(स्थापना : १९९८). काही शतकांपासून विद्वत्ता, प्रगाढ ज्ञान आणि शिक्षणासाठी नावाजलेल्या यूरोप आणि अमेरिकेतील अग्रगण्य आणि प्रथितयश विद्यापीठांप्रमाणे संस्था गणली जावी असे चेन्नई गणित संस्था अर्थात सीएमआय या संस्थेचे उद्देश्य आहे.

चेन्नई गणित संस्थेची इमारत

भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती व्हावी या उद्देशाने १९८९ मध्ये सदर्न पेट्रोकेमिकल इन्डस्ट्रीज् कॉर्पोरेशन विज्ञान प्रतिष्ठानचा एक भाग म्हणून गणिताला वाहिलेल्या संस्थेची स्थापना करण्यात आली. ती १९९६ पासून स्वायत्त संस्था म्हणून कार्य करू लागली आणि तिचे १९९८ मध्ये ‘चेन्नई गणित संस्था’ (सीएमआय) असे नामकरण झाले. २००६ मध्ये तिला विद्यापीठ अनुदान आयोगाने अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यता दिली. १९९८ मध्ये या संस्थेने अध्यापन आणि संशोधन यातील अंतर मिटविण्यासाठी पुढाकार घेतला आणि गणितशास्त्र आणि तत्संबंधीत विषयांमध्ये बी.एस्सी. आणि एम.एस्सी. अभ्यासक्रम सुरू केला. या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमात भौतिकशास्त्र आणि मानवविद्या (ह्युमॅनिटीज्) या विषयावरही पाठ्यक्रम आहेत. २००३ पासून भौतिकशास्त्रातही तीन वर्षाचा बी.एस्सी. अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यात मुख्यतः सैद्धांतिक भौतिकशास्त्राचा समावेश आहे. संस्थेची स्वतःची भौतिकशास्त्राची प्रयोगशाळा आहे. विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षापासूनच औपचारिक शिक्षण आणि प्रयोगशाळेत प्रात्यक्षिकांचा नियमित अनुभव घेता येतो.

संगणक विज्ञानात एम.एस्सी. आणि उपयोजित गणितशास्त्रासाठी स्वतंत्र एम.एस्सी. अभ्यासक्रम क्रमश: २००१ आणि २००९ मध्ये सुरू केले गेले. हा उपयोजित गणितशास्त्राचा एम.एस्सी. अभ्यासक्रम २०१८ मध्ये विदा विज्ञान (डेटा सायन्स) या विषयात परिवर्तित झाला. त्यात विदा विश्लेषणात व्यावसायिक कारकीर्द घडवण्यासाठी विद्यार्थ्यांचा आवश्यक असा गणित, संख्याशास्त्र आणि संगणक विज्ञानाचा मजबूत पाया तयार होईल असे धोरण आहे.

सीएमआयमध्ये गणितशास्त्रात बैजिकी भूमिती (Algebraic Geometry), प्रतिरूपण सिद्धांत (Representation Theory), परिकर्मी बैजिकी (Operator Algebra), क्रमनिरपेक्ष बैजिकी (Commutative Algebra), संवादी विश्लेषण (Harmonic Analysis), कंट्रोल थिअरी आणि गेम थिअरी या विषयात मुख्यतः संशोधन केले जाते.

भौतिकशास्त्रासंबंधी इंडियन मॅथेमेटिकल सायन्स आणि इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्चच्या सहकार्याने संशोधन सुरू आहे. सैद्धांतिक भौतिकशास्त्रात मुख्यत्वे करून मालिका सिद्धांत (स्ट्रिंग थिअरी), क्वांटम क्षेत्र सिद्धांत आणि गणिती भौतिकशास्त्रात संशोधन केले जाते. गणिती भौतिकशास्त्रात क्वांटम गुंतागुंतीसाठी एक पूर्णांकी दृष्टिकोन (path to Integral approach to Quantum Entanglement) इथे विकसित केला आहे. मालिका सिद्धांताचा अभ्यास करणारे संशोधक महाविस्फोट (बिग बॅंग) सारख्या विषयावर काम करीत आहेत.

