(स्थापना : ३ फेब्रुवारी १९९९). भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र ही भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारित कार्यरत असलेली स्वायत्त संस्था आहे. भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राची (इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस अर्थात इन्कॉइसची) स्थापना हैदराबाद इथे झाली. शास्त्रज्ञ, उद्योग जगत, शासकीय कार्यालये, अशासकीय संस्था व सामान्य नागरिक यांना गरजेनुसार महासागरांबद्दलची, त्यांच्या स्थितीबद्दलची माहिती पुरवणे आणि सल्ला देणे हे या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी आवश्यक असणारी निरीक्षणे नियमितपणे घेणे, त्यांचे विश्लेषण करून अभ्यास व संशोधन करणे ही महत्त्वाची कार्ये या केंद्रात नियमितपणे केली जातात. या सेवांसाठी आवश्यक असणारी माहिती उपग्रहांद्वारे मिळण्यासाठी ओशनसॅट-२ या उपग्रहाचे भूस्थानक या केंद्राच्या आवारातच वसवले आहे. केंद्राच्या या कार्यामुळे त्याला महासागर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे व मानाचे स्थान मिळाले आहे.

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राची इमारत

भारत सरकारच्या महासागर विकास विभागाने १९९० च्या दशकात ‘संभाव्य मासेमारी क्षेत्र मोहिम (Potential Fishing Zone (PFZ) Mission)’ हा प्रकल्प सुरू केला आणि तो हैदराबाद येथील राष्ट्रीय सुदूर संवेदना केंद्राकडे (National Remote Sensing Centre) सुपूर्द केला. याची परिणिती म्हणून हा प्रकल्प राष्ट्रीय सूदूर संवेदन केंद्रापासून वेगळा होऊन त्याचे रूपांतर भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र या एका स्वतंत्र स्वायत्त संस्थेमध्ये झाले. नामवंत वैज्ञानिक ए. नरेंद्र नाथ या केंद्राचे पहिले संचालक होते.

संभाव्य मासेमारी क्षेत्र सेवा व सल्ला या प्रमुख कार्याबरोबर भारतातील त्सुनामीचा इशारा, समुद्राच्या स्थितीचे पुर्वानुमान, सागराची प्रारूपे, निरीक्षणे, त्यांच्या उपलब्धतेचे व्यवस्थापन, तसेच संबंधितांना लागणारी माहिती पुरवणे इ. सेवा या केंद्राने नियमितपणे सुरू केल्या. या सेवा संगणकाच्या वेब पोर्टल वरून आणि देशात अनेक ठिकाणी बसवलेल्या इतर यंत्रणांद्वारे पुरवल्या जातात.

संभाव्य मासेमारी क्षेत्र सेवा व सल्ला : या सेवेअंतर्गत माश्यांच्या विविध प्रजातींचे क्षेत्र व वेळ यांचे पुर्वानुमान सांगितले जाते. त्यामुळे मासेमारी करणाऱ्यांचे माशांचे क्षेत्र शोधण्याचा वेळ व श्रम वाचल्याने त्यांना कमी वेळेत जास्त मासे मिळतात. यामध्ये ट्यूना जातीच्या माशांचे पुर्वानुमान उपयुक्त ठरले आहे. ट्यूना जातीचे मासे स्थलांतरित होत असल्याने त्यांचे क्षेत्र शोधण्यासाठी विशेष यंत्रणा वापरावी लागते. कृषी मंत्रालय आणि अंतरिक्ष विभाग यांच्या अखत्यारित असलेल्या संस्था या प्रकल्पात सहभागी आहेत. या संस्था विविध राज्य सरकारांबरोबर समन्वय साधून संबंधितांना ही सेवा पुरवतात. सागरी वनस्पतींच्या हरितद्रव्यामुळे महासागराला आलेला रंग आणि सागराच्या पृष्ठभागाचे तापमान यांची वास्तविक वेळेची (real time) माहिती ओशनसॅट हा उपग्रह तसेच अमेरिकेच्या राष्ट्रीय महासागर व वातावरण व्यवस्थापन (National Oceanic and Atmospheric  Administration – NOAA) या संस्थेकडून मिळत असते. ही माहिती या सेवेचा अत्यावश्यक भाग आहे.

