सामान्यपणे दैनंदिन जीवनामध्ये बुद्धी हा शब्द अनेक वेळा वापरला जातो. तसेच ‘बुद्धिमत्ता’ हा शब्द वेगवान गतीने शिकणे आणि समजून घेण्यासाठी, प्रखर स्मरणशक्ती आणि तार्किक विचारांसाठी वापरला जातो. ‘बुद्धी’ हा शब्द सामान्य अर्थाने वेगळा असल्याने मानसशास्त्रज्ञांनी तो विशिष्ट अर्थाने वापरला आहे. बुद्धिमापन क्षेत्रात बीने यांनी केलेले सर्वांत मोठे कार्य म्हणजे मानसिक वयाचा शोध होय. जन्मतारखेवरून व्यक्तीचे शारीरिक वय काढता येते; पण मानसिक वय शोधून काढण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्यांचा उपयोग करावा लागतो. परिणाम श्रेणीत बरोबर सोडविलेल्या प्रश्नांच्या संख्यांवर व्यक्तीचे मानसिक वय अवलंबून असते. मानसिक वय शोधून काढले की, त्यावरून त्या मुलाचा मानसिक विकास किती झाला आहे, याचा अंदाज येतो. अनेक मुलांच्या बुद्धिची तुलना त्याच्या मानसिक वयाच्या आधारे करता येते; मात्र तो मुलगा किती बुद्धिमान आहे, हे केवळ मानसिक वयाच्या आधारे सांगता येत नाही. बुद्धिमापनासाठी मानसिक वयाबरोबरच जन्म वय (शारीरिक वय) माहित असणे गरजेचे असते. व्यक्तीचा शारीरिक विकास जसा होत असतो, तसाच मानसिक विकासही होत असतो. व्यक्तीच्या जन्म वयाच्या सोळाव्या वर्षी साधारणपणे मानसिक विकास पूर्ण झालेला असतो.
जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्न यांनी बुद्धी गुणांक ही कल्पना मांडून सर्वप्रथम मानसिक गुणोत्तर हा शब्दप्रयोग केला. मानसिक वय आणि जन्म वय यांच्या भागाकारास स्टर्न यांनी मानसिक गुणोत्तर ही संज्ञा वापरली. दोन व्यक्तींच्या बुद्धिची तुलना करण्यासाठी या गुणोत्तराचा वापर या मानसशास्त्रज्ञांनी केला. दोन व्यक्तीत हे मानसिक गुणोत्तर ज्याचे जास्त असेल, तो बुद्धिमान आणि ज्याचे कमी असेल, तो कमी बुद्धीचा असे समजले जाते. त्यानंतर टर्मन या मानसशास्त्रज्ञांनी बुद्ध्यंक असा शब्दप्रयोग केला. मानसिक गुणोत्तरातील अपूर्णांक कमी व्हावा म्हणून मानसिक गुणोत्तरास शंभर या संख्येने गुणले जाते. त्यास बुद्ध्यंक असे म्हणतात.
बुद्धी गुणांक = मानसिक वय / जन्म वय ˣ १००
IQ = M. A. / C. A. ˣ 100
(IQ ꞉ Intelligence Quotient; M. A. ꞉ Mental Age; C. A. ꞉ Chronological Age)
वरील सूत्रावरून असे स्पष्ट होते की, बुद्धी गुणांक हे मानसिक वय आणि जन्म वय यांचे गुणोत्तर असते. बुद्धी गुणांकामुळे जन्म वय व मानसिक वय यांच्यातील वाढ समप्रमाणात होते की, नाही ते कळते. समप्रमाणात होत असेल, तर बुद्धी गुणांक १०० राहतो. एखाद्या मुलाचा बुद्धी गुणांक १०० असेल, तर तो सर्वसामान्य बुद्धीचा ठरतो. यापेक्षा खूप कमी असेल, तर मंदबुद्धीचा व खूप जास्त असेल, तर अलौकिक बुद्धीचा असा निष्कर्ष बुद्धी गुणांकामुळे काढता येतो. मानसिक वय व बुद्ध्यंक हे दोन वेगवेगळे संबोध आहेत. उदा., एका विद्यार्थ्याचे वय ९ आहे; परंतु तो विद्यार्थी १२ वर्षे वयाच्या विद्यार्थ्याएवढे काम करतो, म्हणजे त्याचे मानसिक वय १२ आहे. म्हणून त्याचा बुद्ध्यंक १३३.३३ आहे. बुद्ध्यंकावरून त्या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता लक्षात येते. बुद्धिची वाढ सामान्यत꞉ १६ ते १८ वयापर्यंत होते. प्रत्येकाचा बुद्ध्यंक कायम असतो. एखाद्या विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता किती आहे, हे त्याच्या बुद्ध्यंकावरून समजते.
बीने यांनी बुद्धिमापनाच्या क्षेत्रात केलेल्या अनन्यसाधारण योगदानामुळे त्यांना बुद्धिमापन पद्धतीचा जनक असे संबोधले जाते. या परिमाण श्रेणीचा उपयोग इतर मानसशास्त्रज्ञांनी आपापल्या देशात केलेला दिसून येतो. स्थलकालानुसार त्यांनी या चाचणीत फेरबदल केले. इंग्लंडमध्ये बर्ट, अमेरिकेत टर्मन आणि गोगार्ड, भारतात राइस आणि कामत यांनी बुद्धिमापन कसोट्या तयार केल्या.
टर्मन यांनी खालील प्रमाणे बुद्धी गुणांकावरून वर्गीकरण केलेले आहे.
बुद्ध्यंक | वर्गीकरण | प्रमाण (टक्क्यांमध्ये) |
१४० व त्यापेक्षा जास्त | अलौकिक बुद्धी | १.५ |
१३० ते १२९ | असामान्य बुद्धी | ३.५ |
१२० ते १२९ | कुशाग्र बुद्धी | ९ |
११० ते ११९ | शिघ्र बुद्धी | १५ |
९० ते १०९ | सामान्य बुद्धी | ४२ |
८० ते ८९ | उपसामान्य बुद्धी | १५ |
७० ते ७९ | अतिसामान्य बुद्धी | ९ |
६० ते ६९ | अल्पबुद्धी | ३.५ |
४० ते ५९ | मंदबुद्धी | – |
२० ते ३९ | जडबुद्धी | १.५ |
२० पेक्षा कमी | निर्बुद्ध | – |
वरील तक्त्यावरून आलेख काढला, तर तो प्रसामान्य संभव वक्र येतो. एकूण संख्येत अलौकिक बुद्धीचे, तसेच निर्बुद्धीचे कमी आढळून येतात. सामान्य बुद्धीच्या लोकांचे प्रमाण नेहमीच जास्त असलेले दिसून येते.
संदर्भ ꞉
- के. सुभाष कुमार, शैक्षणिक मानसशास्त्र, नागपूर, २००९.
- दांडेकर, वा. ना., शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र, पुणे, २००७.
- नानकर, प्र. ल.; शिरोडे, संगीता, सुबोध शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र, पुणे, २००९.
- पंडित, र. वि., शैक्षणिक मानसशास्त्र, नागपूर, २००६.
- Crow, Lester D.; Crow, Alice, Educational Psychology, New Delhi, 1968.
समीक्षक ꞉ ह. ना. जगताप