रासायनिक कीटकनाशके वापराचा दुष्परिणाम, पर्यावरण व निसर्गचक्रासंदर्भातील एक पुस्तक. सायलेंट स्प्रिंग हे पुस्तक प्रख्यात सागरी जीवशास्त्रज्ञ, आधुनिक पर्यावरण संरक्षण मोहिमेच्या प्रणेत्या रेचेल कार्सन यांनी १९६२ मध्ये लिहिले. या पुस्तकाने जगभर खळबळ उडून तत्कालीन शेतीमध्ये रासायनिक कीटकनाशकांच्या अमर्यादित वापराविरुद्ध अमेरिकेसह संपूर्ण जगात मोठी चळवळ उभी राहिली. आज पर्यावरणशास्त्रात जे कळीचे विषय मानले जातात (उदा., हवामानातील बदल, समुद्र पातळीतील वाढ, हिमनगांचे वितळणे, ओझोनचा थर, आर्टिक व अंटार्टिक प्रांतातील बर्फाचे वितळणे, पक्षी, प्राणी, कीटक यांच्या संख्येत सातत्याने होणारी घट आणि एकूणच निसर्गचक्र) त्यांचा सखोल अभ्यास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचे लेखन शास्त्रोक्त पद्धतीने व पुरावे देऊन तपशीलवार केले आहे. या पुस्तकाव्यतिरिक्त रेचेल यांची अन्डर द सी विंड; द सी अराऊंड अस; द एज ऑफ द सी ही सागरी जैवविविधता व निसर्ग संरचना या विषयांवरची इतर पुस्तके जगन्मान्य झाली. सायलेंट स्प्रिंग या पुस्तकाला केवळ अमेरिकेतच नाही, तर जगभर प्रसिद्धी मिळाली.
सायलेंट स्प्रिंग या पुस्तकात लेखकांचे निसर्ग, जीवजंतू, पर्यावरण इत्यादीसंदर्भात मांडलेले निष्कर्ष व त्यांची ठाम भूमिका दिसून येते. त्यामुळे विज्ञान वर्तुळात, प्रशासनात व राजकारणातदेखील हे पुस्तक नावारूपास आले आहे; परंतु आधुनिक औद्योगिक व्यवस्था व व्यावसायिक शेतीवरील राष्ट्रीय धोरणांवर याचा परिणाम झाला नाही. इ. स. १९४५ नंतर अन्नधान्याचा तुटवडा असल्यामुळे अन्नोत्पादनाचा प्रश्न सोडविण्यासाठी हरितक्रांतीला गरजेचे असलेल्या साधनांचा शोध लागला. युद्धाला लागणार्या रणगाड्यांचे शेतकी अवजारांमध्ये रूपांतर केले गेले. अधिक उत्पादन देणार्या बियाणांचा, किटकनाशकांचा शोध लावला गेला. अन्नधान्याचा प्रश्न तातडीने सोडवला गेला; पण त्याचे दुष्परिणाम कोणाच्याही लक्षात आले नाही. या संभाव्य धोक्यांबद्दल सावध करण्याचे काम या पुस्तकाच्या लेखनात दिसून येते. रासायनिक किटकनाशकाच्या शेतातील फवारणीमुळे कीटक, शेतीला निरूपयोगी वाटणारे तण, पक्षी, बेडूक, लहानमोठ्या ओढ्यातील जलचर या सगळ्यांच्या एकूण संख्येमध्ये आणि जातींमध्ये प्रचंड प्रमाणावर घट झाली आहे. एकीकडे अन्नधान्याचा प्रश्न सुटत होता; पण त्याच बरोबर शेतीस आवश्यक असलेल्या नैसर्गिक घटकांवर विपरीत परिणाम झाल्याचे या पुस्तकात नमुद केले आहे.
सायलेंट स्प्रिंग या पुस्तकात सागरी जीवशास्त्र सागरी किनारपट्टी, नदीतून येणारा गाळ, नदी व सागराच्या संगमावर तयार होणारे त्रिभुज क्षेत्र, भूमी व सागर यांचा परस्परसंबंध व परस्परावलंबन, समुद्रकिनार्यावरचे जैववैविध्य इत्यादींचा सखोल अभ्यास दिसून येतो. याच बरोबर त्यात प्रगत देशांमध्ये भूक्षेत्रावर व समुद्रतळाशी होणारे भूगर्भीय बदल यांवरही लेखन आहे. सागरी जीव-जाती, समुद्रातील बेटांची निर्मिती कशी होते, नद्यातून येणार्या गाळाचा आणि पाण्याच्या तापमानाचा सागरी जीवसृष्टीवर होणारा परिणाम, क्षारयुक्ततेमधील बदल यांच्यावर होणारा परिणाम, त्यांचा जलचरांवर होणारा परिणाम इत्यादींची सखोल माहिती या पुस्तकात आली आहे. या पुस्तकातून रासायनिक कीटकनाशकांवर व तत्सम विषारी द्रव्यांवर सतत टीका केल्यामुळे अमेरिकेत अनेक कीटकनाशकांवर कायद्याने बंदी जाहीर केली. दुसर्या महायुद्धानंतर सर्वांत प्रसिद्ध असलेल्या डीडीटीवर, तसेच यासारख्या इतर अनेक कीटकनाशकांवर बंदी घातली गेली; तर काही किटकनाशकांच्या वापरावर नियंत्रण आणले गेले. एकूणच या तंत्रविज्ञानाचे दुष्परिणाम किंवा अशा रासायनिक द्रव्यांच्या अनिर्बंध वापरावर रेचेल यांनी अविरत झोड उठवली. हे सर्व लिखाण सौम्यपणे व संयम राखून केले असले, तरी समाजाच्या गळी उतरविण्यासाठी ते परखड शैलीत लिहिले आहे.
