मॉण्टेसेशिया विडाली या वनस्पतीचे अवशेष 100 वर्षांपूर्वी स्पेनमधील चुनखडकाच्या शिळछाप्यांमध्ये सर्वप्रथम आढळले. पायरेनीज (Pyrenees) व ऐबेरीयन पर्वतरांगांतील गोड्या पाण्याच्या चुनखडकांत सापडलेले हे अवशेष 130-125 दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या मॉण्टसेशिया विडाली या वनस्पतीचा उलगडा करतात. याच वनस्पतीच्या सहस्राहून अधिक अवशेषांचा अभ्यास करून इंडियाना विद्यापीठाचे डेविड डिल्चर यांनी ही वनस्पती पुरातन कालीन पहिली सपुष्प (अँजिओस्पर्म) वनस्पती असल्याचा निष्कर्ष काढला आहे. या शोधामुळे जलचर वनस्पती ह्या सपुष्प वनस्पतींच्या उत्क्रांतिकाळातील मुख्य घटक असून आधीच्या काही सपुष्प वनस्पतींच्या फेरबदलात त्यांचा वाटा असल्याचे समजते.
मॉण्टसेशिया विडाली या जलचर वनस्पतीने पाण्याखालील अधिवासास उत्तम रीत्या जुळवून घेतल्याचे दिसते. तिला कोणत्याही प्रकारचे पुष्पदल व मुळे नाहीत. तिच्या फांद्या बारीक व लवचिक असून शेवटी प्रजननात्मक अवयव असतात. तसेच तिला
दोन वेगळे पर्णविन्यास व पानांचे आकार आहेत. एका प्रकारच्या खोडास अभिमुख (समोरासमोर) फांद्या, आरीसारखी लांबलचक पाने व क्वचित असलेली फळे; तर दुसऱ्या प्रकारात एकाआड एक फांद्या, छोटी खवल्यासारखी पाने आणि सदैव फळे असतात. जोडीने येणाऱ्या फळांना आवरण असून टोकाला छिद्र असते. कातडी पातळ असून तिच्यामध्ये रंध्रे असतात. अंडाशय सरळ असल्याने पाण्याच्या प्रवाहामार्फत जलीय परागीकरण होते. खोडाचे दोन प्रकार असूनही एकसारखे स्त्री-अवयव असल्याने ते एकाच प्रजातीचे आहेत. यास कोणतेही पुरुष अवयव नाहीत, हे अवशेषांवरून आढळते. फळात एकच कोशबद्ध बी असते, म्हणून याचा सपुष्प वनस्पतीमध्ये समावेश केला आहे.
मॉण्टसेशिया विडाली या वनस्पतीचे सेरॅटोफायलम या जलीय वनस्पतीशी बरेच साम्य आहे. परंतु त्या वनस्पतीबाबत अधिक माहिती नसल्याने, मॉण्टसेशिया विडाली ही मॉण्टसेशियासी या नवीन कुलात समाविष्ट करण्यात आली आहे.
संदर्भ :
- Gomez, B., Daviero-Gomez, V., Coiffard, C., Martín-Closas, C. and Dilcher, D.L., 2015.
- Montsechia, an ancient aquatic angiosperm. Proceedings of the National Academy of Sciences, Vol. 112, No. 35 : 10985-10988.
समीक्षक – बाळ फोंडके