संगणनविषयक संमिश्रक सिद्धांत (Computational Complexity Theorem), कालिक आणि वितरित प्रणालीचे तपशील आणि पडताळणीसाठी औपचारिक पद्धतीचे विश्लेषण (Specification and Verification of timed and distributed systems and Analysis of Security Protocols) यावर सीएमआय मध्ये संशोधनकार्य सुरू आहे. प्रतलीय आलेखांमध्ये पोहोचता येईल असे निर्धारीत एकाकी तंत्र त्याद्वारे विकसित केले आहे.

सीएमआयने अनेक नावाजलेल्या शैक्षणिक संस्थांशी करार केल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होतो. सीएमआयचे शैक्षणिक अभ्यासक्रम इंडियन मॅथेमेटिकल सायन्स संस्थेशी संलग्न असल्यामुळे संशोधन करणारे विद्यार्थी या दोन्ही संस्थांपैकी कोणत्याही एका संस्थेतील प्राध्यापकाकडून मार्गदर्शन प्राप्त करू शकतात. या दोन्ही संस्था मिळून पाठ्यक्रम आणि अनेक परिसंवाद आयोजित करतात.

सीएमआयने हायर नॉर्मल स्कूल पॅरिस (École Normale Supérieure) या प्रतिष्ठित संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. या करारांतर्गत या संस्थेतील संशोधक सीएमआयमध्ये एक सत्र राहून अनुभव घेतात. त्या बदल्यात गणितशास्त्राचे तीन विद्यार्थी तिसऱ्या सत्राच्या अंती या संस्थेमध्ये दोन महिने अभ्यास करतात. अशीच व्यवस्था École Polytechnique, पॅरिस या उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी नावाजलेल्या संस्थेशी असल्यामुळे अंतिम सत्रातील सर्वोच्च श्रेणी मिळवलेल्या भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना या संस्थेतील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळतो.

चेन्नईतील इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट अँड रिसर्चशी केलेल्या करारांतर्गत सीएमआयमधील उत्तम ग्रेड मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना वित्तीय गणितशास्त्राच्या एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेश मिळतो.

ReLaXया भारत आणि फ्रांस यांच्या संयुक्त संशोधन केंद्राचा सीएमआय एक भाग आहे. या अंतर्गत सैद्धांतिक संगणक विज्ञान, त्याचे उपयोजन आणि गणितशास्त्राशी अन्योन्य संबंध असलेल्या विषयांवर संशोधन होते. यामुळे सीएमआयमधील विद्यार्थी उन्हाळी कार्यानुभवाचा लाभ घेतात. सीएमआयमध्ये प्रवेश देण्यासाठी भारतभर प्रवेश परीक्षा घेतली जाते. मात्र गणितशास्त्र, भौतिकशास्त्र आणि माहितीशास्त्र या विषयातील राष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये अपवादात्मक चांगली कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना त्या त्या विषयात बी.एस्सी.साठी थेट प्रवेश मिळतो.

इंडियन असोसिएशन फॉर रिसर्च इन कम्प्युटिंग सायन्स या संस्थेमार्फत सीएमआय मधील प्राध्यापक आंतरराष्ट्रीय माहितीशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात आणि निवड प्रक्रिया ठरवतात.

सीएमआयची स्थापना करण्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या प्राध्यापक सी.एस्. शेषाद्री यांना पद्मभूषण, शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, अमेरिकन मॅथेमेटिकल सोसायटीची विद्यावृत्ती यासारख्या अनेक सन्मान आणि पुरस्कारांनी गौरवांकित केले आहे. सीएमआयशी संबंधित असलेल्या कित्येक प्राध्यापकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला आहे. त्यापैकी काहींची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अल्पावधीतच सीएमआयने भारतीय उच्च गणितशिक्षण क्षेत्रात आपले विशेष स्थान निर्माण केले आहे.

कळीचे शब्द : गणितशास्त्र, भौतिकशास्त्र, संगणक विज्ञान,विदा विज्ञान

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर