ख्रिस्तपूर्व ३३०० – १३०० पर्यंतच्या काळात सिंधू नदीच्या खोऱ्यात एक नवी संस्कृती उदयास आली, तिला ‘सिंधू संस्कृती’ असे संबोधले जाते. ईजिप्शियन, मेसोपोटेमियन या संस्कृतींना समांतर असणारी सिंधू संस्कृती जगातल्या सर्वांत जुन्या संस्कृतींमधील एक समजली जाते. अशा जुन्या संस्कृतीची वास्तुकला उत्कृष्ट नगर नियोजन, भाजलेल्या विटांची घरे, पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्था या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. पाकिस्तानातील सिंध व पंजाब प्रांत आणि भारतातील गुजरात व हरियाणा या भागात सिंधू संस्कृतीकालीन वास्तुकलेचे अवशेष सापडले आहेत. उत्खाननात सापडलेल्या अवशेषांमध्ये हडप्पा, मोहें-जो-दडो, गन्वेरीवाला, धोलवीरा, राखीगारी या प्रमुख नगरांचा समावेश होतो.
नगर नियोजन : या संस्कृतीत नगरांची रचना ग्रीड प्रकारच्य रचनेमध्ये असून त्यातच प्रत्येक नगर वसलेले होते. त्यातील मुख्य रस्त्यांची आखणी पूर्व-पश्चिम दिशेवर केली होती, त्यामुळे नगराची मांडणी कदाचित उदयोन्मुख सूर्य व चंद्र यांच्या स्थितीवर असावी, असे तज्ञांचे म्हणणे आहे. संपूर्ण शहराभोवती तटबंदी आणि प्रवेशद्वारे बांधण्यात आली होती. शत्रूपासून संरक्षण करणे आणि व्यापारावर नियंत्रण ठेवणे एवढ्यासाठी ही योजना नसून, सतत येणाऱ्या पुरापासून शहराचे रक्षण करणे हा देखील तटबंदीमागील महत्त्वाचा उद्देश होता. नगराचे ठळकपणे दोन भाग होते, एक म्हणजे कृत्रिमरित्या तयार केलेल्या टेकडीवरचे अक्रोपोलीस आणि दुसरा जमिनीलगत असलेला राहिलेला भाग (लोवर टाउन). शहरतील मुख्य इमारती या अक्रॉपलिस भागात होत्या, तसेच अक्रॉपलिसची तटबंदी बाकीच्या शहराच्या तुलनेत जास्त मजबूत होती. सार्वजनिक इमारती, सभामंडप, धान्याचे कोठार, भव्य स्नानगृह हे सर्व अक्रॉपलिसवर बांधले होते. तर खालच्या भागात रहिवाशांची निवासस्थाने बांधली होती. पुरापासून संरक्षण करण्यासाठी म्हणून येथील इमारती उंच चौथऱ्यांवर बांधल्या गेल्या होत्या. सिंधू संस्कृतीतली नगरांमध्ये मोहें-जो-दडो (२५० हेक्टर) व हडप्पा (१५० हेक्टर) ही नगरे सर्वांत मोठी आहेत.
घरे : घरांच्या स्थानानुसार त्यांच्या बांधकाम साहित्यात फरक दिसून येतो. ग्रामीण भागातील घरे ही केवळ मातीच्या विटांनी बांधलेली होती, तर नागरी भागात भाजलेल्या विटांची घरे बांधण्यात आली होती. ४:२:१ या मापात सर्व विटा बनवल्या आहेत. प्रामुख्याने एक किंवा दोन मजले, त्यात खालच्या मजल्यांवर खोल्या आणि वर गच्ची अशी या घरांची संरचना आहे. तसेच काही ठिकाणी दोनपेक्षा जास्त मजले आणि फरसबंदी देखील दिसून येते. जवळजवळ प्रत्येक घराला स्वतंत्र विहीर, स्नानगृह आणि सांडपाण्याचे नियोजन व्यवस्था होती.
पाणीपुरवठा प्रणाली आणि सांडपाण्याचे नियोजन : सिंधू संस्कृती म्हणजे पाणीपुरवठा व सांडपाणी नियोजन या दोन्ही व्यवस्था अस्तित्वात असणारी जगातील पहिली संस्कृती आहे. येथील शहरांमध्ये खासगी आणि सार्वजनिक स्नानगृहांचा समावेश होता. प्रत्येक घराला तेथे असणाऱ्या विहिरीतून पाणीपुरवठा होत असे. मोहें-जो-दडो शहरात सुमारे ७०० विहिरी होत्या. उंचावर पाणी पुरवठा करण्यासाठी ‘शाडूफ’ आणि ‘साकिया’ सारखी उपकरणे पाणी वर चढवण्यासाठी वापरली जात असत. तसेच वापरलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी म्हणून विटांनी बांधलेली भूमिगत सांडपाणी व्यवस्था अस्तित्वात होती. घरांमधून येणारे सांडपाणी सार्वजनिक नाल्यांना जोडले जात असे. घराच्या वरच्या मजल्यावरील किंवा गच्चीवरील सांडपाणी बंद टेराकोटा सारख्या वाहिन्यांमधून खाली येत असे व नाल्याला जोडले जात असे.
मोहें-जो-दडो येथील सार्वजनिक स्नानगृह प्रागैतिहासिक कालखंडातील पहिलेच सार्वजनिक स्नानगृह असावे असा तज्ञांचा अंदाज आहे. या स्नानगृहाची लांबी १७९ फूट असून रुंदी १०७ फूट आहे. याच्या मधोमध ३०X २३X८ फुटी जलतरण तलाव असून त्याच्या बाजूस बैठकव्यवस्था आणि खोल्या आहेत. हा संपूर्ण परिसर एका विस्तृत पाणीपुरवठा आणि सांडपाणी नियोजन प्रणालीसोबत जोडलेला आहे.
इतर वास्तुप्रकार : उत्खाननात सापडलेले १५०X७५X १५ फुटी धान्याचे कोठार (ग्रेनरी) ही मोहें-जो-दडोमधील सर्वांत मोठी वास्तू आहे. हे कोठार तीन पंक्तींचे असून, सत्तावीस भागात विभागले आहे. तसेच ते हवेशीर असून त्यात बाहेरून धान्य भरणे शक्य होते. इतक्या मोठ्या आकाराचे कोठार म्हणजे त्या काळातील विकसित शेतीचा पुरावा आहे.
उत्खननातील पुराव्यांप्रमाणे येथे मंदिर स्थापत्यशास्त्र किंवा इतर काही धार्मिक स्थळांचे नमुने आढळत नाहीत. तसेच युद्ध स्मारके किंवा तत्सम वास्तूंचे पुरावे अद्याप सापडलेले नाहीत.
संदर्भ :
- रॉबिन्सन्स, अँड्रयू, द इंडस : लॉस्ट सिव्हिलायझेशन, लंडन, २०१६.
- org/wiki/Sanitation_of_the_Indus_Valley_Civilisation
- https://www.ancient.eu/article/695/harappa-an-overview-of-harappan-architecture-and-t/
- http://www.ushistory.org/civ/8a.asp
- https://en.wikipedia.org/wiki/Sanitation_of_the_Indus_Valley_Civilisation
- https://www.gktoday.in/gk/architecture-in-indus-valley-civilization/
- https://en.wikipedia.org/wiki/Lothal
समीक्षक : श्रीपाद भालेराव