विविध फळे, फुले, भाजीपाला इत्यादींचे उत्पादन घेणे म्हणजे फलोत्पादन होय. फलोत्पादन हा आपल्या दैनंदिन जीवनाशी परिचित असून हा कृषी उद्योगाचा एक भाग आहे. शेतातील किंवा बागेतील छोट्या फळझाडांची काळजी घेणे, त्यांना वाढविणे, तसेच घरासमोरील हिरवळीची काळजी घेणे हे फलोत्पादनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. फलोत्पादनामध्ये सोयी सुविधा, सुशोभीकरण आणि अन्नधान्याचे उत्पादन व उपयोग यांचा समावेश केला जातो.

फलोत्पादन आणि विज्ञान यांच्यामध्ये थेट संबंध आहे. विज्ञानाचे उत्पादनाशी निगडित असलेले क्षेत्र म्हणजे वनस्पतीशास्त्र. वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पती आणि वनस्पती प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. फलोत्पादन वनस्पतींच्या लागवडीशी संबंधित असलेल्या विज्ञानाच्या शाखेला फलोत्पादन विज्ञान म्हणून ओळखले जाते. फलोत्पादन उद्योगात विज्ञानाचा उपयोग केला जातो, त्याला फलोत्पादन तंत्रज्ञान म्हणतात. केवळ रोपट्यांना पाणी देण्यापेक्षा त्यांचे संगोपन करून यशस्वी फलोत्पादन करणे, हे अधिक महत्त्वाचे आहे. वनस्पतींच्या योग्य वाढीकरिता वेळ, संयम आणि विविध वैज्ञानिक प्रक्रिया यांची समज असणे आवश्यक आहे.

फलोत्पादनाचा उगम मध्ययुगीन काळापासून चालत आलेल्या छोट्या छोट्या बागेच्या वाढीशी संबंधित असून यामध्ये फळे, भाज्या, आयुर्वेदिक वनस्पती आणि फुले यांचा समावेश होतो. हार्टिकल्चर हा इंग्रजी शब्द ‘हार्ट्स’ म्हणजे बगीचा आणि ‘कोलेरे’ म्हणजे लागवड किंवा शेती करणे या लॅटिन शब्दांपासून बनला आहे. फलोत्पादनाचा ऐतिहासिक दृष्ट्या शोध घेतला, तर कृषीच्या या स्वतंत्र शाखेचा आजही अत्याधुनिक कला आणि विज्ञान म्हणून हळूहळू विकास झालेला दिसून येतो.

फलोत्पादनामध्ये फळे, भाज्या, फुले, संबंधित शोभेची पिके, औषधी वनस्पती आणि इतर मूल्यवान वनस्पती, विशेषत: नेहमीच नाशवंत असणारी पिके, यांचा समावेश केला जातो. एखाद्या वनस्पतीचा आकार, उत्पादन आणि इतर परिणामात्मक वैशिष्ट्ये ही त्याची अनुवंशिक क्षमता आणि पर्यावरणाद्वारे निर्धारित केली जातात. उदा., एखादी टमाटरची प्रजात अनुवंशिकतेनुसार १० ते १२ किलो उत्पादनास समर्थ असताना अपुऱ्या पाण्यामुळे व प्रतिकूल वातावरणामुळे प्रत्यक्षात ५ ते ६ किलोचे उत्पादन घेतले जाते. फलोत्पादनकर्ता वातावरणातील बदलाचा व प्रजातीद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रतिसादाचा अभ्यास करून योग्य वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करीत असतो आणि अपेक्षित उत्पादन मिळविण्याकरिता प्रजातीच्या प्रतिसादानुसार वातावरणात बदल करणाऱ्या तंत्राचा उपयोग करीत असतो. वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी फलोत्पादनासारखे सुयोग्य व्यवस्थापन नेहमीच आवश्यक असते आणि हे वैज्ञानिक व्यवस्थापन आर्थिक दृष्ट्या शक्य असते; कारण यामध्ये उत्पादित केलेल्या वस्तूंचे बागायतदारांकरिता अंतर्गत मूल्य कमी असल्याने नेहमीच चांगली किंमत मिळते आणि ग्राहकांनाही योग्य भावात उत्तम वस्तू मिळते.

