मूळ भाग वितरित केल्यानंतर जे शुल्लक भाग वितरित केले जाते, ते म्हणजे हक्क भाग; परंतु विद्यमान भागधारकाचे त्याने धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात अभिदान (सबस्क्राईब) करण्याचे हक्क अंगभूत असतात. अशा प्रकारचे भाग विद्यमान समन्याय भागधारकांना आनुपातिकपणा या तत्त्वावर देणे गरजेचे आहे. कंपनी कायद्यातील कलम ८१ नुसार कंपनी स्थापनेच्या दोन वर्षांनंतर किंवा पहिल्यांदा समभाग वितरित करून एक वर्ष पूर्ण झाले असेल किंवा या दोन्हींपैकी जे प्रथम असेल, त्या वर्षानंतरच हक्क भाग वितरित करता येतात. हा हक्क भाग १९५६ च्या भारतीय कंपनी कायदा कलम ८१ (१) नुसार अस्तित्वात आला आहे.

हक्क भागाचा प्रस्ताव हा प्रस्तावित हक्क भागांच्या तपशिलासह नोटीसद्वारे लेखी स्वरूपात देण्यात येतो. शिवाय प्रस्ताव स्वीकारण्याची एकूण मुदत प्रस्ताव दिलेल्या दिवसापासून ते प्रस्ताव स्वीकारण्याच्या अंतिम तारखेच्या दिवसापर्यंत (१५ दिवसांपेक्षा कमी नसावी) ग्राह्य असते. हे हक्क भाग जर विद्यमान विभागधारकांनी विहित केलेल्या १५ दिवसांच्या मुदतीत स्वीकारले नाही, तर मुदतीनंतर हे हक्क भाग नवीन सभासदांना जारी (वितरित) करता येतात. सामन्यतः अशा प्रकारचे हक्क भाग हे विद्यमान भागधारकांनांच सवलतीच्या दरात दिले जातात.

हक्क भाग वितरित करण्याच्या तरतुदी :

  • असे हक्क भाग त्या व्यक्तींना देण्यात येतील, जे प्रस्ताव दिलेल्या तारखेला, कंपनीचे समन्याय भागधारक आहेत आणि परिस्थिती प्रमाणे नियमांचा स्वीकार करून त्या तारखेला त्या समभागांवर भांडवल अदा करण्यास तयार आहेत.
  • हक्क भाग प्रस्ताव वर नमूद केल्याप्रमाणे व्यक्तिला प्रस्तावित हक्क भागांची संख्या निर्दिष्टित करून नोटीसद्वारे माहिती देण्यात यावी. शिवाय हा प्रस्ताव कालावधी दिलेल्या प्रस्ताव राखेपासून १५ दिवसांपेक्षा कमी नसावा. जर या विहित मुदत कालावधीत त्या व्यक्तीने हक्क भाग प्रस्ताव स्वीकारला नाही, तर तो प्रस्ताव त्या व्यक्तीने नाकारला, असे मानले जाते.

हक्क भागाचे फायदे :

  • विद्यमान भागधारकांवर नियंत्रण राहते.
  • समभागांचे मूल्य वाढते आणि विद्यमान भागधारकांचे नुकसानही होत नाही.
  • कंपनीचे ख्यातीमूल्य (गुडविल) आणि ब्रँड यांची प्रसिद्धी वाढते.
  • समभाग वितरित करण्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च येत नाही.
  • कंपनीला कोणत्याही वेळी आवश्यक असलेल्या कोणत्याही भांडवलाची सहज उपलब्धता होते इत्यादी.

हक्क भागाचे तोटे :

  • समभागांची संख्या वाढल्यामुळे समभागांचे मूल्य कमी होते.
  • हे कोणत्याही व्यवस्थापन समस्येवर केवळ तात्पुरते निराकरण करते; परंतु त्यास कायमस्वरूपी तोडगा नाही.

समीक्षक ꞉ संतोष दास्ताने


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.