नारायणन, ऋषिकेश : (५ जून १९७४). एक भारतीय चेताक्रिया वैज्ञानिक व संगणक अभियंता.

नारायणन यांचा जन्म विरुधुनगर, तामिळनाडू राज्यात झाला. त्यांनी मदुराई कामराज विद्यापीठाच्या मेपको श्लेंक अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण अभियांत्रिकी शाखेतील पदवी (१९९५), तसेच भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरूमधून (इंडियन इन्स्ट‍िट्यूट ऑफ सायन्सेस) वाय. व्ही. वेंकटेश यांच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकीमध्ये संशोधन करून पदव्युत्तर पदवी (१९९७) आणि पीएच. डी. (२००२) पदवी संपादन केल्यात. त्यानंतर त्यांनी अधिछात्र शिष्यवृत्ती अंतर्गत राष्ट्रीय जीवविज्ञान केंद्र (नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस) येथे सुमंत्र छत्तरजी यांच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन केले. ऑस्ट‍िन येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास येथे दुसऱ्यांदा अधिछात्र शिष्यवृत्ती मिळवून डॅनियल जॉनस्टन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरुवात केली. भारतात परतल्यावर ते भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू येथे रेणवीय जीवभौतिकी विषयाचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले (२००९) आणि तेथेच त्यांना सह-प्राध्यापक या पदावर पदोन्नती देण्यात आली (२०१५). नंतर ते पेशीय चेताक्रियाविज्ञान विभागाचे प्रमुख झालेत.

नारायणन यांनी केलेल्या एकल चेतापेशी (सिंगल न्यूरोन) संशोधनातून चेतापेशीतील आयन द्वार आणि त्यांची लवचिकता (voltage gateion channeland its plasticity) यावर नवा प्रकाश पडला आहे. दोन चेतापेशी जेथे एकत्र येतात तेथे सूक्ष्म फट असते, त्याला संपर्क स्थान (synapse) म्हणतात. चेतासंस्थेमध्ये संपर्क स्थान स्मृती आणि बोधन यांचे स्थान आहे असे समजले जात असे. सध्या केलेल्या संशोधनातून आयन द्वारसुद्धा स्मृती व बोधन क्रियेमध्ये भाग घेते असे समजले आहे. यासाठी संगणक प्रारूप (model) तयार करण्यावर नारायणन यांच्या प्रयोगशाळेत संशोधन चालू आहे. या बरोबर आयन द्वार, चेता संकेतन (न्यूरल कोडिंग) मधील लवचिकता, पेशी अंतर्गत समस्थिती, पेशीतील साठ्यामधून कॅल्शियम आयनांचे बाहेर येणे अशा नव्या नव्या क्षेत्रात संशोधन चालू आहे. मेंदूमधील स्मृती अश्वमीन केंद्रात (Hippocampal lobe) असते हे या पूर्वीच सिद्ध झाले आहे. चेतापेशी आपल्या संपर्क स्थाने व संबंधी इतर चेतापेशीद्वारे माहिती अश्वमीन केंद्रामध्ये कसे वाहून नेतात त्यावर काम करणे हे आव्हान आहे असे त्यांचे मत आहे.

नारायणन सध्या भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या न्यूरोबायोलॉजी कार्यदलाचे सदस्य आहेत. तसेच ते सोसायटी फॉर न्यूरोसाइन्स, आण्विक आणि सेल्युलर कॉग्निशन सोसायटी, अमेरिकन फिजिओलॉजिकल सोसायटी आणि बायोफिजिकल सोसायटीसह अनेक संस्थांचे सदस्य आहेत. ते इलिफ, फ्रंटियर्स इन सेल्युलर न्यूरोसायन्स, जर्नल ऑफ कॉम्प्युटेशनल न्यूरोसायन्स, जर्नल ऑफ न्यूरोफिझिओलॉजी, जर्नल ऑफ फिजियोलॉजी, न्यूरोसायन्स, पीएलओएस कॉम्प्युटेशनल बायोलॉजी या जर्नल्सचे परिक्षक आहेत.

वैज्ञानिक संशोधनासाठी कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेने जैविक विज्ञानातील योगदानाबद्दल त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानातील शांति स्वरूप भटनागर पुरस्कार दिला (२०१६). त्यांचे अनेक आंतर राष्ट्रीय विज्ञान पत्रिकेतून शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.

कळीचे शब्द : #चेता #वैज्ञानिक #भटनागरपुरस्कार

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा