गॅलप, जॉर्ज : (१८ नोव्हेंबर, १९०१ – २६ जुलै, १९८४) जॉर्ज गॅलप यांचा जन्म व शिक्षण अमेरिकेच्या आयोवा राज्यातील जेफर्सन येथे झाले. त्यांनी पदवी, पदव्युत्तर आणि पीएच. डी. चे शिक्षण हे सर्व उपयोजित मानसशास्त्रातील घेतले असून ते आयोवा विद्यापिठातून प्राप्त केले. ते ड्रेक, नॉर्थवेस्टर्न आणि कोलंबिया विद्यापीठांत पत्रकारिता आणि जाहिरातीसंबंधीचे अभ्यासक्रम शिकवीत असत. सर्वात प्रथम राष्ट्रीय पातळीवरील अनेक नियतकालिकातील जाहिरातींचा त्यांनी आढावा घेतला आणि कोणती जाहिरात सगळ्यात लक्षवेधी आहे ह्याचे सर्वेक्षण करून कारणमीमांसा केली. नंतर ते यंग अँड रुबिकॅम ह्या न्यूयॉर्कमधील जाहिरात कंपनीत रुजू झाले. तिथे ते विपणन आणि प्रतिकृतीसंबंधी संशोधन (Marketing and Copy research) ह्या विभागाच्या प्रमुखपदी होते. तिथे त्यांनी सूक्ष्म अर्थशास्त्रीय (microeconomics) पद्धत विकसित केली, ज्यामुळे कंपनीला ग्राहकांच्या स्वभावांचा जास्तीतजास्त उपयोग करुन कंपनीची कामगिरी उंचावता आली. त्यांनी विकसित केलेल्या या तंत्राचा उपयोग त्यांनी प्रथम राष्ट्रभरातील रेडिओच्या श्रोत्यांच्या आवडीचे मोजमाप करण्यासाठी केला. त्यानंतर त्यांनी प्रभाव पद्धती (impact method) व परत परत आठवण करुन देण्याची प्रक्रिया (recall procedure) वापरून दूरदर्शन व छापील जाहिरातींच्या परिणामांची मोजणी केली.

गॅलप यंग अँड रुबिकॅममध्ये असतानाच त्यांनी निवडणुकीच्या अंदाजासंबंधीच्या संशोधनाला सुरुवात केली. त्यावरून निवडक लोकमतांच्या आधारे अंदाज वर्तवण्याची त्यांनी एक संख्याशास्त्रीय पद्धत विकसित केली. त्यांच्या सासूबाई आयोवा राज्यातील स्त्री-सचिवाची निवडणूक लढवत होत्या, त्यावेळी त्यांना मदत करण्याच्या हेतूने हे तंत्र विकसित करण्याची प्रेरणा गॅलप यांना मिळाली. त्यांच्या अंदाजानुसार ती निवडणूक त्या जिंकल्या सुद्धा! पुढे गॅलप यांनी अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियन अशी स्वत:ची कंपनी स्थापन केली जी पुढे गॅलप पोल या नावाने संबोधली जाऊ लागली. तिचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी विशेष हितसंबंध असलेल्या गटासाठी किंवा प्रायोजित केलेल्या कार्यक्रमासाठी काम करायचे नाही असा दंडक घातला. सामुहिक लोकमत हे सहसा तार्किक आणि योग्य असते आणि ते फार कमी प्रमाणात भावनिक असते, हा दृष्टीकोन गॅलप यांनी सांगितला होता.

