लोंगपिंग, युआन : (७ सप्टेंबर १९३० – २२ मे २०२१) युआन लोंगपिंग या चीनमधील कृषिशास्त्रज्ञाचा जन्म चीनची राजधानी बीजिंग येथे झाला. दुसरे चीन-जपानी युद्ध आणि चिनी गृहयुद्धादरम्यान तेथून ते आपल्या कुटुंबासह स्थलांतरित झाले. त्यांचे शालेय शिक्षण हुनान, चोंगक्विंग, हँकौ आणि नानजिंग अशा अनेक ठिकाणच्या शाळांतून झाले. दक्षिण-पश्चिम कृषि महाविद्यालयातून (सध्याचे दक्षिण-पश्चिम विद्यापीठ) ते कृषिशास्त्राचे पदवीधर झाले. युआन यांनी कृषिशास्त्र पदवीचा अभ्यास करतानाच, ग्रेगोर मेंडेल आणि आनुवंशिकतेतील इतर प्रवर्तक संशोधकांच्या आनुवंशिकी निष्कर्षांचा अभ्यास करून या विज्ञान क्षेत्रात निपुणता मिळवली. पदवी घेतल्यानंतर युआन यांनी पीक आनुवंशिकी विषयात आपली आवड कायम ठेऊन हुनान प्रांतातील कृषी महाविद्यालयात अध्यापक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. १९५९मध्ये चीनने ग्रेट चिनी दुष्काळ अनुभवला. भुकेले लोक शेतामधील त्यांना सापडतील ते सर्व खाद्यपदार्थ घेऊन जात. या काळात गवत, रानटी वनस्पतींच्या बिया, फर्नची मुळेदेखील खाण्यासाठी वापरली गेली. या तीव्र दुष्काळाच्या वेळी उपासमारीने लाखो चीनी नागरिकांचा मृत्यू झाला. हुनान प्रांतातील कृषी शास्त्रज्ञ असून देखील आजूबाजूच्या लोकांना आपण उपासमारीतून वाचविण्यासाठी मदतीचा हात देऊ शकत नाही यांची खंत युआन यांच्या मनात होती. तेंव्हा या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी व्यावहारिक उपाय म्हणून आनुवंशिकता सिद्धांत लागू होणाऱ्या, जलद वाढीची क्षमता असणाऱ्या रताळी आणि गव्हावर संशोधन सुरू केले. त्यांच्या लक्षात आले की दक्षिण चीनमध्ये रताळे कधीच दैनंदिन आहाराचा भाग नव्हते आणि त्या भागात गहू चांगला पिकत नव्हता. म्हणून त्यांनी, आपले लक्ष संकरित भाताचे वाण तयार करण्यावर केंद्रित केले. त्यांनी चीन आणि अनेक विकसनशील देशांमध्ये अन्न टंचाईची समस्या सोडवण्यासाठी भरघोस उत्पन्न देणाऱ्या संकरित भाताची पैदास कशी करावी याबद्दल अभ्यास करण्यास सुरुवात केली. संकरित भाताच्या प्राथमिक प्रायोगिक प्रजातीची पहिल्या पिढीची लागवड केल्यावर पारंपारिक प्रजातींपेक्षा उत्पन्न वाढ दिसून आली नाही. अधिक उत्पादन देणाऱ्या भात पिकाची पैदास करण्याबद्दलचे प्रयत्न खुंटल्याने त्यांनी चीनच्या दुर्गम भागात नैसर्गिक रानटी वाण शोधण्यास सुरुवात केली. अनपेक्षितपणे युआन यांच्या सहकाऱ्यांना दक्षिण चीनमधील हैनान बेटावर नैसर्गिक भात दाण्यांनी पूर्ण भरलेली मोठी लोंब्या असलेली प्रजाती सापडली. त्या वाणापासून त्यांनी अधिक उत्पन्न देणाऱ्या भाताचे संकरित वाण तयार केले. या वाणाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी तयार झालेल्या या पिकांचे धान्य काळजीपूर्वक वेचले. पुढील हंगामात १००० हून अधिक बियाण्याची पेरणी केली. या पिढीत तयार झालेल्या पिकाचे गुणधर्म मातृपिढीहून वेगळे होते. याच्या कारणांचा अभ्यास केल्यावर युआन अशा निष्कर्षास पोहचले की हे अप्रतिम वाण नैसर्गिक संकरित भाताचे आहे.
