अध्यापन कार्य यशस्वीपणे पार पडण्यासाठी शिक्षणक्षेत्रात उदयास आलेली एक नवीन संकल्पना किंवा दृष्टिकोण. ही संकल्पना जटिल मानव-यंत्रणेच्या संदर्भातील संशोधन आणि विकासाच्या संदर्भात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात उदयास आली. पूर्वी या प्रणालीचा वापर उद्योग व व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये केला जात होता; मात्र आता शिक्षणक्षेत्रात शिक्षणाचे व्यवस्थापन, नियंत्रण आणि तिच्या प्रक्रिया व निष्पत्तीमधील सुधारणेसाठी कार्यनीती म्हणून या प्रणाली उपागमाचा विकास झाला. प्रणाली उपागम ही संकल्पना प्रणाली व त्याच्या मूलभूत मापदंडांवर आधारित आहे. प्रणाली ही संज्ञा संपूर्णतेचा अर्थ, भाग किंवा घटक आणि स्व-नियमन यांमधील परस्पर संबंध दर्शविते.
व्याख्या ꞉
- अक्कोफ्फ यांच्या मते, ‘परस्परांशी संबंधित व परस्परावलंबी बाबींचा संच म्हणजे प्रणाली’.
- रोब्ब यांच्या मते, ‘प्रणाली म्हणजे विशिष्ट रितीने कार्य करणार्या घटकांचे पद्धतशीर संघटन होय’.
- जलालूद्दीन ए. के. यांच्या मते, ‘पूर्वनिश्चित आणि विशिष्ट उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी परस्परांशी संबंधित आणि परस्परावलंबी संघटित घटकांचा स्वनियमित आकृतिबंध असलेला गतिमान, संकीर्ण, एकात्म संघ म्हणजे प्रणाली होय’.
- वेबस्टर डिक्शनरीनुसार, ‘प्रणाली म्हणजे अनेक वस्तूंचा नियमित आंतरक्रिया करणारा किंवा परस्परावलंबी गट, जो एकात्म संघ तयार करतो’.
वैशिष्ट्ये ꞉ प्रणालीच्या व्याख्यांवरून तिची काही वैशिष्ट्ये लक्षात येतात.
- प्रणाली ही एक सामान्य संज्ञा असून तिचा वापर शिक्षण व अध्यापन यांसह अनेक क्षेत्रांमध्ये करता येतो.
- प्रणाली गतिशील असते, तिच्यामध्ये समष्टीवादी दृष्टिकोण असतो, ती एक सापेक्ष संकल्पना आहे.
- प्रणाली एक जटील परंतु परस्परसंबंधी व परस्परावलंबित्व घटकांचे पद्धतशीर संघटन असते.
- प्रणाली मुक्त, बंदिस्त किंवा उद्दिष्टाधिष्टित असते.
- प्रणालीवर सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम होत असतो.
- प्रणाली ही स्वयंशासित, स्वयंदेखभाल करणारी, स्वयंनियामक संरचना असून प्रत्याभरण हे प्रणालीचे आवश्यक वैशिष्ट्य आहे.
प्रकार ꞉ प्रणालीचे दोन प्रकार पडतात ꞉
- (१) नैसर्गिक प्रणाली ꞉ यामध्ये पचनसंस्था व सौर प्रणाली यांसारख्या निसर्गनिर्मित प्रणालींचा समावेश होतो. त्यांच्या कार्याचे माणसाकडून नियंत्रण करता येत नाही. त्यामुळे त्याच्या वर्तनाचे भाकीत करू शकत नाही.
- (२) मानवनिर्मित प्रणाली ꞉ यामध्ये दूरध्वनी प्रणाली, विद्युत प्रणाली, शिक्षण प्रणाली यांसारख्या प्रणालींचा समावेश होतो. या प्रणालींचे घटक व कार्ये नियंत्रनीय असतात. त्यामुळे त्यांच्या वर्तनाचे भाकीत करता येते.
घटक ꞉ कोणत्याही प्रणालीचे वर्णन हे अंतर्गमन, प्रक्रिया, बहिर्गमन आणि वातावरण या चार मूलभूत घटकांच्या साहाय्याने करता येते.