सायलेंट स्प्रिंग या पुस्तकात लेखकांनी जीव, पर्यावरण व निसर्ग यांबरोबरच एक मानवतावादी व नैतिक भूमिकादेखील मांडली आहे. निसर्गावर मात करण्याचा अधिकार मानवाला कुणी दिला? हा मानवाचा हक्क आहे का? मानवजात जर विचार करणारी आणि स्वतःच्या क्रियांची जबाबदारी घेणारी आहे, तर एकूण निसर्गाचे आणि जीव-जातींचे संरक्षण करणे ही मानवाची जबाबदारी नाही काय? मानवोपयोगी रसायने तयार करताना त्याच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गंभीर परिणामांवर नियंत्रण ठेवता येत नसेल, तर अशा विषयुक्त रसायनांचा वापर करणे नैतिकतेला धरून आहे काय? असे रोखठोक प्रश्न पुस्तकात दिसून येते. ‘सर्वच मानवी शोध हे खरोखरच मानवी हिताचे आहेत काय आणि चिरस्थायी विकासाला पूरक आहेत काय?’ यावरची कारणमीमांसा व लिखाण या पुस्तकामध्ये शास्त्रीय तत्त्व व सामाजिक जीवनमूल्य यांची सांगड घालून केल्याचे दिसते. कीटकनाशक व रासायनिक खतांचे उत्पादक आणि महामंडळांनी सायलेंट स्प्रिंग या पुस्तकाला कडाडून विरोध केला. शिवाय त्यांनी सरकारवर दबावदेखील आणला; परंतु लेखकांनी शास्त्रशुद्ध बुद्धीवादाने या विरोधावर मात केली. म्हणूनच त्यांच्या युक्तिवादाला सर्वमान्यता मिळाली.
वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकन वृत्तपत्रामधील एका लेखात ‘जैव-विविधतेच्या घटीमुळे होणार्या परिणामांमध्ये कीटकनाशके व मानवी कर्करोग यांचा संबंध आहे’ असे प्रतिपादन केले. या निष्कर्षाला नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ या संस्थेने दुजोरा दिल्यामुळे या विषयावरचे संशोधन मोठ्या प्रमाणात सुरू झाले. सायलेन्ट स्प्रिंग या पुस्तकाच्या १९६२ ते २००३ या काळात एकूण ४० आवृत्या निघाल्या.
एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील अमेरिकेतील पर्यावरणवादी प्रख्यात व्यक्तींच्या मालिकेतील १९६० च्या दशकातील रेचेल या सर्वांत प्रभावी शास्त्रज्ञा होत्या. स्वतंत्र पर्यावरण खाते प्रथम निर्माण करणारा अमेरिका हा जगातील प्रमुख देश असून त्याचे श्रेय प्रामुख्याने रेचेल यांना दिले जाते. त्यानंतर अनेक देशांमध्ये अमेरिकेतील कायद्यांच्या आधारावर प्रशासकीय यंत्रणा व कायदेप्रणाली यांची स्थापना झाली. भारतानेदेखील १९८६ मध्ये पर्यावरण सुरक्षा कायद्याची घोषणा केली आणि विज्ञान व तंत्रज्ञान या खात्याचे रूपांतर पर्यावरण व वनमंत्रालयाच्या स्वरूपात केले.
तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर हे मूळचे भुईमूग पिकविणारे शेतकरी. त्यांना रेचेल यांच्या कामाचे महत्त्व पटल्यामुळे त्यांनी रेचेल यांना आमंत्रित करून प्रेसिडेंशियल मेडल फॉर फ्रीडम हे पारितोषिक देऊन सन्मान केला. रेचेल यांच्या द सी अराऊंड अस या पुस्तकावर चित्रपट निघून त्यास १९५३ मध्ये अकॅडेमी अवॉर्ड फॉर द डॉक्युमेंट्री फीचर असा सन्मान मिळाला.
संदर्भ :
- जोशी, अंजली, सायलेन्ट स्प्रिंग आणि त्यानंतर…, पुणे, २०१५.
- लोंढे, लक्ष्मण, आणि वसंत पुन्हा बहरला, पुणे.
- Guha, Ramchandra; Juan, Martinez – Alier, Varieties of Environmentalism, London, 1997.
समीक्षक : संतोष दास्ताने