गॉसेट, विलियम सेली : (१३ जून १८७६ – १६ ऑक्टोबर १९३७) इंग्लंडमधील कँटेरबरी, केंट येथे विलियम सेली गॉसेट यांचा जन्म झाला. ते स्टुडंट ह्या टोपण नांवाने प्रसिद्ध होते. शालेय शिक्षणानंतर त्यांनी विन्चेस्टर महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि नंतर रसायनशास्त्र व गणित या विषयांचे विशेष शिक्षण त्यांनी ऑक्सफर्डमधील न्यू कॉलेज ह्या महाविद्यालयात घेतले. तेथून त्यांनी पदवी संपादन केली.
आर्थर गिनीज, सन्स अँड कंपनी ह्या मद्य-निर्मिती करणाऱ्या कंपनीला मद्याची निर्मिती करताना लागणाऱ्या विविध प्रक्रियांसाठी आणि त्यांच्या विश्लेषणासाठी वैज्ञानिकाची गरज होती. त्याचवेळी पदवीधर झालेले आणि नोकरीच्या शोधात असलेले गॉसेट यांची त्या जागेसाठी निवड झाली आणि ते डब्लिनमध्ये सेंट-जेम्स गेट येथील या कंपनीच्या कार्यालयात रुजू झाले. इथे मद्य उत्पादन आणि त्याला अनुषंगिक शेती उत्पादन हे दोन्ही उद्योग चालत. तिथे त्यांना आपले सांख्यिकीमधील ज्ञान पडताळून पहाण्याची संधी मिळाली. त्यांनी एका अंतर्गत अहवालात जव (बार्ली) आणि यीस्ट ह्याचे नेमके प्रमाण निश्चित करण्यासाठी संभाव्यता सिद्धांताचा उपयोग केला होता. त्या अहवालाचा मथळा होता, तृटीच्या नियमाची मद्यनिर्मितीच्या कामासाठी उपयोजना.
गॉसेट यांच्या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन कंपनीने त्यांना दोन वर्षे लंडन येथील सुप्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ कार्ल पिअर्सन ह्यांच्या प्रयोगशाळेत प्रशिक्षणासाठी पाठवले. तेथे त्यांनी चांगल्या प्रतीच्या जवाचे उत्पन्न काढणे आणि जव आंबवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यीस्टचे इष्टतम प्रमाण ठरविणे यावर संशोधन केले. याच कामाचा भाग म्हणून त्यांनी वितरण सिद्धांत (Theory of Distribution) आणि सहसंबध गुणांक (Correlation Coefficients) या संकल्पनांचा अभ्यास केला. त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आधारसामग्रीची छाननी करताना त्यांना असे जाणवले की त्यातील बरीच माहिती अनावश्यक होती. म्हणून गॉसेट यांनी त्यांच्या गृहीतकांच्या अटी पूर्ण होतील एव्हढीच माहिती निवडली आणि निष्कर्ष काढले. या पद्धतीला लघुनमुना पद्धती असे नांव त्यांनी दिले. ही पद्धत वापरून त्यांनी मद्यनिर्मिती करताना येणाऱ्या अनेक अडचणी सोडवल्या. ह्यावरील शोधलेखन करताना पिअर्सन हयांनी त्यांना मदत केली, पण त्यात गॉसेट यांनी वापरलेल्या संकल्पनेचे व्यापक महत्त्व पियरसन यांना तेव्हा कळले नाही.
मद्यार्क निर्मितीच्या धंद्यातील गोपनीयता राखण्यासाठी गिनीज कंपनीतील कर्मचाऱ्यांना कोणताही शोधलेख प्रकाशित करण्यावर बंदी होती. गॉसेट यांनी आपले काम गणित आणि तत्त्वज्ञानावर आधारित असल्यामुळे गिनीज कंपनीच्या स्पर्धकांना त्याचा काहींच फायदा होणार नाही हे पटवून दिले. कंपनीने त्यांना टोपण नावाने शोधलेख प्रकाशित करण्यास परवानगी दिली. त्यामुळे त्यांचा तो लेख आणि नंतरचे जवळपास सगळे काम स्टुडंट ह्या टोपण नांवाने प्रसिद्ध झाले. आज त्यांची उल्लेखनीय कामगिरी टी-वितरण ही स्टुडंटस् टी-वितरण ह्या नावाने प्रसिद्ध आहे. स्टुडंट या नावाने त्यांनी २२ शोधलेख प्रकाशित केले. त्यांचा पहिला शोधलेख यीस्ट मोजण्यासाठी पॉयझों वितरणाची (Poisson Distribution) उपयोगिता हा होता.
त्यांना जवाच्या पिकाची लागवड करताना फक्त सरासरी उत्पन्न वाढवण्यात रस नव्हता. जमीन बदलली किंवा हवामान बदलले तरी जवाच्या पैदाशीत फरक पडणार नाही अशा प्रकारच्या प्रयोग संकल्पन किंवा अभिकल्प (Design of Experiments) तयार करणे त्यांचे ध्येय होते. म्हणजेच जास्तीतजास्त उत्पन्न मिळण्याकरता कच्च्या मालावर प्रक्रिया करण्याची सर्वोत्तम व्यवस्था त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला.
काही काळानंतर गॉसेट डब्लिनमधून लंडन येथील त्याच कंपनीच्या नवीन मद्यनिर्मिती केंद्राचे व उत्पादनाच्या वैज्ञानिक विभागाचे प्रमुख म्हणून गेले. परंतु दोनच वर्षांनी बंकिमहॅमशायरच्या बीकंसफिल्ड येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
पियरसननी गॉसेट यांच्या लघुनमुना पद्धतीला फारसे महत्त्व दिले नाही पण रोनाल्ड ए. फिशर ह्या दिग्गज संख्याशास्त्रज्ञाला तिची उपयुक्तता पटली होती. त्यांनी समाश्रयण किंवा प्रतिगमन विश्लेषणात (Regression Analysis) गॉसेट यांच्या टी–वितरणाचा वापर कुशलतेने केला. कुठल्याही विषयातील संशोधनात परिकल्पना चाचणी (Hypothesis Testing) तसेच प्रत्यक्ष उपयोजनासाठी गॉसेट यांचे हे सांख्यिकी योगदान कळीचे ठरले आहे.
संदर्भ :
- https://www.encyclopediaofmath.org/index.php/Gosset,_William_Sealy
- https://www.jstor.org/stable/2683648?seq=1#page_scan_tab_contents
समीक्षक : विवेक पाटकर