भात स्व-परागक वनस्पती असल्यामुळे मोठ्या प्रमाणात संकरित बियाण्यांच्या उत्पादनासाठी फुलांचा पुंकेसर हातानी बाजूला काढणे अत्यंत कठीण काम असून शेतीसाठी संकरणाच्या पहिल्या पिढीचा संकरित भात विकसित करण्यात हा अडथळा बनतो. या समस्येवरचा मुख्य उपाय म्हणून युआनने भात संकरणासाठी प्रजननक्षम नैसर्गिकरित्या उत्परिवर्तित नर-वंध्य प्रजाती वापरण्याचा निर्धार केला. त्यानंतर युआन भाताच्या नैसर्गिक वंध्य नर प्रजाती शोधू लागले. शेतात लागवड केलेल्या पारंपारिक भात पिकामध्ये त्यांना भाताच्या सहा वंध्य नर प्रजाती आढळल्या. पण त्यांचा वंध्य-नरपणा पुढील पिढीत दिसून आला नाही. युआन आणि त्यांच्या संशोधन सहकाऱ्यांनी त्यांचा शोध रानटी भात प्रजाती पर्यंत वाढवला. १९७० मध्ये, त्यांना वन्य वंध्य नर रानटी भात आढळला. त्यांनी त्यास (वांझ WA) वाण असे संबोधले. त्यानंतर त्यांनी, डब्ल्यूए वांझ पुनरुत्पादित पहिल्या पिढीच्या बियाण्याची लागवड केली. युआन यांनी प्रकाशित केलेल्या भात पिकातील नर-वंध्यत्व या शोधनिबंधात तीन ओळींची (three line) अनुरूपता पद्धत मांडली आणि संकरित भाताच्या पैदाशीचा वैज्ञानिक पाया घातला. थ्री-लाइन संकरित भाताच्या ह्या तीन ओळीं म्हणजे: वंध्य नर ओळ, नर-वंध्य करणारी ओळ आणि नर-वंध्य पुनर्स्थापक ओळ. तीन ओळीची प्रजनन पद्धत विकसित केल्यानंतर, युआन यांनी बियाणे उत्पादन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी यशस्वी प्रयत्न सुरू ठेवले. अखेरीस इतर संशोधकांच्या सहकार्याने, भाताच्या उच्च उत्पन्न देणाऱ्या संकरित प्रजातीची निर्मितीसाठी आणि पुनरुत्पादन करण्यासाठी अवश्यक ती संपूर्ण प्रक्रिया विकसित करण्यात ते यशस्वी झाले. त्यांनी संकरित भाताच्या प्रजातीची यशस्वी लागवड केली. त्याचे उत्पन्न पारंपारिक भातपिकापेक्षा प्रति युनिट २० टक्के अधिक होते. या संशोधनावर युआन यांनी स्वतंत्रपणे चीनमध्ये एक शोधनिबंध प्रकाशित केला ज्यामध्ये नैसर्गिक वन्य भाताचे अनुवांशिक गुण पारंपारिक भात वाणात कसे संक्रमित केले जाऊ शकतात हे स्पष्ट केले. एकदा नैसर्गिक (वन्यजात) रानटी भाताची अनुवांशिक सामग्री अनुरूप झाली की, पिकाच्या उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या पारंपारिक भात प्रजाती संकरित केल्या जाऊ शकतात. संकरित भाताच्या प्रजाती यशस्वीपणे विकसित करून युआन यांनी भातशेतीमध्ये हरितक्रांती घडवण्यास योगदान दिले. यामुळे त्यांना चीनमध्ये संकरित भाताचे जनक म्हणून ओळखले जाते. आज भात उत्पादनात चीन जगभरात आघाडीवर आहे. चीनमधील एकूण भाताच्या उत्पादनापैकी युआन लोंगपिंग यांच्या संकरित भाताच्या प्रजाती ५० टक्के क्षेत्रावर लागवडीखाली आहेत. चीनमधील एकूण भात उत्पादनाच्या ६० टक्के उत्पन्न या संकरित भात वाणाच्या लागवडीमुळे होते. अधिक उत्पन्न देणार्या भाताच्या आगमनाने चीनची अन्न समस्या मोठ्या प्रमाणात दूर झाली.
