गेलमन, अँड्र्यू : (११ फेब्रुवारी, १९६५ – ) अँड्र्यू गेलमन यांचा जन्म अमेरिकेतील पेनसिल्वानिया राज्यातील फिलाडेल्फिया या शहरी झाला. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मॅसॅच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉंलॉजी (एमआयटी) ह्या प्रख्यात संस्थेमध्ये झाले. गणित व भौतिकशास्त्र हे त्यांचे विषय होते. त्यांनी हॉर्वर्ड विद्यापीठातून सांख्यिकी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर तिथेच डोनाल्ड रुबीन यांच्या मार्गदर्शनाखाली गेलमन यांनी सांख्यिकी विषयात पीएच्.डी. पूर्ण केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता ‘इमेज रिकन्स्ट्रक्शन फॉर इमिशन टोमोलॉजी.’
सध्या गेलमन कोलंबिया विद्यापीठात सांख्यिकी व राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून सांख्यिकी उपयोजन केंद्राचे अध्यक्षही आहेत. सदर केंद्रात कोलंबिया विद्यापीठातील अनेक विभागांचे त्याचप्रमाणे इतर संशोधकांच्या वैयक्तिक प्रकल्पांचे सुद्धा कामकाज चालते. संख्याशास्त्र व राज्यशास्त्र लोकाभिमुख करण्यावर त्यांचा कटाक्ष आहे. सांख्यिकी प्रारूपे विशेषकरून श्रेणीबद्ध प्रारूपे (Hierarchical Models), प्रासंगिक अनुमान (Casual Inference), बेसियन सांख्यिकी (Bayesian Statistics) यांचा त्यांनी विकास आणि उपयोजन करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.
ते समाजशास्त्रातील व संख्याशास्त्रातील संख्यात्मक अनुमान काढणारे आघाडीचे संशोधक आहेत. त्यांना त्यांच्या कामासाठी असंख्य मान-सन्मान मिळाले आहेत. त्यांपैकी अमेरिकन पोलिटिकल सायन्स रिव्ह्यू या नियतकालिकात छापून आलेल्या सर्वोत्कृष्ट लेखाचे बक्षीस आणि सांख्यिकी संस्थांच्या अध्यक्षीय परिषदेकडून चाळीस वर्षाखालील व्यक्तीस उत्कृष्ट योगदानाबद्दल दिले जाणारे पारितोषिक, तीन वेळा अमेरिकन सांख्यिकी परिषदेकडून देण्यात येणारा उत्कृष्ट सांख्यिकी उपयोजन पुरस्कार, हे सन्मान महत्त्वाचे आहेत.
गेलमन यांनी संख्याशास्त्रीय पद्धतीवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. ते बेसियन डेटा ॲनालिसीस ह्या पुस्तकाचे सहलेखक आहेत. नंतर त्यांनी टिचिंग स्टॅटिस्टीक्स : ए बॅग ऑफ ट्रिक्स हे पुस्तक लिहिले. अनेक उदाहरणांचा समावेश केल्यामुळे हे पुस्तक संख्याशास्त्र शिकणाऱ्या आणि शिकवणाऱ्या दोघांनाही सहाय्य करणारे झाले आहे. पुढे त्यांनी डेटा ॲनालिसीस युजिंग रिग्रेशन अँड मल्टीलेव्हल/हायराल्किअल मॉडेल हे पुस्तक त्यांनी चार भागात लिहिले. नंतर त्यांनी क्वान्टीटेटीव्ह मॉडेल्स अँड मेथडस इन सोशल सायन्सेस ह्या पुस्तकात समाजशास्त्रज्ञ ऐतिहासिक आधारसामग्री कुठून व कशी मिळवतात हे अर्थशास्त्रज्ञाला माहित करुन घेणे आवश्यक आहे तर राज्यशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रज्ञ कसा विचार करतात हे समाजशास्त्रज्ञाने जाणून घेणे आवश्यक आहे याची चर्चा केली आहे. त्यानंतर त्यांनी रेड स्टेट, ब्ल्यू स्टेट, रिच स्टेट, पुअर स्टेट : व्हाय अमेरिकन्स व्होट द वे दे डू हे पुस्तक लिहिले ज्यात त्यांनी अमेरिकन लोकांच्या मतदानाच्या विविध आकृतीबंधाबद्दल (patterns) चिकित्सापूर्ण विवेचन केले आहे.
गेलमन यांच्या संशोधन विषयांचा आवाका खूप मोठा आहे. उदाहरणार्थ, मतदान करण्याची योग्यता/अयोग्यता, निवडणूक प्रचाराच्या वेळी लोकांची अनिश्चित मते आणि निवडणुकीचा अंदाज, निवडणुकीत एक मत निर्णायक ठरण्याची संभाव्यता, आणि सामाजिक जाळ्यांची (social network) संरचना.
मॅथेमॅटिक्स २०१५ या नियतकालिकात त्यांचा स्टॅटिस्टीकल क्रायसिस इन सायन्स हा उत्तम लेख म्हणून निवडला गेला. तर २०१६ साली त्यांना तोच सन्मान व्हाय ॲकनॉलेजिंग अनसर्टिनिटी कॅन मेक यू बेटर सायंटिसस्ट या लेखासाठी मिळाला.
संदर्भ :
समीक्षक : विवेक पाटकर