लिहिला. याखेरीज त्यांनी कच्छ, हिमालयाच्या पर्वतरांगा, अंदमान-निकोबार बेटे, म्यानमार, सिंगापूर आणि मलाया इथल्या काही भागांना भेटी दिल्या. प्राकृतिक विज्ञानाचे तळमळीचे अभ्यासक असल्यामुळे बारकाईने निरीक्षणे करून काही ठिकाणच्या जीवाश्मांविषयी, तर काही ठिकाणच्या प्राणीसृष्टीविषयी त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले. त्यांच्या शोधनिबंधांवरून संधिपाद, मृदुकाय, सरिसृप, पक्षी आणि सस्तन अशा विविध वर्गीय प्राण्यांच्या अभ्यासावर त्यांचे सारखेच प्रभुत्व होते हे लक्षात येते.

स्टॉलिक्झ्का कोलकात्याच्या एशिॲटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेच्या वैज्ञानिक नियतकालिकाचे संपादक होते. त्या संस्थेच्या प्राकृतिक विज्ञान विभागाचे ते काही काळ सचिवही होते. तत्कालीन ब्रिटिश सरकारने काशगर आणि यारकंद या भागात आयोजित केलेल्या वैज्ञानिक मोहिमेत स्टॉलिक्झ्का सहभागी झाले होते. परतीच्या प्रवासात ते अचानक मेंदूज्वराने आजारी पडले; आणि त्यातच, वयाच्या ३६ व्या वर्षी त्यांचा अंत झाला.

स्टॉलिक्झ्कांच्या संशोधनाची व्याप्ती आणि गुणवत्ता अत्यंत प्रशंसनीय असल्याने त्यांच्याकडे विज्ञानाचे अभ्यासक आदराने बघता. प्राण्यांच्या पंधरा जातींना स्टॉलिक्झ्कांच्या स्मरणार्थ वैज्ञानिक नावे दिली गेली आहेत. आर्क्टिक सागरातील एका बेटालाही त्यांचे नाव दिलेले आहे. झेक प्रजासत्ताक राष्ट्राने त्यांच्या सन्मानार्थ एक डाक तिकीट जारी केले होते. तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लेहजवळ स्मारक उभारले आहे.

संदर्भ :

  • Ferdinand Stoliczka,Nature 34: 574–575 (1886).

समीक्षक : विद्याधर बोरकर