- (१) अंतर्गमन ꞉ अंतर्गमन म्हणजे प्रणालीमध्ये काय ठेवले जाते? उदा., सायकल तयार करणारा कारखाना ही एक मानवनिर्मित प्रणाली आहे. कारखान्यामध्ये काम करणारे कामगार, तंत्रज्ञ, व्यवस्थापकीय व्यक्ती, यंत्रे व साहित्य हे त्या प्रणालीचे घटक होत. येथे सायकल निर्मितीसाठी लागणारे साहित्य, नियुक्त केलेले कामगार व इतर व्यक्ती हे सर्व घटक अंतर्गमनात येतात.
- (२) प्रक्रिया ꞉ प्रक्रिया म्हणजे प्रणालीमध्ये काय चालले आहे? उदा., कारखान्यामध्ये साहित्याचे निष्पत्तीमध्ये रूपांतर करण्यासाठी चालणारी प्रक्रिया.
- (३) बहिर्गमन ꞉ बहिर्गमन ही प्रणालीची निष्पत्ती असते. उदा., सायकलची व उपकरणांची निर्मिती.
- (४) वातावरण ꞉ प्रणाली कार्यान्वित करतांना त्यात समाविष्ट सर्व भौतिक व सामाजिक घटकांचा वातावरणामध्ये समावेश होतो. उदा., सायकल निर्मितीचा कारखाना हा सामाजिक व भौतिक वातावरणामध्ये सुरू असतो आणि तो या वातावरणाच्या मर्यादांमुळे नियंत्रित केला जातो.
प्रणाली उपागम हे एक तंत्र आहे. या दृष्टिकोणातून समस्या संपूर्णतः विचारात घेतली जाते. पर्यावरणीय निर्बंध व पूर्वनिश्चित उद्दिष्टे, परस्परसंबंधित भागांचे कार्य विचारात घेऊन समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्या मूलभूत कामकाजात प्रणाली उपागम अंतर्गमन, प्रक्रिया, बहिर्गमन आणि वातावरणातील अडचणींवर वाजवी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. प्रणाली उपागम हे प्रणालीच्या विचारातून समस्या सोडविण्याचा मार्ग आहे. प्रणाली उपागम या प्रक्रियेद्वारे व्यक्तींच्या गरजा ओळखल्या जातात; समस्या निवडली जाते; समस्या निराकरणाच्या आवश्यकता ओळखल्या जातात; पर्यायातून उपाय निवडले जातात; पद्धती व मार्ग मिळविले जाऊन त्यांची कार्यवाही केली जाते; परिणामांचे मूल्यमापन केले जाते आणि आवश्यक त्या पुनर्रचना संपूर्ण प्रणालीमध्ये अथवा तिच्या भागांमध्ये केल्या जातात, ज्यामुळे गरजा पूर्ण होतात.
प्रणाली उपागम हे शैक्षणिक तंत्रविज्ञानाचे शैक्षणिक व प्रशिक्षणातील समस्यांवर पद्धतशीर उपयोजन, अंतर्गमन (पूर्ववर्तन) आणि बहिर्गमन (अंतिमवर्तन) यांपासून सुरुवात करून पूर्ववर्तनाकडून अंतिमवर्तनाकडे सर्वांत चांगल्या पद्धतीने कसे जावे, हे निश्चित करते. प्रणाली उपागमामध्ये उद्दिष्टे स्पष्ट करणे, एकमेकांशी आंतरक्रिया असलेल्या व एकमेकांवर अवलंबून असलेल्या घटकांमधील प्रक्रियेचे, सर्व घटकांशी सतत संप्रेषण साधणे, त्यांच्याकडून नियंत्रण आणि तात्काळ समायोजन करण्याचा प्रयत्न केला जातो. मानसशास्त्रातील वर्तनवादी दृष्टिकोण, समष्टिवादी दृष्टिकोण आणि संक्रांतीविज्ञान व जीवप्रणाली या संकल्पना करणीभूत ठरून त्यांच्या आधारानेच प्रणाली उपागमाचा उदय व विकास झालेला आढळतो.
