चक्रवर्ती, काजल : (२४ डिसेंबर १९७३). केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेतील एक प्रमुख वैज्ञानिक. चक्रवर्ती यांचे प्रमुख संशोधन सागरी वनस्पती व प्राणी यांपासून जैव सक्रिय रेणूंची निर्मिती, अन्न रसायनशास्त्र आणि जलीय अन्न उत्पादन तंत्रज्ञान आणि आहारातील पूरक व आरोग्य व्यवस्थापन म्हणून उच्च मूल्याच्या उत्पादनांचा विकास करणे यांमध्ये आहे.
चक्रवर्ती यांचा जन्म दुर्गापूर, पश्चिम बंगाल (भारत) येथे झाला. पश्चिम बंगालच्या बिधानचंद्र कृषी विश्वविद्यालयातून त्यांनी कृषी विज्ञानामध्ये पदवी संपादन केली (१९९६). त्यानंतर त्यांनी नवी दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण घेतले (१९९९) आणि पुढे पीएच.डी. मिळविली (२००३). त्यानंतर ते केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेमध्ये (Central Marine Fisheries Research Institute; CMFRI) संशोधक म्हणून रूजू झाले. तेथे सेवेत असतानाच त्यांनी अमेरिकेतील मिसिसिपी विद्यापीठातून उच्च शिक्षणकरिता अधिछात्रवृत्ती मिळविली.
चक्रवर्ती यांच्या संशोधन कामगिरीमध्ये निवडक समुद्री शैवालांपासून संधिवात, मधुमेह (प्रकार-दोन), उच्च रक्तदाब, सदोष लिपिडसंचयन (Dyslipidemia), अवटुअल्पक्रियता (Hypothyroidism) या आजारांवर मात करणाऱ्या पुष्टीवर्ध-रोगव्ययी चिकित्सक (Neutraceuticals) उत्पादनांचा विकास आणि व्यावसायिक वापर यांचा समावेश आहे (न्यूट्रास्युटिकल हा शब्द स्टीफन डी फेलिस यांनी १९८९ मध्ये प्रथमत: वापरला). चक्रवर्ती यांच्या नवीनतम संशोधनामध्ये अस्थिसुषिरता (Osteoporosis) कमी करणाऱ्या आणि रोगप्रतिकारक्षमता वाढवणाऱ्या पुष्टीवर्ध-रोगव्ययी घटकांचा विकास यांचा समावेश आहे.
कोव्हिड महामारीमुळे विशेषत: रोगप्रतिकारक्षमता वाढवणाऱ्या पुष्टीवर्ध-रोगव्ययीच्या त्यांच्या संशोधन गटाकडे अधिक लक्ष वेधले गेले आहे. त्यांच्या संशोधन गटाने बहुप्रतिरोधक ग्रॅम-ऋण (Gram-negative) रोगाणूंच्या विरुद्ध उपचारासाठी प्रतिजैविक तयार केले आहे. सागरी शैवालांपासून मधुमेहासहित जीवनशैलीशी निगडित विविध आजारांच्या उपचारासाठी अनेक न्यूट्रास्युटिकल बनवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे.
चक्रवर्ती यांना पुढीलप्रमाणे अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे : सर्वोत्तम पीएच.डी. विद्यार्थी सुवर्णपदक तसेच उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी व अत्युत्तम प्रबंध याबद्दल पुरस्कार (२००३), भारतीय मत्स्य मंचातर्फे टी. जे. पांडियन आणि ए. जे. मट्टी पुरस्कार (२००८), भारतीय विज्ञान काँग्रेस मंडळातर्फे प्राण व्होरा पुरस्कार (२००८), डॉ. एस. अय्यप्पन यांच्यातर्फे प्रशंसा प्रमाणपत्र (२००८), केंद्रीय मासेमारी शैक्षणिक संस्थेतर्फे डॉ. सी. व्ही कुलकर्णी अत्युत्तम युवा शास्त्रज्ञ पुरस्कार (२०१३). भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट संशोधनासाठी दर पाच वर्षांनी एकदा दिल्या जाणाऱ्या नॉर्मन बोरलॉग पुरस्काराने चक्रवर्ती यांना गौरवण्यात आले (२०२०).
कृषी विषयक विविध नियतकालिकांमध्ये त्यांची २०० हून अधिक प्रकाशने प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी आतापर्यंत १० पुस्तकांचे लिखाण केले आहे. त्यांच्या नावे १० एकस्वे (पेटंट) आहेत. परदेशी निधीतून सागरी प्राण्यांसंबंधित विविध विषयांवर त्यांचे संशोधन सुरू आहे.
चक्रवर्ती सध्या केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेच्या केरळ विभागात कार्यरत आहेत.
कळीचे शब्द : #लिपीडसंचयन #अवटुअल्पक्रियता #अस्थिसुषिरता #पुष्टीवर्ध-रोगव्ययी चिकित्सक
संदर्भ :
समीक्षक : अनिल गांधी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.