(स्थापना : १५ जानेवारी १८७५). भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली व देशाला हवामानविषयक सेवा पुरवणारी राष्ट्रीय संस्था. हवामानाची निरीक्षणे घेऊन त्यांच्या नोंदी ठेवणे, अभ्यास व संशोधन करणे हे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महत्त्वाचे कार्य आहे. प्रारंभी या विभागाचे मुख्य कार्यालय कोलकाता येथे तर विभागीय कार्यालये कोलकाता, लाहोर, मद्रास व अलाहाबाद येथे सुरू झाले, त्यानंतर वेधशाळेच्या भारतभर शाखा सुरू झाल्या. कोलकाता येथील केंद्रीय वेधशाळा सोडून इतर वेधशाळा प्रांतीय संस्थांच्या अधिपत्याखाली कार्य करत होत्या.

भारतीय हवामानशास्त्र विभागाची इमारत, दिल्ली.

भूकंपशास्त्र हे हवामानशास्त्राचा भाग असल्याने कोलकाता येथील अलीपोर येथे १८८८ साली भूकंपासंबंधी निरीक्षण करणारी पहिली वेधशाळा स्थापन झाली. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्य कार्यालय १९०५ साली कोलकात्याहून सिमला येथे व त्यानंतर मार्च १९२८ मध्ये पुण्यातील शिवाजीनगर येथे स्थलांतरित झाले. आजही हे कार्यालय सिमला ऑफीस या नावाने ओळखले जाते. सर्व निरीक्षणाच्या नोंदी, साधनसामग्री आणि कर्मचारी व अधिकारी सिमला येथून पुण्यातील कार्यालयात स्थलांतरित झाले. संपूर्ण भारताच्या हवामानाचा अहवाल १ एप्रिल १९२८ पासून पुण्याच्या विभागातून प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली.

कृषी हवामानशास्त्राच्या संशोधनासाठी स्वतंत्र कक्ष, जागतिक स्तरावर माहितीची देवाणघेवाण करण्याची सोय असणारा खास संगणक आणि हवामानाच्या पुर्वानुमानासाठी अत्यावश्यक मोजमापे घेणाऱ्या यंत्रसामग्रींची निर्मिती करणारा कक्ष हे सर्व १९३२ साली पुण्यातील भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या इमारतीमध्ये स्थापन करण्यात आले. १९३९ साली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी आवश्यक असणारी हवामानविषयक माहिती त्वरीत उपलब्ध होण्यासाठी हवामान खात्याचा मुख्य अधिकारी देशाच्या मुख्य वायुदलाच्या कार्यालयाच्या नजीक व सतत संपर्कात असणे गरजेचे होते. यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्य कार्यालय १९४५ साली दिल्ली येथे हलविण्यात आले.

महाविद्यालयीन अभ्यासक्रमात हवामानशास्त्राचा समावेश नसल्याने भारतीय विभागातील कर्मचारी व अधिकारी हे भौतिकशास्त्र, गणित व तत्सम विषयातील पदवीधर असायचे. त्यामुळे आवश्यक  प्रशिक्षण विभाग १९४२ साली पुण्यात सुरू करण्यात आला. १९५० साली हवामानाचे विशेषतः मोसमी पावसाचे पुर्वानुमान सांख्यिकी पद्धतीने करण्यास सुरुवात झाली. त्यासाठी संगणकाचा वापर सुरू झाला. त्याच सुमारास उपग्रहांद्वारे मिळणाऱ्या माहितीचाही वापर करण्यास सुरुवात झाली. दरम्यान हवामानशास्त्र संशोधनासाठी १७ नोव्हेंबर १९६२ रोजी भारतीय हवामानशास्त्र विभागात उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था खास संशोधनकार्यासाठी स्थापन करण्यात आली. १ जानेवारी १९६३ रोजी आंतरराष्ट्रीय हवामानशास्त्र केंद्र मुंबईत स्थापन करण्यात आले. या केंद्राला संयुक्त राष्ट्रसंघाने निधी पुरविला.

हवामानाच्या घटकांच्या नोंदी, अहवाल व तक्ते संगणकीय पद्धतीने जतन करून ठेवण्यासाठी १९७७ साली पुणे येथील कार्यालयात राष्ट्रीय माहिती केंद्र स्थापन केले. यामध्ये १८७५ सालापूर्वीच्याही नोंदी जतन केलेल्या आहेत. या नोंदी कोलकाता येथून सिमला आणि नंतर पुणे इथे कायमस्वरूपी आल्या. कालानुरूप या नोंदी मायक्रोफिल्म ते संगणक पद्धतीने ठेवण्यात आल्या. आता या नोंदी अद्ययावत संगणकामध्ये साठवण्यात येतात. आता भारतीय हवामानशास्त्र विभाग जागतिक हवामानशास्त्र संघटनेचा संस्थापक सदस्य आणि कायमस्वरूपी प्रतिनिधी आहे.

