वास्तुसंवर्धन म्हणजे गतकाळातील वास्तूंचे मूल्य वर्धित करून वास्तूचे आयुष्य वाढवविणे. ऐतिहासिक ठेवा, भविष्यकालीन जबाबदारी आणि वारसा या दृष्टीने वास्तूंकडे पाहण्यात येते. परंतु व्यवहार्य दृष्टीकोनातून विचार केल्यास वास्तूंचा वारसा टिकवणे हे चिरंतर विकासाचे भांडवल आहे.
वास्तुसंवर्धन या विषयाच्या कार्यकक्षा रुंदावत आहेत. दुसऱ्या महायुद्धामुळे झालेल्या हानीनंतर सांस्कृतिक वारसा जोपासायची जाणीव प्रामुख्याने झाली. या जाणिवेतून वारसा-संवर्धनाचे प्रयत्न वाढीस लागले. वारसा-संवर्धनाचा इतिहास खूप जुना आहे. एकोणिसाव्या शतकात राष्ट्रीयत्वाच्या भावनेतून युरोपातील काही देशात वारसा-संवर्धनाचे प्रयत्न झाले. याच काळात शास्त्रीय आधारावर वास्तूंचे जतन करावे हा विचारही वाढीस लागला. काही देशांमध्ये वास्तू शैली जतन करण्यावर भर दिला गेला. अर्थातच याचे पर्यवसान या क्षेत्रातील वेगवेगळ्या विचार प्रणाली विकसित होण्यात झाला. त्यात प्रामुख्याने फ्रांसशी निगडीत वास्तू शैली जतन, इंग्लंडचे राष्ट्रीयात्वाशी सांगड घालणारे आणि स्वच्छन्दतावादी संवर्धन, तर इटलीमध्ये उदयास आलेले शास्त्रशुद्ध जतन संवर्धन यांचा समावेश होतो.
वारशाचे सांस्कृतिक आणि नैसर्गिक दोन प्रकार मानतात, पुढे सांस्कृतिक वारशाची मूर्त आणि अमूर्त स्वरूप अशी विभागणी होते. ज्या गोष्टी मूर्त स्वरूपात असतात त्या मूर्त सांस्कृतिक वारसा होय. उदा., वास्तू, शिल्पे, चित्रे आणि वस्तू यांचा समावेश होतो तर आपल्या परंपरा, भाषा, दृक-श्राव्य कला यांचा अमूर्त स्वरूपाच्या सांस्कृतिक वारश्यात समावेश होतो. दुसरा प्रकार नैसर्गिक वारशाचा आहे. त्यात निसर्गातील एकमेकाद्वितीय वैशिष्ट्ये, शास्त्रीय अथवा भौगोलिक वैशिष्ट्ये यांचा समावेश होतो. ऑस्ट्रेलियातील विविध जातींची प्रवाळे आढळणारे ग्रेट बँरियर रिफ, भारतातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान या नैसर्गिक सांसकृतिक वारसा प्रकारात मोडतात. गतकाळातील सगळ्याच गोष्टी वारसा होत नाहीत. वेगवेगळ्या मूल्यांच्या निकषांवर वारसा ठरविला जातो. वारसा स्थानिक दृष्ट्या, राष्ट्रीय दृष्ट्या तर कधी जागतिक पातळीवर महत्त्वाचा असतो. जागतिक पातळीवर महत्त्वाच्या ठरणाऱ्या वर्षाला जागतिक वारसा क्रमवारीत स्थान मिळते. अशा वारश्याला ‘उत्कृष्ट वैश्विक मूल्य’ असावे लागते. सध्या भारतातील छत्तीस स्थळे जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील अठ्ठावीस स्थळे सांस्कृतिक वारसा यादीत आणि सात स्थळे नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीत आहेत तर एक मिश्र विभागात नोंदविले आहे.
वास्तू वारसाकरिता वेगवेगळी मुल्ये निर्धारित करण्यात आली आहेत. पुरातत्त्वीय, वास्तुशात्रीय, उपयुक्तता, ऐतिहासिक, पर्यावरणीय आणि सौंदर्यात्मक या मूल्यांचा प्रामुख्याने विचार केला जातो. एका वास्तूचा विचार संवर्धनासाठी न करता, वास्तू समूहाचे संवर्धन, त्यापेक्षा व्यापक अशा सांस्कृतिक भूदृष्य कलेचे (कल्चरल लँडस्केप) संवर्धन ही कल्पना आता रूढ होऊ लागली आहे. शाश्वत विकासाच्या दृष्टीनेही ही संकल्पना पूरक आहे.