त्सुनामी पुर्वानुमान प्रणाली : (Tsunami Early Warning System – TEWS). सुमात्रा बेटावरील २००४ मध्ये झालेल्या त्सुनामीच्या विध्वंसक परिणामांचा विचार करून भारत सरकारने त्सुनामी व हिंदी महासागरातील तीव्र वादळांच्या पुर्वानुमानाचे केंद्र स्थापन करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने १५ आक्टोबर २००७ रोजी भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रात त्सुनामी पुर्वानुमान प्रणालीची स्थापना केली. यामध्ये भारत सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, अंतरिक्ष विभाग आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद यांचा सहयोग आहे. देशाच्या समुद्र किनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांना त्सुनामीचे पुर्वानुमान व त्याबद्दलची महत्त्वाची माहिती, सूचना आणि सल्ला देणे हे त्सुनामी पुर्वानुमान प्रणाली स्थापन करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी ही प्रणाली अत्याधुनिक साधनसामग्री आणि प्रशिक्षित कर्मचारी व अधिकारी यांनी सज्ज केलेली आहे. हे केंद्र २०१२ सालापासून हिंदी महासागराच्या किनारपट्टीवरील सर्व देशांना २४ तास हिंदी महासागराच्या स्थितीची माहिती व सूचना देण्याची सेवा पुरवत आहे. या त्सुनामी पुर्वानुमान प्रणालीला भारतीय हवामानशास्त्र विभागाची १७ भूकंपमापन स्थानके, वाडिया हिमालय भूविज्ञान संस्थेची १० स्थानके आणि ३०० हून अधिक आंतरराष्ट्रीय स्थानके यांच्याकडून महासागरांच्या स्थितीची आणि भूकंपाची आकडेवारी व माहिती मिळत असते. याशिवाय समुद्रांच्या लाटांसंबंधीची माहिती १७ स्थानकांकडून दर पाच मिनिटांनी मिळत असते. ही माहिती समुद्रांच्या निरनिराळ्या भागांत ठेवलेले लाटांचे संवेदक (sensors) आणि समुद्रांच्या पाण्यावर तरंगणारी सुसज्ज साधने (Buoys) यांच्यामार्फत मिळत असते.

भूकंप मापन यंत्रणा, लाटांचे संवेदक व पाण्यावर तरंगणारी साधने हे एकमेकांना जोडून त्यांचे जाळे (network) केलेले असून त्याद्वारे सर्व माहिती व निरीक्षणांची आकडेवारी त्सुनामी पुर्वानुमान प्रणालीला मिळत असते. यांच्या आधारे प्रारूपे तयार करून संपूर्ण किनारपट्टीवरील महापुरांची स्थिती दर्शविणारे नकाशे तयार केले जातात. त्यावरून धोकादायक क्षेत्रांसाठी माहिती, इशारे व सावधगिरीच्या सूचना स्थानिक आपत्ती निवारण व व्यवस्थापन अधिकाऱ्यांना ठरावीक वेळेच्या अंतराने वारंवार दिल्या जातात. या पूर्वसूचनांमुळे धोकादायक स्थानांवरून नागरिक व महत्त्वाची साधनसामग्रीयांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करणे तसेच पुनर्वसनासाठी इतर सोईसुविधा तयार ठेवणे शक्य होते.

महासागराच्या स्थितीचे पुर्वानुमान  : (Ocean State Forecast). पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर व पूर्वेला बंगालचा उपसागर यांच्या पाण्याने भारत देश वेढलेला असल्यामुळे तो द्वीपकल्प झाला आहे. या सागर, महासागर व उपसागर यांच्या पाण्यावर तसेच किनारपट्टीवर अनेक उद्योग चालू असतात. त्यांच्या स्थितीचे पुर्वानुमान वेळोवेळी कळणे सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप गरजेचे असते. सागराचा स्थानिक हवामानावरही प्रभाव होत असतो. या सर्वांचा विचार करता सागराच्या स्थितीचे पुर्वानुमान देण्याच्या सेवेचे महत्त्व लक्षात आले. या सेवेचे नाव हिंदी महासागर पुर्वानुमान प्रणाली (Indian Ocean Forecasting System – INDOFOS) असे आहे. हे पुर्वानुमान ग्रामीण माहिती केंद्रे, आकाशवाणी, डिजिटल फलक, बिगर सरकारी संस्थांची संकेत स्थळे, दूरदर्शन वाहिन्या इत्यादींच्या माध्यमातून प्रादेशिक भाषांमध्ये संबंधितांपर्यंत पोहचवले जाते.

