लीकी,  रिचर्ड अर्स्किन फ्रेअर : (१९ डिसेंबर, १९४४ – २ जानेवारी, २०२२) रिचर्ड अर्स्किन फ्रेअर लीकी यांचा जन्म नैरोबी येथे झाला. त्यांची आई मेरी आणि वडिल लुई पुरामानववंशवशास्त्रज्ञ होते. शालेय शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर त्यांनी केनियामधे वन्य श्वापदे पहायला येणाऱ्या पर्यटकांसाठी सहली आयोजित करण्याच्या व्यवसायाला वयाच्या सतराव्या वर्षी सुरूवात केली. विमान चालवण्याचा परवानाही मिळवला.

त्याच वेळी एकीकडे केनिया-टांझानिया सीमेवरील नॅट्रॉन सरोवराजवळ मानवाच्या पूर्वजांचे जीवाश्म शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जीवाश्म शोधण्यातला आनंद त्यांनी अनुभवला, तरी शिक्षण न घेतल्याने निष्कर्ष काढण्यात आपण कमी पडतो याचीही त्यांना जाणीव झाली. त्यामुळे शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवून त्यांनी इंग्लंडमधील महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण शिक्षणात मन न लागल्याने वर्षभरातच ते केनियाला परत आले.

रिचर्ड यांचे वडिल लुई यांनी इथिओपियामधील ओमो नदीच्या काठावर उत्खनन सुरू केले. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते तेथे जाऊ शकले नाहीत. म्हणून त्यांनी रिचर्ड यांना तिथल्या संशोधनाची जबाबदारी दिली. पुढे रिचर्ड यांनी दोन दशके तुर्काना सरोवराजवळील कुबी फोरा टेकडीच्या परिसरात मानववंशाच्या जीवाश्मांवर संशोधन केले. होमो हॅबिलिस आणि होमो इरेक्टस या दोन्ही विलुप्त मानवी जाती पूर्व आफ्रिकेत पाच लाख वर्षे एकत्र अस्तित्वात होत्या असे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे होमो हॅबिलिसपासून होमो इरेक्टस ही जात उत्क्रांत झाली हा आधीचा सिद्धांत बाद झाला. आपल्या संशोधनात दीड लाख वर्षांपूर्वीच्या होमो इरेक्टस जातीच्या सुमारे नऊ वर्षांच्या एका मुलाच्या बऱ्यापैकी परिपूर्ण सांगाड्याचा शोध त्यांना लागला. असा परिपूर्ण जीवाश्म सांगाडा मिळणे दुर्मिळ असल्याने त्यांचा हा शोध महत्त्वपूर्ण  मानला जातो. तुर्कानाचा छोकरा या नावाने हा सांगाडा ओळखला जातो.

रिचर्ड केनिया राष्ट्रीय संग्रहालयाचे २२ वर्षे संचालक होते. नंतर त्यांची नेमणूक केनियाच्या वन्यजीव संवर्धन आणि व्यवस्थापन विभागाच्या संचालकपदी झाल्यानंतर त्यांनी वन्यजीवांच्या संवर्धनाकडे, आणि विशेषत: हस्तिदंताच्या तस्करीसाठी होणाऱ्या हत्तींच्या हत्त्या थांबवण्याकडे लक्ष केंद्रित केले. या कामातील त्यांच्या कर्तव्यकठोरतेमुळे त्यांनी तस्करांचा आणि हितसंबंधी राजकारण्यांचा रोष ओढवून घेतला. ते स्वत: चालवत असलेल्या विमानाला अपघात झाला, तेव्हां घातपाताचा संशय व्यक्त केला गेला, पण तो सिद्ध होऊ शकला नाही.

अपघातातून ते बचावले, पण त्यांच्या दोन्ही पायांचा गुडघ्यापासून खालचा भाग कापून टाकावा लागला. उर्वरित आयुष्य त्यांना कृत्रिम पायांच्या सहाय्याने जगावे लागले. तरीही वर्षभरात त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. व्यथित मनाने त्यांनी राजीनामा दिला, आणि वन्यजीव संवर्धनाच्या लढ्यासाठी समविचारी मित्रांना घेऊन सफिना नावाचा नवा राजकीय पक्ष काढला. पुढे ते केनियाच्या संसदेवर गेले आणि अध्यक्ष डॅनिएल मोई यांच्या भ्रष्ट कारभारावर सातत्याने टीका करू लागले. परिणामस्वरूपी विरोधकांनी त्यांना मारहाणही केली.

या सुमारास भ्रष्ट कारभारामुळे केनियाला मिळणारी आंतराष्ट्रीय मदत बंद झाली, तेव्हां आंतरराष्ट्रीय दबावाखाली मोई यांनी रिचर्ड यांची नेमणूक मंत्रिमंडळाच्या सचिवपदी केली. त्यांच्याकडे सार्वजनिक सेवा विभागाच्या प्रमुखपदाचा भारही सोपवण्यात आला. दोन वर्षे त्यांनी ही पदे सांभाळली.

संशोधनाबरोबरच वन्यजीव संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या भरघोस प्रयत्नांची नोंद रिचर्ड यांना विविध पारितोषिकांनी सन्मानित करून करण्यात आले.

संदर्भ :

समीक्षक : विद्याधर बोरकर