फलोत्पादन उद्योग हा वैज्ञानिक, तांत्रिक आणि उत्पादन क्रिया यांच्या सहयोगाद्वारे ग्राहकांच्या पसंतीची हमी देतात. हा उद्योग अर्थव्यवस्थेला उत्तम पोषणाबरोबरच आध्यात्मिक आणि मानसिक असा मौल्यवान उपचारही पुरवितो. फलोत्पादन पर्यावरण अधिक सुंदर बनविण्यास मदत करीत असते. फलोत्पादन उद्योगात फळ उत्पादन, भाजी उत्पादन, फुलशेती उद्योग/उत्पादन, पर्यावरणीय फलोत्पादन आणि हंगामानंतरचे कार्य या भागांचा समावेश होतो.

फलोत्पादनाचे प्रकार : फळ : फलोत्पादनामध्ये फळांची लागवड, भांडारण, प्रक्रिया आणि सुका मेवा व फळे यांचा समावेश होतो. यात लहान व मोठे या दोन्ही प्रकारच्या फळ उत्पादनाचा समावेश होतो. उदा., पोम फळे म्हणजे सफरचंद, नाशपती, बेल इत्यादी; टणक फळे म्हणजे आडु, चेरी, आलुबुखारा, चिक्कू, शफ्ताळू इत्यादी; लहान फळे म्हणजे जांभूळ, स्ट्रॉबेरी, रासबेरी, द्राक्षे इत्यादी आणि नट फ्री फळे.

भाज्यांची शेती : फलोत्पादनाच्या या गटात भाज्यांच्या उत्पादनाचा समावेश केला जातो. याला ओलेरीकल्चर म्हणजेच भाज्यांची शेती असे म्हणतात. यामध्ये भाजीपाला पीकांची लावणी, कापणी, साठवण, प्रक्रिया आणि विपणनाचा समावेश केला जातो. यामध्ये गोळ मका, टमाटे, कंदयुक्त फळे इत्यादी भाज्यांचा समावेश असतो.

शोभेचे फलोत्पादन : रोपट्यांची वाढ आणि उपयोग, त्यांच्या सौंदर्यासाठी करण्यात येणाऱ्या फलोत्पादनाच्या भागाला शोभेचे फलोत्पादन (ऑर्नामेटल हॉर्टिकल्चर) असे म्हणतात. यामध्ये फुले, कुंड्यांमधील झाडे-रोपटे, बेडिंग रोपे आणि फुलांच्या सजावटी यांचा समावेश होतो. यामध्ये हिरव्या रोपटांचा उपयोग होत असल्यामुळे या उद्योगाला हरित उद्योग असेही म्हणतात. शोभेचे फलोत्पादन शोभेच्या फुलझाडांची निगा राखण्याचे शास्त्र आणि भूसदृश्य फलोत्पादन या दोन भागांमध्ये विभागले जाते. यामध्ये फुलांबरोबरच शोभेच्या झाडांच्या हिरव्या पानांचाही समावेश केला जातो.

पर्यावरणीय फलोत्पादन : यामध्ये हिरवळीच्या सजावटी व व्यवस्थापनाकरिता वनौषधी व रोपांच्या नर्सरी उत्पादनाचा समावेश होतो. या उत्पादनांबरोबरच त्यांच्या उपयोगाचाही समावेश या गटात केला जातो.

हंगामानंतरचे कार्य (पोस्टहार्वेस्ट फायसीऑलॉजी) : यामध्ये विविध क्रियांचा समावेश केला जातो. उदा., विविध पिकांबरोबर फुले, फळे, भाज्यांची लागवड, हाताळणी, भंडारण इत्यादी.

समीक्षक : अनिल पडोशी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.