सद्यस्थितीच्या विश्लेषणामध्ये प्रणालीचे विश्लेषण एकत्र करून प्रणालीचे घटक, त्यातील परस्पर संबंध, संघटन, कार्ये यांचा अभ्यास केला जातो. प्रणालीमध्ये एखादी समस्या जाणवत असेल, तर तिचे स्वरूप काय आहे? वस्तूस्थिती कशी आहे? अशा समस्यांचा अभ्यास केला जातो. प्रणालीची उद्दिष्टे निश्चित केली जातात. सध्याच्या परिस्थितीमध्ये नेमका कोणता बदल हवा आहे, हे निश्चित केले जाते. उद्दिष्ट प्राप्तीसाठी, यंत्रणा निश्चित करण्यासाठी काय केले पाहिजे, याचा निर्णय या पायरीवर घेतला जातो. उद्दिष्टे साध्य करण्यासाठी साधने, तंत्रे, पद्धती व उपागमांची निवड केली जाते. पर्यायी योजना तयार करण्याच्या पायरीवर समस्येच्या निराकरणासाठी संभाव्य अशा अनेक उकली असू शकतात. त्याच प्रमाणे एखादे उद्दिष्ट गाठण्यासाठी केवळ एकच एक व्यवस्था असेल असे नाही, तर अनेक पर्यायी योजना किंवा व्यवस्था असू शकतात. यातील आपल्याला सर्व दृष्टीने इष्टतम वाटेल अशा योजनांची निवड करायची असते. योग्य उकलींची किंवा योजनेची निवड यात समस्या सोडविण्यासाठी ज्या विविध उकली शोधलेल्या आहेत, त्यांपैकी कोणती उकल प्राप्त परिस्थितीत अधिक उपयुक्त आहे, हे ठरवावे लागेल. हे ठरवीत असताना उकलीची उपयुक्तता, व्यवहार्यता, इष्टतमता या गोष्टींचाही विचार करावा लागतो. तसेच या बाबी योजनेलाही लागू पडतात. प्रणाली संरचनेचे तपशील ठरविण्यात उद्दिष्ट प्राप्तीची यंत्रणा निश्चित झाली की, त्यांची रचना कशी करायची याचा तपशील ठरविणे आवश्यक असते. ही संरचना ठरविताना आपण प्रवाह तक्ता तयार केला, तर तो अधिक उपयुक्त ठरू शकतो. प्रवाह तक्त्यामध्ये करायच्या कृतींचा क्रम आणि त्यासाठी लागणारा वेळ या बाबी नमूद केल्या, तर संपूर्ण यंत्रणा राबविणे सोपे जाते. शेवटी संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करणे यात उद्दिष्ट प्राप्तीसाठी वेगवेगळ्या घटकांतून जी एक यंत्रणा तयार केलेली असते, तिला मूर्त रूप देणे किंवा ती प्रत्यक्ष कार्यान्वित करणे आवश्यक असते. या यंत्रणेमध्ये प्रत्याभरण मिळण्याची सोय करावी लागते. तसेच यंत्रणेचे नियमन करण्याची व्यवस्थाही विचारात घेतली जाते.
सभोवतालच्या परिसरामध्ये ओळखता येण्यासारख्या विविध प्रणाली आहेत, ज्या त्यांच्या परिसरापासून वेगळ्या करता येतात. प्रणाली उपागमामध्ये घेतले जात असलेले निर्णय हे उपलब्ध असलेल्या पर्यायी निर्णयांपैकीच असतात. या दोन गृहितकांवर प्रणाली उपागमाची रचना आढळते.
संदर्भ ꞉
- जगताप, ह. ना., प्रगत शैक्षणिक तंत्रविज्ञान आणि माहिती तंत्रविज्ञान, पुणे, २००९.
- येवले, सीमा, शैक्षणिक तंत्रविज्ञान आणि माहिती तंत्रविज्ञान, पुणे, २००७.
- Mangal, S. K.; Mangal, Uma, Essentials of Educational Technology, Delhi, 2014.
समीक्षक ꞉ के. एम. भांडारकर