नव्यानेच स्थापन झालेल्या आणि अल्पावधितच वेगाने विकसित होणार्या उद्योगांना सूर्योदयी उद्योग असे म्हणतात. सूर्योदयी उद्योग ही एक कालसापेक्ष संकल्पना असून तिला उगवते उद्योग असेही म्हणतात. कोणत्याही अर्थव्यवस्थेचा विकास हा त्या त्या देशाच्या औद्योगिक नितीवर अवलंबून असतो. प्रत्येक देश उपभोक्त्यांच्या (देशी व परदेशी) गरजांच्या प्राधान्यक्रमानुसार उत्पादनाचे निर्णय घेतो; त्या अनुषंगाने औद्योगिक निती तयार करतो आणि अर्थव्यवस्थेच्या प्रकारानुसार त्याची अंमलबजावणी करत असतो. त्या आधारावर जे उद्योग उभे राहतात, ते सूर्योदयी ठरतात. उपभोक्त्यांच्या गरजांचा प्राधान्यक्रम बदलला की, उत्पादनाची व्यूहरचना बदलते. परिणामी उद्योगनिती बदलते आणि त्यातून उद्योगांचे स्थित्यंतर घडते. त्यामुळे काही उद्योग सूर्यास्ती (अस्त) होतात, तर काहींचा सूर्योदय होतो. म्हणजेच सूर्योदयी व सूर्यास्ती उद्योगांवर उपभोक्त्यांच्या गरजांचे प्राधान्यक्रम, शासनाची विकास धोरणे, तंत्रज्ञानातील बदल, आंतरराष्ट्रीय पातळीवरील धोरणांचे रचनात्मक बदल, वस्तू व सेवांच्या विक्रीबाबतच्या व्यूहरचना, नैसर्गिक आपत्तींतून होणारे उत्पादन क्षेत्रातील रचनात्मक बदल इत्यादी घटकांचे परिणाम होतात. या सर्व परिस्थितीला व्यापार व वाणिज्य भाषेत अडथळा म्हणतात. टोनी सेबा यांच्या मते, इ. स. १९०० मध्ये न्यूयार्क शहरात फक्त घोडागाडी होती; परंतु इ. स. १९१३ मध्ये तेथे फक्त कार दिसत होत्या. म्हणजेच कारने घोडागाडी बाजारातून बाहेर काढली. सरकारने घोडागाडीसाठी धोरणे बनविली होती; पण तांत्रिक बदलांमुळे घोडागाडी बाजारातून बाद झाली. सध्या बाजारात पेट्रोल व डिझेलसह विद्युतवर चालणाऱ्या वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसत आहे (२०२३). त्यामुळे तेल उत्पादन उद्योगांसह विद्युतीय वाहन उद्योग उदयास येत आहेत; परंतु कालांतराने पेट्रोल-डीझेलवर चालणारी वाहणे हळूहळू सूर्यास्ती होतील आणि चालकविना वाहनांची वाहन उद्योगक्षेत्रात नवीन क्रांती घडून ते सूर्योदयी उद्योग बनतील. काळानुसार संशोधन होऊन जेव्हा काही जुन्या वस्तू नवीन रूपात अद्ययावत होऊन येतात, तसेच त्यांच्याशी संबंधित नवीन उद्योगांची निर्मिती होते, तेव्हा काही उद्योग सूर्यास्ती होतात, तर काही उद्योग सूर्योदयी ठरतात. उदा., बाजारात २००० मध्ये आलेली कोडॅक कंपनी २००४ मध्ये नव्याने आलेल्या डिजीटल तंत्रज्ञानामुळे बाहेर फेकली गेली.
अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपान या देशांच्या प्रमुख अर्थव्यवस्थांचा विकास औद्योगिक धोरणांच्या अंमलबजावणीतून झाला. त्यांच्या पाठोपाठ आता चीन, दक्षिण कोरीया, रशिया, ब्राझिल या देशांची वाटचाल सुरू आहे. भारतीय अर्थव्यवस्थासुद्धा १९५६ पासून विकासकेंद्रित औद्योगिक नितीचा अवलंब करत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास १९९१ च्या आधीचा व त्यानंतरचा अशा दोन भागांमध्ये करावा लागतो. या काळातील विकास व्यूहरचना सूर्योदयी व सूर्यास्ती उद्योगांची स्थलांतरणे स्पष्ट करता येतात. दुसर्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिकीकरणाची पायाभरणी होऊन सार्वजनिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उद्योग ऊभे राहीले. यांना सरकारच्या संरक्षणनितीचा सुरक्षाकवच होता. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हे धोरण बर्याच अंशी सूर्योदयी होते; परंतु १९९१ पर्यंत यातील बरेच उद्योग या सुरक्षाकवचातून बाहेर न आल्यामुळे ते स्पर्धाक्षम ठरले नाहीत. उदा., १९५१ मध्ये सार्वजनिक क्षेत्रात पाच उद्योग होते. २०१२ पर्यंत त्यांची संख्या २२५ झाली. त्यांतील सुमारे ११० उद्योग २०००-२००१ पर्यंत तोट्यात चालत होते. १९९१ नंतर सुधारणांचे जे दोन टप्पे झाले, त्यात सार्वजनिक क्षेत्राचे अस्तित्व कमी करून खाजगी क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले. मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात आली. स्पर्धाक्षम वातावरणात नवीन उद्योग सुरू करण्यात आले. या काळातील ते सर्व उद्योग सूर्योदयी ठरलेत. उदा., संदेशवहन क्षेत्र.
एकविसावे शतक हे माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्रांतीचे म्हटले जाते. यामुळे जगाला खेड्याचे (ग्लोबल व्हिलेज) स्वरूप प्राप्त झाले आहे. पूर्वी संदेशवाहक म्हणून खबरी, दूत, कबूतर इत्यादींचा वापर केला जात. विसाव्या शतकात पोष्ट, वर्तमानपत्रे, मासिके, तारसेवा, दूरध्वनी सेवा, बिनतारी संदेश, रेडिओ, दूरदर्शन इत्यादी माध्यमे होती. आजच्या काळात संगणक, आंतरजाल, ई-टपाल, ई-वाणिज्य, भ्रमणध्वनी इत्यादी नवीन उद्योग सूर्योदयी ठरले आणि कालसापेक्षतेने काही जुने उद्योग सूर्यास्ती ठरले आहेत. उदा., खबरी, दूत, कबूतर इत्यादी.
भाषा ही मानवी संवादाचे एक प्रभावी माध्यम आहे. त्यातूनच ज्ञान, विज्ञान, उद्योग, व्यापारविषयक माहितीचे आदान-प्रदान होत असते. याद्वारे अनेक सेवा उद्योगांचे जाळे सूर्योदयी उद्योग ठरले आहेत. त्यात ई-वाणिज्य, ई-शिक्षण, ई-औषधे, ई-गव्हर्नस, ई-पेढी, ई-खरेदी, ई-वाहतूक, ई-कृषी ईत्यादी. बाराव्या पंचवार्षिक योजनेत दर्शविल्याप्रमाणे २०१२ मध्ये आज्ञावली (सॉफ्टवेअर) उद्योगात २८ लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगार प्राप्त झाला होता. त्यासंबंधित व साहाय्यक उद्योगांत ८९ लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त झाला होता. या क्षेत्रात तो २०३० पर्यंत ३ कोटी लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त होवू शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे; परंतु २०२० मध्ये कोविड १९ मुळे जगाचे अर्थचक्र मंदावल्याने या क्षेत्रातील रोजगारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे; परंतु कालांतराने नवीन सूर्योदयी उद्योग उदयाला आलेत व येत आहेत. उदा., हायड्रोजन इंधन उत्पादने, पेट्रोकेमीकल उद्योग, अन्न प्रक्रीया उद्योग, अवकाश पर्यटन, जागतिक ज्ञानकोश बाजारपेठ, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्र इत्यादी. सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातून संसर्गजन्य आजारात रुग्णांची सेवा करण्यासाठी मानव यंत्राचा (रोबोट) वापर होत आहे.
आगामी काळात अनेक औद्योगिक क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली होवून अनेक उद्योग सूर्योदयी ठरतील. जसजशी तांत्रिक प्रगती होत जाईल, तसतशी बाजाराची रचना बदलून जुने उद्योग सूर्यास्ती होतील आणि नवीन उद्योग सूर्योदयी होतील असे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.
संदर्भ :
- चव्हाण, एन. एल., भारतीय अर्थव्यवस्था, जळगांव, २०१९.
- Datt, Gaurav; Mahajan, Ashwini, Indian Economy, Delhi, 2020.
समीक्षक : ज. फा. पाटील