युआन यांनी चीनच्या नैऋत्येकडील हुनान प्रांतात संकरित भाताचा उत्पादन प्रकल्प मोठ्या प्रमाणावर चालू केला. आयुष्यभर आपले बहुतेक संशोधन त्यांनी येथेच केले. पुढे त्यांनी तांदळाच्या विविध संकरित जाती आंतरराष्ट्रीय समुदायाला लागवडीसाठी दिल्या. त्यामुळे आफ्रिका, आग्नेय आशिया, दक्षिण आशिया आणि जगभरातील ४० हून अधिक देशांमध्ये संकरित भातपीक तंत्रज्ञान विकसित झाले. त्यांनी शेतकऱ्यांना संकरित भात पिकवण्याचे प्रशिक्षण देऊन संकरित भात लागवडीस प्रोत्सहन दिले. युआन आणि त्यांच्या सहकार्यांनी भारत, मादागास्कर, लायबेरिया आणि इतरत्र शेतकऱ्यांना संकरित भात पिकवायला शिकवले. संकरित भाताच्या झपाट्याने वाढणाऱ्या उत्पन्नामुळे बहुतांश तांदूळ उत्पादक देशांमधील दुष्काळी परिस्थिती दूर होण्यास मदत झाली.
युआन लोंगपिंग यांना मिळालेली पदके आणि पुरस्कारांत चीनचा पहिला विशेष शोध पुरस्कार, विज्ञानासाठीचा युनेस्को पुरस्कार, निक्की एशिया पुरस्कार, चीनचा कृषी क्षेत्रातील राज्य प्रमुख विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार, वुल्फ ॲग्रीकल्चर, वर्ल्ड फूड प्राइज, कन्फ्यूशियस शांतता पुरस्कार आणि ऑर्डर ऑफ द रिपब्लिक पुरस्कार यांचा समावेश आहे. हुनान कृषी विद्यापीठ, चांग्शा येथे प्राध्यापक आणि चायना नॅशनल हायब्रिड राईस आर अँड डी सेंटरचे महासंचालक अशी पदे त्यांनी भूषविली. चायनीज अकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगचे सदस्य, आणि युनायटेड स्टेट्स नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे परदेशी सहयोगी म्हणून त्यांची निवड झाली. जागतिक अन्न संघटनेचे (FAO) मुख्य सल्लागार म्हणूनदेखील त्यांनी काम केले. युआन यांची दोन स्वप्ने होती: १) मला सुपर भात पिक हवे, जे ज्वारीपेक्षा उंच वाढेल, त्याच्या प्रत्येक फुटव्यावरील ओंबी झाडूइतकी लांब आणि प्रत्येक दाणा शेंगदाण्याएवढा मोठा असावा, ज्यामुळे मी भातपिकाच्या सावलीतील गारव्याचा आनंद घेऊ शकेन, २) जगभर हायब्रिड भाताची लागवड व्हावी. युआन आणि असंख्य संशोधकांनी ही स्वप्ने साकार करण्यासाठी अनेक दशके कठोर परिश्रम घेतले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य संकरित तांदळाच्या संशोधनासाठी समर्पित केले आणि जागतिक अन्न सुरक्षा आणि दारिद्र्य निर्मूलनात मोठे योगदान दिले.
चीनच्या हुनान प्रांतातील चांगशा येथील इस्पितळात त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- Yuan Longping (1930–2021) | Nature Plants
- Yuan Longping, Plant Scientist Who Helped Curb Famine, Dies at 90 – The New York Times (nytimes.com)
- https://hrdc.irri.org/yuan-longping-simple-life-great-legacy
- https://news.cgtn.com/news/2021-05-22/Yuan-Longping-father-of-hybrid
समीक्षक : मोहन मद्वाण्णा
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.