हवामानशास्त्र विभागाची उद्दिष्टे : (१) हवामानाच्या विविध घटकांची सतत निरीक्षणे करणे, त्यांचे विश्लेषण व त्यावर आधारित सद्यस्थितीचे व पुढील काळासाठीच्या हवामानाचे पुर्वानुमान  कृषी, जलसंधारण, नौकानयन, हवाई वाहतूक, समुद्रातील इंधन शोधन इ. क्षेत्रांना नियमितपणे पुरविणे. (२) उष्णकटिबंधीय वादळे, धुळीची वादळे, अतिवृष्टी, उष्णतेची व थंडीची लाट, विजा कोसळणे, हवेतील प्रदूषणाची पातळी वाढणे यासारख्या तीव्र हवामानाच्या आपत्तींचे विभागनिहाय पुर्वानुमान वर्तवणे व त्यासंबंधी योग्य तो इशारा देणे, तसेच (३) हवामानशास्त्र व त्याला संलग्न असलेल्या विषयात संशोधन करणे आणि अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे.

संघटनात्मक रचना : नवी दिल्ली, गुवाहाटी, चेन्नई, कोलकाता, मुंबई व नागपूर ही सहा प्रादेशिक हवामान केंद्रे; आगरतळा, अहमदाबाद, अमरावती, बेंगलोर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, गोवा, हैदराबाद, ईटानगर, जयपूर, लेह, लखनौ, पाटना, रायपूर, रांची, शिलॉंग, सिमला, श्रीनगर, तिरुअनंतपुरम ही बावीस हवामान केंद्रे; आणि पुण्यातील हवामान संशोधन व सेवा केंद्र, कृषी हवामान कक्ष, प्रशिक्षण संस्था, हवामानविषयक माहिती जतन व प्रकाशन केंद्र; कोलकाता येथील स्थितीविषयक खगोलशास्त्र केंद्र आणि नवी दिल्ली येथील उत्तर हिंदी महासागरातील विषुवृत्तीय चक्रीवादळांचा अभ्यास व पुर्वानुमान देणारे प्रादेशिक केंद्र, वातावरणातील वरच्या थरातील हवेची निरीक्षणे नोंदवण्यासाठीची यंत्रसामग्री कक्ष आणि मध्यवर्ती हवाई वाहतूक हवामानसेवा कक्ष ही सात विशेष सेवा केंद्रे; तसेच देशभरातील शेकडो वेधशाळा यांच्यामार्फत व समन्वयाने भारतीय हवामानशास्त्र विभाग देशाला हवामानविषयक सर्व प्रकारची सेवा अविरतपणे पुरवीत असतो.

भारतीय हवामानशास्त्र विभाग हा जागतिक हवामानशास्त्र‌ परिषदेच्या सहा विशेष क्षेत्रिय हवामानशास्त्र केंद्रांपैकी एक आहे. या केंद्रावर मलाक्का सामुद्रधुनीसह उत्तर हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि पर्शियाचे आखात येथील विषुवृत्तीय वादळांचा अंदाज देणे व तो सर्वत्र पोहचविणे तसेच त्या वादळाचे नामकरण करणे या विशेष जबाबदाऱ्या आहेत.

हवामानाच्या निरीक्षण व अभ्यासासाठी कल्पना व मेघाट्रॉपिक्स उपग्रह, भारतीय सुदूर संवेदन (Indian Remote Sensing – IRS), भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली (Indian National Satellites system – INSAT), भारतीय व्यापारी व नौदलाच्या बोटी यांच्यावरील खास उपकरणांनी घेतलेल्या निरीक्षणांच्या नोंदी, तसेच देशातील भूकंप निरीक्षण केंद्रांच्या भूकंपांच्या नोंदी इत्यादी भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे त्यांच्या नेटवर्कद्वारे येतात. यांचा उपयोग हवामानाच्या पुर्वानुमानासाठी केला जातो.

नवीन उपक्रम :

