मेनन, एम. शारदा : (५ एप्रिल १९२३ – ५ डिसेंबर २०२१) शारदा एम मेनन यांचा जन्म मल्याळी कुटुंबात कर्नाटकातील मंगलोर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण चेन्नईच्या गुड शेफर्ड स्कूल आणि नंतर क्राइस्ट चर्च अँग्लो-इंडियन उच्च माध्यमिक विद्यालयात झाले. शाळेत असल्यापासून माणसे अशी का वागतात? हा प्रश्न त्यांना पडे. त्यांनी महिला ख्रिश्चन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. नंतर चेन्नईच्या मद्रास मेडिकल कॉलेजमधून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या जगजीवनराम (तेव्हाचे आयर्विन) रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी उमेदवारी केली. यावेळी त्यांना मनुष्यस्वभावाचे अनेक कंगोरे अभ्यासण्यास मिळाले. जेव्हा त्यांनी मनोरुग्ण विभागात एका १६ वर्षांच्या मुलीची दयनीय अवस्था पाहिली तेव्हा मात्र त्यांनी मानसोपचाराकडे वळण्याच्या निर्णय घेतला. अशा रुग्णांना पूर्वी फक्त गुंगीची औषधे दिली जात मात्र तीन तासांत त्यांचा परिणाम उतरायचा. त्यामुळे या मुलीला पूर्ण बरी झालेली नसतानाच घरी पाठवले गेले होते.
पुढे त्या आंध्र प्रदेशातील पित्तापुरम मिशन हॉस्पिटलमध्ये कारकीर्द सुरू करून मद्रास वैद्यकीय सेवेत रुजू झाल्या. त्यांनी बेंगळुरू येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ, आताचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेसमध्ये (निम्हन्स) मानसोपचार शास्त्रातील डिप्लोमा पूर्ण केला आणि त्या भारतातील पहिल्या महिला मानसोपचारतज्ज्ञ ठरल्या. त्या वेळी आप्तेष्टांनी वेड्यांची डॉक्टर होण्यास विरोधच केला होता, पण निग्रहाने त्यांनी स्वत:चे वैद्यकीय ज्ञान मानसोपचाराच्या दिशेने वळवले. या प्रशिक्षणानंतर त्या किलपौक येथील मद्रास मेंटल रुग्णालय (आताचे इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ) या मानसिक आरोग्य संस्थेत रुजू झाल्या तसेच त्या तेथील पहिल्या महिला अधीक्षक झाल्या. येथे त्या १८ वर्षांहून अधिक काळ अधीक्षक पदावर कार्यरत होत्या. त्यांच्या कार्यकाळातच संस्थेने मानसोपचार विभाग सुरू केला, बाह्यरुग्ण सुविधा सुरू केला आणि त्यांच्या प्रयत्नाने राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये प्रादेशिक मानसोपचार केंद्रे स्थापन झाली.
शारदा मेनन यांनी ज्या काळात रुग्णांवर मानसोपचार सुरू केले त्याकाळात मनोरुग्णांना केवळ गुंगीचे औषध दिले जात असे. जे मानसिक रुग्ण आक्रमक होत असत त्यांना काही वेळा पलंगाला बांधून ठेवणे, बेड्या ठोकणे अशा टोकाच्या कृती केल्या जात. असे रुग्ण कुटुंबियांकडूनही वाऱ्यावर सोडून दिले जात. त्यानंतर १९५० च्या दशकात क्लोरोप्रोमाझिनच्या आगमनाने मनोविकार, विशेषतः स्किझोफ्रेनिकच्या रुग्णांच्या उपचारांमध्ये विलक्षण सुधारणा झाली. या औषधामुळे, असे रुग्ण हळुहळू बरे होतील, त्यांची आक्रमकताही कमी होईल असा विश्वास डॉक्टरांमध्ये निर्माण झाला. परिणमतः त्याच्या वापराने रुग्णांची लक्षणे नियंत्रणात येऊ लागली आणि रुग्ण अधिक सक्षम होऊ लागले.
शारदा मेनन यांनी मानसिक आरोग्यावर अनेक शोधनिबंध लिहिले आहेत. त्यांनी रेड क्रॉस सोसायटीच्या चेन्नई शाखेच्या उपाध्यक्षा म्हणून काम केले आणि तुरुंग सुधारणा प्रस्तावित करण्यासाठी स्थापन केलेल्या राज्य सरकारच्या समितीच्या त्या सदस्य होत्या. मानसिक आजार असलेल्या रुग्णांच्या पुनर्वसनासाठी सामाजिक संस्थांच्या सहभागाची सुरुवात करण्यामागे शारदा मेनन यांची प्रमुख भूमिका होती. १९८४ मध्ये, त्यांनी, काही समविचारी लोकांसह, स्किझोफ्रेनिया आणि इतर मानसिक आजाराने पीडित लोकांच्या पुनर्वसनासाठी स्किझोफ्रेनिया रिसर्च फाउंडेशन (SCARF) ही संस्था स्थापन केली. काही वर्षांत, मानसिक विकारांविरुद्ध लढा देणारी ही भारतातील प्रमुख संस्था बनली आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक आरोग्य संशोधन आणि प्रशिक्षणासाठी सहयोगी केंद्र म्हणून मान्यता दिलेल्या काही भारतीय संस्थांपैकी ही एक आहे.
या क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीमुळे शारदा मेनन यांना पद्मभूषण, तामिळनाडू सरकारचा सर्वोत्कृष्ट डॉक्टर पुरस्कार, भारत सरकारचा सर्वोत्कृष्ट नियोक्ता पुरस्कार, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ सायको-सोशल रिहॅबिलिटेशनचा विशेष पुरस्कार, तामिळनाडू सरकारचा अव्वैय्यार पुरस्कार, मद्रास न्यूरो ट्रस्टच्या जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ९८ वर्षांचे समाधानी आयुष्य जगून शारदा मेनन चेन्नई येथे निवर्तल्या.
संदर्भ :
- https://thelogicalindian.com/mentalhealth/know-about-dr-sarada-menon-indias-first-woman-psychiatrist-and-longest-serving-head-of-institute-of-mental-health-32431?infinitescroll=1
- https://www.loksatta.com/sampadkiya/vyakhtivedh/profile-sharda-menon-akp-94-2710354/
- https://www-shethepeople-tv.translate.goog/shestars/who-was-dr-sarada-menon-india-first-woman
- https://www-news9live-com.translate.goog/india/dr-sarada-menon-mental-health-pioneer-indias-first-woman-psychiatrist-passes-away-obituary-legacy-139904?_x_tr_sl=en&_x_tr_tl=mr&_x_tr_hl=en-GB&_x_tr_pto=sc
समीक्षक : अनिल गांधी