रेवाल, राज : (२४ नोव्हेंबर १९३४). भारतीय वास्तुविशारद. आधुनिक वास्तूला पारंपरिक वास्तुशिल्पांच्या रूढींची  रचना करण्याच्या कार्यासाठी ते अतिशय लोकप्रिय आहेत.

रेवाल यांचा जन्म होशियारपूर (पंजाब) भारत येथे झाला. १९३४–५१ या सालादरम्यान ते दिल्ली व शिमला येथे वास्तव्यास होते. त्यांचे माध्यमिक शिक्षण हरकोर्ट बटलर उच्च माध्यमिक विद्यालयातून झाले. नवी दिल्ली येथील दिल्ली स्कूल ऑफ आर्किटेक्चर येथून त्यांनी पदवी संपादन केली (१९५१–५४). त्यानंतर ते १९५५ मध्ये लंडनला स्थायिक झाले. तेथे त्यांनी आर्किटेक्चरल ॲसोशिएशन स्कूल ऑफ आर्किटेक्टचरल येथे एक वर्षाकरिता आणि ब्रिक्स्टन स्कूल ऑफ बिल्डिंग येथे सन १९५६–६० सालादरम्यान व्यावसायिक शिक्षणाचे प्रशिक्षण घेतले. ते रॉयल इन्स्टिटयूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट या संस्थेचे सभासद होते. तेथे त्यांना जागतिक वास्तुशास्त्र व त्याचे अनुप्रयोग या गोष्टी निदर्शनास आल्या. पॅरिस मधील मिशेल इकोचेदेर्सच्या कार्यालयातील काम त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त अनुभव ठरला. त्यांना तेथे शहरी संकल्पना व नियोजनाची महत्त्वाची सिद्धांतांची ओळख झाली.

रेवाल यांनी १९६२ मध्ये नवी दिल्लीत स्वतःच्या कार्याला सुरुवात केली. स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर येथे ते शिक्षक म्हणून रुजू झाले. शिक्षकी पेशामुळे त्यांना वास्तुकलेच्या क्षेत्रात गुंतून राहता आले आणि या विषयातील सखोल ज्ञान मिळवण्यास फायद्याचे ठरले. १९६३–७२ या काळात ते अध्यापन कार्यात कार्यरत होते. पॅरिसमधील कारकिर्दीत शिकलेल्या आधुनिक वास्तुकलेतील संकल्पना त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरल्या. त्यांनी अनेक आधुनिक वास्तूंची संरचना केली. त्यांना विशेषतः आणि लोकप्रियता मिळण्यामागे त्यांची आधुनिक वास्तुकलेतील संरचना एवढेच कारण कारणीभूत नसून आधुनिक संरचना उभारताना आलेल्या समस्या सोडवण्यासाठी प्राचीन आणि दुर्मिळ तंत्रांचा केलेला स्वीकार हे आहे. त्यांचे बरेच प्रकल्प हे एखाद्या संकल्पनेवर आधारित असून ते संरचनेला एक अ‌द्वितीय स्वरूप देऊन जाते.

रेवाल यांनी १९७४ साली इराणमधील तेहरानमध्ये स्वत:चे दुसरे कार्यालय उघडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने ते त्यांच्या व्यावसायिक प्रवासाच्या पुढील पातळीवर पोहचले. १९८५ त्यांनी रॅम शर्मा यांच्या सहकार्याने फाउंडेशन आर्किटेक्चरल रिसर्च सेलची स्थापना केली. पॅरिसमध्ये असताना ते भारतातील पारंपरिक वास्तुकला या महोत्सवाच्या प्रदर्शनाचे अभिरक्षक होते.

रेवाल यांना कुवेतमध्ये संग्रहालयाचा एक मोठा प्रकल्प देऊ करण्यात आला. त्याचबरोबर त्यांनी दिल्लीच्या प्रगती मैदानावर प्रदर्शन प्रकक्षाची रचना केली. नवी दिल्लीमधील संसद ग्रंथालयाची रचना ही त्यांच्या अद्वितीय कामगिरीचे उत्तम उदाहरण आहे. प्रकल्पात साकारलेली बांधणी व विशेष योजना अधिक प्रसंशनीय ठरते. प्रकल्पाच्या रचनेत आणि घुमटाच्या संरचनेत त्यांनी विशेष कामगिरी वटवलेली आहे. परंतु ही असामान्य रचना अंमलात आणण्यासाठी त्यांना युरोपियन सल्लागारांच्या सल्ल्याची आवश्यकता भासली. त्यांनी इस्माइली केंद्रात या असामान्य संरचना प्रणालीचा वापर केला. संसदेच्या ग्रंथालयासाठी दगडी स्तंभ आणि फेरोसिमटचे घुमत यांची रचना करण्याचा मुद्दा केंद्रीय लोकविकास विभागाला पटवून द्यावा लागला.