महासागराच्या स्थिती सेवेअंतर्गत समुद्राच्या लाटांची उंची व दिशा, समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान व त्याचा प्रवाह, पाण्याच्या स्तरांची खोली इत्यादींचे पुर्वानुमान दिले जाते.  पुर्वानुमान अत्याधुनिक सांख्यिकीय प्रारूपांनी तयार केले जाते. हवामानाच्या पुर्वानुमानासाठीची प्रारूपे वापरून समुद्राच्या स्थितीच्या पुर्वानुमानासाठी काही विशिष्ट प्रारूपे तयार केली जातात.

या सेवांव्यतिरिक्त काही मूल्यवर्धित सेवा पुरवल्या जातात. पुर्वानुमान सेवा जागतिक, क्षेत्रीय, विशिष्ट स्थानासाठी आणि समुद किनारपट्टींसाठी अशा चार स्तरांवर दिली जाते. स्थळ आणि काळ यानुसार ती बदलते. पुर्वानुमानाची अचूकता विषेशत: मोसमी पावसाच्या दिवसांत आणि तीव्र हवामानाच्या काळात, अतिशय सूक्ष्मरित्या तपासली जाते. समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान आणि पृष्ठभागापासून २,००० मीटरपर्यंतच्या पाण्याच्या खोलीची क्षारता काही ठरावीक कालांतराने मोजणे व त्यांची नोंद ठेवणे हे या गटाचे मुख्य कार्य आहे. यासाठी जी यंत्रणा वापरली जाते; त्यामध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणांच्या निरीक्षणांच्या नोंदी केल्या जातात व त्या काही तासांतच नागरिकांसाठी उपलब्ध होतात. या यंत्रणेचे नाव अर्गो आहे. या यंत्रणेमुळे सागरावरील वातावरणाच्या स्थितीचे सतत अवलोकन होते. यामध्ये समुद्रावर तरंगणाऱ्या यंत्रणेचा समुद्र सपाटीपासूनची उंची मोजणाऱ्या यंत्रणेशी समन्वय साधला जातो. समुद्राच्या पाण्याच्या वरच्या थरातील तापमान आणि त्याचा स्थल व काळानुरूप विस्तार, पाण्याच्या खोलीनुसार त्याची क्षारता या सर्वांच्या नोंदी अर्गोमध्ये होत असतात. अर्गोमुळे सागराच्या पाण्याच्या वरच्या पातळीची स्थिती आणि वातावरण बदलाचा आकृतिबंध यांचा अभ्यास करणे सोयीचे होते. यामध्ये समुद्रसपाटीपासूनची उंची मोजणारी यंत्रणा महत्त्वाची ठरते.

सागर व महासागर यांच्या स्थितीबद्दलची संपूर्ण माहिती देणाऱ्या पुर्वानुमानासाठी अत्यावश्यक आकडेमोड करणारा उच्च क्षमतेचा व अतिजलद कार्य करणारा महासंगणक आणि विश्वासार्ह माहिती देणारी प्रणाली भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रात उपलब्ध आहेत.

प्रशिक्षण व क्षमता निर्मिती : भारतातील व हिंदी महासागराच्या किनारपट्टीवरील देशांतील विद्यार्थी व तरूण शास्त्रज्ञांसाठी कमी व दीर्घ कालावधीचे अधिकृत प्रशिक्षण भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रात दिले जाते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता : संयुक्त राष्ट्रसंघाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषदेचा आंतरसरकारी समुद्रशास्त्रीय आयोगाने (The Intergovernmental Oceanographic Commission – (IOC) of UNESCO) भारतीय त्सुनामी पुर्वानुमान प्रणालीला हिंदी महासागराच्या किनाऱ्यावरील देशांसाठी क्षेत्रीय त्सुनामी सेवा केंद्र म्हणून मान्यता दिली आहे.