  • चेन्नई (नंगमबक्कम), मुंबई (कुलाबा), गोवा (पणजी), पुणे व तिरुअनंतपुरम या पाच वेधशाळांना १०० वर्षांहून अधिक काळासाठी दूरपल्ल्याची निरीक्षण केंद्रे म्हणून जागतिक हवामानशास्त्र‌ परिषदेची मान्यता मिळाली आहे.
  • भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या प्रादेशिक दळणवळणाच्या उडान या योजनेअंतर्गत नवीन वैमानिक हवामान स्थानके कार्यान्वित केली.
  • हवामानाची गतिशील प्रारूपे तयार करून त्यांचा वापर हवामानाचे पुर्वानुमान वर्तवण्यासाठी केला जात आहे.
  • हवामानशास्त्राच्या प्रशिक्षण केंद्राला जागतिक हवामानशास्त्र परिषदेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे.
  • प्रदुषक घटकांची निरीक्षणे घेऊन त्यावर आधारित हवेच्या प्रदुषणाची पातळी दाखविणारा आणि हवेच्या गुणवत्तेचे पुर्वानुमान व इशारा देणारा ‘सफर’ (System for Air quality, weather Forecasting and Research – SAFAR) हा प्रकल्प भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था (IITM) व राष्ट्रीय मध्यम पल्ल्याचे हवामानाचे पुर्वानुमान केंद्र (NCMRWF) यांच्याबरोबर भारतीय हवामानशास्त्र विभाग यशस्वीपणे राबवीत आहे तसेच यांच्याच सहयोगाने वीज कोसळण्याच्या आपत्तीचे स्थलनिहाय पुर्वानुमान व इशारा देणारी दामिनी ही प्रणाली कार्यान्वित केली आहे.
  • भारत सरकारने मोबाईल फोनमध्ये वापरण्यासाठी अनेक वाहिन्या व स्थानके असणारी, एकत्रितपणे अनेक सेवा देणारी, बहुभाषिक व सुरक्षित अशी उमंग (Unified Mobile Application for New-age Governance – UMANG) नावाची प्रणाली निर्माण केलेली आहे. या प्रणालीमध्ये भारतीय हवामानाच्या सेवांचा समावेश केला गेला. या सेवेअंतंर्गत सद्यस्थितीचे हवामान, सद्यस्थितीच्या हवामानाचे पुर्वानुमान, शहराच्या हवामानाचे पुर्वानुमान, पावसासंबंधीची माहिती, वादळे, महापूर, इत्यादींचे इशारे तसेच पर्यटनासाठी हवामानाची माहिती यांचा समावेश केला आहे.
  • जिल्हानिहाय विविध प्रकारच्या १३ आपत्तींची क्षेत्रे दर्शविणाऱ्या नकाशाचा संच (ॲटलास) प्रसिद्ध करण्याचे महत्त्वाचे काम भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकतेच केले आहे. यामध्ये दुष्काळ, चक्रीवादळे, धुळीची वादळे, वीज, महापूर, गारपीट, उष्णतेची लाट, थंडीची लाट, धुके, इत्यादी आपत्तींचा समावेश आहे. याचा उपयोग आपत्तींच्या काही काळ आधी तसेच दीर्घकालीन जिल्हानिहाय आपत्ती निवारण धोरण ठरविण्यासाठी व योग्य व्यवस्थापन करण्यासाठी होईल.

हवामानविषयक सेवेचा दर्जा सातत्याने उत्तम ठेवण्यासाठी विभाग कटीबद्ध आहे. हवामानाचे स्थल, काल आणि ऋतू नुसार पुर्वानुमान जास्तीतजास्त बरोबर होण्यासाठी अत्याधुनिक प्रणालींची निर्मिती व वापर केला जात आहे. हवेच्या निरनिराळ्या घटकांच्या व्यवस्थित नोंदी घेणारी अत्याधुनिक साधनसामग्री, यंत्रणा, हवेच्या व पावसाच्या अंदाजासाठी लागणारी किचकट आकडेमोड करणारे अतिजलद सक्षम संगणक आणि अनुभवी अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या सहयोगाने भारतीय हवामानशास्त्र विभाग विकसित राष्ट्रांच्या बरोबरीने वाटचाल करीत आहे. हवामानाचे पुर्वानुमान, सेवा व प्रकाशने यासंबंधीची आणि इतर माहिती https://mausam.imd.gov.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कळीचे शव्द : #हवामान #पूर्वानुमान #वादळे #अतिवृष्टी #भूकंप

संदर्भ :

  • Sikka D.R., Fifty Golden Years of IITM, Indian Institute of Tropical Meteorology, Pune, 2011
  • Sikka, D. R. (1999). The Role of the India Meteorological Department, 1875-1947,   Chattopadhyaya Debi Prasad (editor), History of Science, Philosophy and Culture in Indian Civilization: pt. 1. Science, Technology, Imperialism and War. Pearson Education India. pp. 381–429. ISBN 978-81-317-2818-5.
  • Sikka D.R., Two decades of Medium – Range Weather Forecasting in India: National Centre for Medium Range Weather Forecasting, COLA (Ceter for Ocean-Land Atmosphere Studies, USA) Technical report No. 276, May 2009
  • Celebrating 145th Foundation Day on 15th January 2020 India Meteorological Department, New Delhi : inheritance of 145 years’ serving the Nation,
  • Golden jubilee (1928-1978), Meteorological Office, Poona, 1978.
  • Indian meteorological department, Hundred years of weather services (1875-1975), New Delhi, 1976.

समीक्षक : मोहन मद्वाण्णा