रेवाल सतत आधुनिक कला पारंपरिक कलेमध्ये विलीन करण्याचे मार्ग शोधताता. पारंपरिक कारागिरांच्या कौशल्याचे होणारे ऱ्हास त्यांना  दु:खी करतो. हे कला व कौशल्य पुनरुज्जीवीत करण्यासाठी त्यांनी पारंपरिक कारागिरांना नवीन साधने आणि तंत्रज्ञाची ओळख करून दिली. त्यांच्या विविध्य प्रकल्पात केलेल्या या कलेच्या वापराने संपूर्ण जगभरचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासह प्रादेशिक संस्कृतीचा प्रसार करण्याच्या संकल्पनेवर मोठे प्रकल्प तयार केले.

राज रेवाल यांनी साकारलेली काही महत्त्वपूर्ण इमारती व संकुले

संसद ग्रंथालय, भारत.

स्थान : नवी दिल्ली, भारत.

प्रकल्प कार्य स्थिती : पूर्ण –  २००३

संसद ग्रंथालय हे नवी दिल्लीमधील संसद भवनाच्या पुढे उभारण्यात आले आहे. या रचनेची संकल्पना हाऊस ऑफ नौलेज या शब्दाला न्याय देते. नवीन संकुलाची रचना अश्याप्रकारे साकारण्यात आली आहे की, ती ते शक्ती, एकमत आणि लोकशाही या मूल्यांचा प्रभाव पाडते.

रेवाल यांनी भारतीय परंपरेनुसार व समकालीन मुद्द्यांची आठवण ठेऊन या ग्रंथालयाची रचना केली आहे. शिवाय, हे भारतातील कोणत्याही वास्तुतज्ञाच्या प्रकल्पासारखे नाही आणि या भव्य ग्रंथालयाची रचना करण्यासाठी कोणत्याही स्मारकाची प्रतिकृती केलेली नाही. केंद्रीय घुमटापर्यंत पोहचण्यासाठी त्याच्या तीन अक्षांमध्ये वापरली गेलेली परिपत्रक योजना भव्य आहे. संसद इमारतीच्या रचनेसाठी ब्यूऑक्स (beaux) या कलेचा वापर केला आहे. इमारतीची उंची संसद भवनाच्या मंच (podium) पातळीपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे.

संसद ग्रंथालय, भारत.
संसद ग्रंथालय, भारत.

व्हिजुअल आर्ट इन्स्टिट्यूशनल कॅम्पस, रोहतक हरियाणा

स्थान: रोहतक,  भारत.

प्रकल्प कार्य स्थिती : पूर्ण- २००२.

संसद ग्रंथालयानंतर रेवाल यांचा सर्वांत मनोरंजक प्रकल्प म्हणजे वास्तुकला, चित्रपट व फॅशन या विविध कला शिकवणारे घर, व्हिजुअल आर्ट इन्स्टिट्यूशनल कॅम्पस. हे दिल्लीपासून ७० किलोमीटर अंतरावर रोहतकच्या एका उपनगरात स्थित आहे. प्रत्येक भिन्न अभ्यासक्रमाची स्वतःची स्वतंत्र भव्य इमारत आहे. हा प्रकल्प २२ एकराच्या परिसरात उभारण्यात आलेले असून त्यात वसतिगृह, संप्रदाय झोन, परिषदेकरिता खोल्या व ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध आहे. रेवाल यांनी या प्रकल्पासाठी नालंदा आणि तक्षशिला यांच्या जुन्या तंत्रज्ञानातून प्रेरणा घेतली आहे.

व्हिजुअल आर्ट इन्स्टिट्यूशनल कॅम्पस, रोहतक हरियाणा

संदर्भ:

समीक्षक : श्रीपाद भालेराव