सर्व निरीक्षणांची, उपग्रहांद्वारे मिळालेली व सागरांसंबंधीच्या आकडेवारींच्या माहितीची भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रात (INCOIS) गुणवत्तापूर्वक तपासणी करून त्यांचे व्यवस्थितपणे माहिती केंद्रात जतन केले जाते. ही माहिती विद्यार्थी, संशोधक व इतर संबंधितांना गरजेनुसार पुरवली जाते. माहिती केंद्राला राष्ट्रीय समुद्रशास्त्राच्या माहितीचे केंद्र (National Oceanographic Information Centre (NOIC), आंतरराष्ट्रीय समुद्रशास्त्रीय आयोग (IOC) आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषदेच्या आंतरसरकारी समुद्रशास्त्रीय माहिती आदान प्रदानाने (UNESCO’s International Oceanographic Data and Information Exchange) हिंदी महासागराचे क्षेत्रीय अर्गो माहिती केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. हे केंद्र सागराच्या निरीक्षणाच्या आकडेवारींचे विश्लेषण करून जागतिक स्तरावरील माहिती जतन करून ठेवते. या माहितीचा उपयोग मोसमी पावसाच्या आणि सागरावरील हवामानाच्या पुर्वानुमानासाठी होतो.

भारतीय भूकंप माहिती (Indian Seismic Data – ISD) प्रणाली आणि उपग्रहांची स्थिती, भ्रमण व वेळ यांची माहिती देणारी जागतिक स्तरावरील प्रणाली (Global Navigation Satellite System – GNSS) या दोन्हींचे जाळे (ISGN) तयार करून संशोधन व पुर्वानुमान यासाठी उत्तम दर्जाची माहिती पुरवली जाते.

उपग्रहांद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे त्सुनामीचा तत्काळ इशारा देणारी यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषदेचा आंतरसरकारी समुद्रशास्त्रीय आयोग (UNESCO’s Intergovernmental Oceanographic Commission) आणि भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र यांच्यात समुद्रशास्त्र आणि समुद्राच्या स्थितीचे पुर्वानुमान यासंबंधीचे प्रशिक्षण व क्षमता निर्मितीचा जुलै २०१३ मध्ये करार झालेला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषदेच्या आंतरसरकारी समुद्रशास्त्रीय आयोगाचे भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र हे कायमस्वरूपी सदस्य आहे. शिवाय हे केंद्र हिंदी महासागर जागतिक महासागर निरीक्षण प्रणाली (Indian Ocean Global Ocean Observing System; IOGOOS) व महासागर निरीक्षणांची भागीदारी (Partnership for Observing the Ocean; POGO) यांचे निधी सदस्य (Funding Member) आहे. हिंदी महासागर आणि जागतिक महासागर निरीक्षण प्रणाली (IOGOOS) व महासागर निरीक्षणांची भागीदारी (POGO) हे दोन्हीही प्रशिक्षण, क्षमता निर्मिती आणि विद्यार्थी व वैज्ञानिक यांची आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण करण्यात सक्रिय आहेत.

या केंद्राला जागतिक हवामानशास्त्र परिषद व जागतिक महासागर संदर्भातील विविध आंतरराष्ट्रीय परिषदा, आयोग, गट इत्यादींचे सदस्यत्व प्राप्त झाले आहे. सरत-१ ही समुद्रातील शोध मोहीमेचा वेळ व खर्च वाचवणारी संगणक प्रणाली भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने तयार केली आहे. याचा उपयोग आपत्कालीन घटनांमध्ये होतो. केंद्राने इंजिन विरहित तरंगक आकाशयान (Glider), ओशनसॅट डेटा व त्याची प्रक्रिया, समुद्राच्या उष्णतेच्या लाटांची सल्ला सेवा आणि भारतातील मुख्य भूभाग, अंदमान निकोबार बेटे व समुद्र किनारपट्टीवरील विविध धोक्यांच्या असुरक्षित स्थानांचा १०५४ नकाशांचा संच (Multihazard Vulnerability Atlas) या चार नवीन अत्याधुनिक सेवासुविधा सुरू केल्या आहेत.

कळीचे शब्द : #महासागर #त्सुनामी #भूकंप

संदर्भ : 

समीक्षक : मोहन मद्वाण्णा