बर्नाल्ड फिल्डन या प्रसिध्द वास्तुसंवर्धनतज्ज्ञाने त्याच्या संवर्धनाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ऐतिहासिक वास्तूंमध्ये किमान हस्तक्षेपावर भर दिला आहे. अशा हस्तक्षेपाच्या खालील सात पायऱ्या त्यांनी अधोरेखित केल्या आहेत.
१. हानीला प्रतिबंध : वास्तूला हानी पोहचविणाऱ्या घटकांचे नियंत्रण करून हानी टाळणे, असे या प्रकारात अपेक्षित असते. ही वास्तूसंवर्धनाची पहिली पायरी आहे.
२. आहे त्या स्थितीत जतन करणे : वास्तू ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत जपणे. गरज भासल्यास अधिक हानी टाळण्यासाठी डागडुजी करणे.
३. बळकटीकरण : आधुनिक साहित्य सामुग्री आणि तंत्रज्ञानाच्या आधारे अस्तित्वातील इमारती बळकट करणे.
४. जीर्णोद्धार : यात मूळ संकल्पनेला धक्का न लावता डागडुजी अपेक्षित असते. वास्तूच्या विकासात हातभार लावणाऱ्या सर्व ऐतिहासिक थरांना सारखेच महत्त्व देणे अपेक्षित असते.
५. पुनर्वसन : कुठलीही वास्तू वापरात ठेवणे हे त्या वास्तूचे आयुष्य वाढविण्यास मदत करते. काळानुसार वास्तूचा अनुकूल नवीन वापर सुद्धा करू शकतो. समाजव्यवस्था बदलल्याने भारतातील राजवाड्यांचे रूपांतरण होटेले यात झालेली आहेत. त्यामुळे संवर्धनाच्या कामाला लागणारे आर्थिक पाठबळ निर्माण होऊ शकते. रोजगाराच्या अनेक नवीन संधीही उपलब्ध होतात.
६. पुनर्निर्माण : पुनर्निर्माण म्हणजे प्रतिकृती तयार करणे. वास्तूचा एखादा भाग काळाच्या ओघात नाहीसा झाला असल्यास त्याची हुबेहूब प्रतिकृती बनवून वापरू शकतो. तसेच एखादी वास्तू काही पर्यावरणीय किंवा काही टाळता न येणाऱ्या कारणाने नष्ट होणार असेल तर स्थलांतरित करून ती वास्तू वाचवली जाऊ शकते. साठीच्या दशकात इजिप्त मधील अबू सिम्बेल येथील प्रसिद्ध रामेसिसचे देऊळ आस्वान धरणाच्या पाण्याखाली जाण्यापासून वाचविण्याकरिता स्थलांतरित केले गेले. हे पुनर्निर्माण प्रकारचे उत्तम उदाहरण आहे.
७. पुनर्बांधणी : भूकंप, पूर, आगीमुळे भस्मसात झालेल्या ऐतिहासिक वास्तू पुन्हा नवीन साहित्य आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जशाच्या तशा उभ्या करणे म्हणजे पुनर्बांधणी करणे.
वास्तुसंवर्धन या शाखेच्या अभ्यासाची व्याप्ती मोठी आहे. याला तंत्रज्ञानाबरोबरच योग्य तत्त्वज्ञानाची साथही गरजेची आहे. कुठल्याही वास्तुसंवर्धनाच्या प्रकल्पात कला इतिहास तज्ञ, योग्य तर्हेचे कारागीर, समाजशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, इमारत संरचना तज्ञ, पुरातत्त्ववेत्ता, वास्तू संरक्षण तज्ञ, संवर्धन व्यवस्थापक आणि वास्तूचा विनियोग करणारे या सर्वांचा सहभाग निरनिराळ्या प्रमाणात अपेक्षित असतो. त्यामुळेच वास्तू संवर्धन प्रकल्प बहुशाखीय बनतो आणि प्रकल्पाचे यशही या सर्वांवर अवलंबून असते.
समीक्षक : श्रीपाद भालेराव