सन १९३६ मधील अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या वेळी रिपब्लिकन पक्षाकडून आल्फ्रेड लँडन तर डेमोक्रॅटिक पक्षाकडून फ्रँक्लीन डी. रूझवेल्ट निवडणूक लढवत होते. द लिटररी डायजेस्ट या नामांकित नियतकालिकाने असे वर्तवले होते की लॅन्डन ह्यांना ५७% तर रुझवेल्ट ह्यांना ४३% मते मिळतील. ह्या निष्कर्षासाठी त्यांनी खूप मोठ्या संख्येचा नमुना वापरला ज्यात जवळजवळ २.४ लाख लोकांची मते अजमावली होती. त्या उलट यादृच्छीक पद्धतीने काटेकोरपणे केवळ ५०,००० लोकांची निवड केलेला नमुना वापरून गॅलप ह्यांनी रूझवेल्ट ही निवडणूक जिंकतील असा अंदाज वर्तवला होता आणि तो खरा ठरला. या निवडणुकीच्या निमित्ताने विविध नियतकालिकांत, वृत्तपत्रात जे लेख प्रसिद्ध होत होते त्यात गॅलप मतचाचपणीचा नेहमी उल्लेख असायचा. त्यामुळे गॅलप मतचाचपणी घराघरांत पोहचली. मात्र १९४८ ची राष्ट्राध्यक्षाची निवडणूक कोण जिंकेल याचा त्यांनी केलेला अंदाज सपशेल चुकला. याला कारण म्हणजे निवडणुकीच्या दिवसाच्या तीन आठवडे आधीच त्यांनी लोकांची मतचाचपणी करणे थांबवले होते.

सन १९४७ साली त्यांनी गॅलप इंटरनॅशनल असोसियेशन ही मते अंदाजित करणाऱ्या संस्थांची एक शिखर संस्था स्थापन केली. १९५८ साली त्यांनी गॅलप ऑर्गनायझेशन अशी एक संस्था स्थापून त्यांच्या सर्व संस्थांना एका छत्राखाली आणले.

चित्रपटाच्या यशासंबंधी अंदाज बांधण्याचा कार्यक्रमसुद्धा त्यांनी हाती घेतला. त्यातून त्यांनी तिकीट विक्रीतून किती पैसा गोळा होईल ह्याचा आगाऊ अंदाज वर्तवला. ह्या संशोधनाचा चित्रपट उद्योगाला खूप फायदा झाला.

त्यांनी आंतरराष्ट्रीय मूल्यांसंबधी अभ्यास केला. त्यात सगळ्या यूरोपियन देशांच्या सामाजिक, तात्त्विक आणि धार्मिक दृष्टीकोनांच्या अभ्यासाचा समावेश होता. पुढे त्यांनी जगातील सर्व ठिकाणच्या जीवनमानाचा दर्जा मोजणे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. ते नेहमी हिरीरीने सांगत की आयुष्य जगण्याच्या शेकडो पद्धती आहेत; त्या सर्व पद्धतींचा अभ्यास झाला पाहिजे.

त्यांच्या हयातीत द गॅलप पोल कंपनीने महत्त्वाच्या विषयांना हात घातला. उदा., शैक्षणिक सुधारणा करणे, फौजदारी न्याय प्रणाली किंवा उच्य राजकीय कार्यालयासाठी सक्षम व्यक्तीची निवड करणे यासाठी त्यांनी नेहमीच लोकमताचा शोध घेतला. गॅलप यांच्या नावावर नमुना निवड, सर्वेक्षण पद्धती आणि प्रश्नावली संरचना अशा विषयांवर अनेक दर्जेदार शोधलेख आणि पुस्तके आहेत.

लोकांची इच्छा, दृष्टीकोण व मते कशी जाणून घ्यायची हे ते जन्मभर शिकत व शिकवत होते. आज जगभर त्यांच्या कंपनीच्या ३० कार्यालयांत २,००० व्यावसायिक आणि इतर कर्मचारी काम करतात. त्यांच्याकडून नेत्यांना किंवा संस्थांना समस्या सोडवण्यासाठी सल्ले दिले जातात. ते सल्ले अचूक ठरण्यासाठी अब्जावधी ग्राहक, विद्यार्थी आणि नागरिक ह्यांच्या मतांची सांख्यिकी शिस्तीने पाहणी केली जाते.

लाईफ ह्या संस्थेच्या पहाणीत २० व्या शतकातील १०० महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये गॅलप गणले गेले होते. सर्वकाळ १०० प्रभावी अमेरिकन व्यक्तिमत्वापैकी ते एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले गेले.

स्वित्झर्लंड येथे त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

संदर्भ

समीक्षक : विवेक पाटकर