भाडेपट्टा करार ही एक अशी व्यवस्था आहे की, ज्यामध्ये एखादी कंपनी आपली साधनसामग्री किंवा जमीन भाडेपट्टा कराराने देऊ इच्छिते. सर्वसाधारणपणे भाडेपट्टा करारात एखादा व्यक्ती आपली जमीन किंवा साधनसामग्री एखाद्या व्यावसायिकाला ठराविक काळासाठी भाडे तत्त्वावर वापरण्यास देऊ शकतो. भाडेपट्ट्यासाठी करार करून उचित मुद्रांक शुल्क जमा केले जाते.
भाडेपट्टा कराराचा इ. स. १८७७ मध्ये पहिल्यांदा वापर करण्यात आला. त्या वेळी अमेरिकेतील बेल टेलिफोन या कंपनीने आपले दूरध्वनी भाडेपट्टा करारावर देऊ केले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर भाडेपट्टा कराराचा वापर जास्त प्रमाणात करण्यात येऊ लागला. हेन्री स्कोलफेल्ड यांनी मे १९५२ मध्ये अमेरिकेमध्ये भाडेपट्टा करारासाठी २०,००० डॉलरच्या भाग भांडवलावर ‘यूनायटेड स्टेट्स लिजिंग कॉर्पोरेशन’ या एका स्वतंत्र कंपनीची स्थापना केली. वाणिज्य बँकांनासुद्धा या कराराचा वापर करण्याची मुभा १९६३ नंतर देण्यात आली. याच सुमारास इंग्लंडमध्येसुद्धा याचा वापर होऊ लागला.
भारतामध्ये १९७३ मध्ये वित्तीय भाडेपट्टा कराराची सुरुवात झाली. फारूक इराणी व मुठिया यांनी मिळून ‘फर्स्ट लिजिंग कंपनी’ची स्थापना केली. तदनंतर १९८० च्या सुमारास ‘ट्वेंटीएथ सेंच्युरी लिजिंग कंपनी’ची स्थापना केली. त्यामध्ये १९८१ पर्यंत आणखी चार कंपन्यांची वाढ झाली. त्याच वेळेस अनेक वित्तीय कंपन्यांनीसुद्धा या व्यवसायात शिरकाव केला. उदा., इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक इत्यादी. भाडेपट्टा कराराच्या व्यवसायात १९९० पर्यंत सुमारे ४०० कंपन्या होत्या.
भाडेपट्टा कराराचे प्रकार :
- (१) दीर्घ कालावधी करार : हा करार दीर्घ कालावधीसाठी असतो. यामध्ये भाडे देणारा हा साधनसामग्रीची मूळ किंमत व व्याज मालकाला देतो. यामध्ये देखभालीचा खर्च, घसारा इत्यादींची जबाबदारी ही भाडे देणाऱ्याची असते. जमीन, इमारत, विमान, भारी यंत्रसामग्री इत्यादींसाठी दीर्घ करार केला जातो. दीर्घ कालावधीचे करार रद्द करता येत नाहीत.
- (२) अल्प कालावधीचे करार : हा करार लहान किंवा अल्प कालावधीसाठी असतो. यामध्ये भाडे देणारा हा कराराच्या कालावधीत साधनसामग्रीची फक्त मूळ किंमत देण्यास बांधील असतो. यामध्ये देखभालीचा खर्च, घसारा इत्यादींची जबाबदारी ही मालकाची असते. संगणक, कार्यालयामधील साधनसामग्री, ट्रक व इतर लहान गाड्या इत्यादींसाठी अल्प किंवा लहान करार उपयोगी ठरतात; पण गरज भासल्यास असे करार रद्द करता येऊ शकतात.
भाडेपट्टा कराराचे प्रमुख घटक : भाडेपट्टा कराराचे चार प्रमुख घटक आढळतात :
- (१) आपली जमीन किंवा साधनसामग्री भाडे तत्त्वावर देणारा मालक आणि त्यामोबदल्यात भाडे देणारा भाडेकरू.
- (२) भाड्यावर देण्यात येणारी मालमत्ता : यामध्ये जमीन व इमारत, भारी यंत्रसामग्री, विमाने, गाड्या इत्यादींचा समावेश होऊ शकतो.
- (३) कराराची मुदत : गरजेनुसार हा करार दीर्घ किंवा अल्प कालावधीसाठी केला जाऊ शकतो.
- (४) भाडे देणे : कराराप्रमाणे भाडेकऱ्याने मालकास भाडे देणे गरजेचे असते.
भाडेपट्टा कराराचे फायदे : भाडेपट्टा करार हा मालकाच्या व भाडेकरूच्या दृष्टीने फायदेशीर व्यवहार आहे. या कराराचे पुढीलप्रमाणे फायदे सागता येतात :
- पूर्ण सुरक्षित : मालकाच्या दृष्टीने त्याची मालमत्ता पूर्ण सुरक्षित असते; कारण एखाद्या वेळी जर भाडेकरूने भाडे दिले नाही, तर मालक आपली मालमत्ता पुन्हा ताब्यात घेऊ शकतो.
- करसवलत : मालकांसाठी यंत्रसामग्रीवर झालेला घसारा हा करसवलतीस पात्र ठरतो.
- भांडवली वस्तूंसाठी वित्तपुरवठा : या करारामुळे भाडेकरूंच्या दृष्टीने भांडवली वस्तूंसाठी लागणारा वित्तपुरवठा सहज उपलब्ध होऊ शकतो.
- लाभदायी व कमी खर्चिक : मालकांसाठी हा व्यवसाय लाभदायी ठरू शकतो; कारण त्यापासून मिळणारा प्राप्तिदर (रेट ऑफ रिटर्न) हा कर्जावर देण्यात येणाऱ्या व्याजापेक्षा अधिक असू शकतो. तसेच भाडेकरूसाठी हा करार कमी खर्चिक असू शकतो; कारण भाडे हे कर्जावर देण्यात येणाऱ्या व्याजापेक्षा कमी असू शकते.
(५) सोयीनुसार भाडेकरार : हा करार मालक व भाडेकरूंच्या सोयीनुसार करता येऊ शकतो. यामध्ये कराराची मुदत व भाडे हे दोघांच्या सोयीनुसार ठरविता येते.
भाडे कराराचे तोटे :
- यंत्रसामग्रीवर बंधने : भाडेकरूंवर यंत्रसामग्री वापरण्यासाठी काही बंधनेसुद्धा असू शकतात. उदा., यंत्रसामग्रीवर विमा उतरविणे, यंत्रसामग्री वापरण्यासाठी काही बदल न करू देणे इत्यादी.
- बचत मूल्य : भाडेकरूस कराराच्या शेवटी मालमत्ता ही मालकास परत करावी लागते. त्यामुळे तो शेवटी राहिलेल्या मालमत्तेच्या मूल्यांपासून वंचित राहतो.
- भाडेकरूने जर वेळोवेळी भाडे भरले नाही, तर हा व्यवहार मालकास फायदेशीर न ठरता तोट्याचा ठरू शकतो.
- मुदतपूर्वी करार संपुष्टात आणणे : काहीवेळा भाडेकरू हा करार त्याची मुदत संपण्याआधीच संपुष्टात आणतात. त्या वेळेस मालक त्यांच्याकडून दंड म्हणून काही रक्कम घेऊ शकतो.
समीक्षक : विनायक गोविलकर