अच्युत महाराज(२७ जानेवारी १९२७ -७ सप्टेंबर२०१२). श्री संत अच्युत महाराज हे योगी, प्रवचनकार, धर्मवाड्.मयाचे निर्वचक, नाट्यरचियता, वैदर्भीय संतांचे चरित्रकार, देशप्रेम व धर्मसेवेचा समन्वय साधणारे संत. वैदर्भीय संतांच्या मालिकेतील एक महत्त्वपूर्ण  संत म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. जनमानसात विदर्भ माउली  म्हणून  त्यांना संबोधिले जाते.

अच्युत महाराज यांचा जन्म आणि बालपण : अच्युत महाराजांचे पूर्वज कर्नाटक मधील ‘ खजूर’ हे गाव सोडून विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील ‘वरूड’येथे स्थिरावले होते. वडील श्रीधरपंत वकील आणि आई अन्नपूर्णाबाई यांना तीन मुले व चार मुली झाल्या. त्यातील अच्युत महाराज एक. त्यांचा जन्म वरूड जिल्हा अमरावती येथे झाला. ते लहानपणापासूनच आई सोबत धार्मिक कार्यात सहभागी व्हायचे. ते अकरा वर्षांचे असतानाच दुर्दैवाने १४ नोव्हेंबर १९३४ ला त्यांच्या आईचे निधन झाले.

अच्युत महाराज

एकांतवास व लोककार्यात पदार्पण : अच्युत महाराज स्वभावतः  आध्यात्मिक होते. आईचे निधन, घरची परिस्थिती व ईश्वराचा लागलेला लळा यामुळे त्यांनी ईश्वर भक्ती आणि सेवा याकडे जाण्याचा निर्धार केला. यासाठी त्यांना तुकडोजी महाराज यांचे मार्गदर्शन लाभले. १७ ऑक्टोंबर १९४१ रोजी अच्युत महाराज उर्फ मौनीबुवा यांचे वरखेड येथे पदार्पण झाले.  अच्युत महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यात पत्रव्यवहार झाला. त्यांच्यातील पत्रव्यवहारांची देवाण-घेवाण बरेच दिवस सुरू राहिली. तुकडोजी महाराजांनी सतत बाल अच्युताची देखरेख ठेवण्याकडे लक्ष पुरविले होते. एकांतवासात  ध्यानधारणा, तपश्चर्या झाल्यावर तुकडोजी महाराजांनी आदेश दिल्याप्रमाणे मार्च १९४२ मध्ये या बालसंतांने साधने सोबतच लोककार्याकडे वळण्याचा संकल्प केला.

अच्युत महाराजांची विचारसरणी नेहमीच तर्काधिष्ठित होती. त्यांचा दृष्टीकोण वैज्ञानिक होता. म्हणूनच त्यांनी समाजातील गैरसमजांना, चुकीच्या रूढी-परंपरांना आळा घालण्याचा सदैव प्रयत्न केला. धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या वाईट प्रथांना त्यांनी पायबंद घातला. समाजाला धर्मातील नीतिमत्ता तसेच खरी शिकवण देण्याचा प्रयत्न केला. महाराजांना कित्येक लोकांनी तपोवनातील कुष्ठरोग्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देऊन पाहिला. पण तो सर्व व्यर्थ होता. समाजातील काही लोकांची धारणा होती की कुष्ठरोग्यांच्या संपर्कात आल्याने प्रत्येकाला कुष्ठरोग होतोच! कुष्ठरोग म्हणजे जणू पूर्वजन्मीचे पाप आहे! अशा या वाईट विचारांना महाराजांनी कधी ही खतपाणी घातले नाही. उलट कुष्ठरोग्यांची सेवा करून त्यांच्या सानिध्यात जाऊन, त्यांच्या सहवासात राहून महाराजांनी आपला वैज्ञानिक दृष्टिकोन व मानवतावादी विचार समाजापर्यंत पोहोचविला.

महाराजांनी प्रत्यक्ष तपोवनाच्या वृत्त सेवाकार्यात भाग घेऊन कुष्ठरोग्यांकडून त्यांनी आपल्या अनेक धार्मिक ग्रंथांची छपाई करून, ते ग्रंथ जनतेसमोर ठेवले. अशा अनेक योजना त्यांनी कुष्ठसेवाकार्यासाठी आखल्या होत्या. महाराजांनी जनतेला कुष्ठसेवेसाठी तयार केले होते. समाजात कुष्ठरोगाविषयी असलेले अज्ञान व तिरस्कार दूर करण्याचे महाराजांनी फार मोठे सामाजिक कार्य केले आहे. महाराजांनी तरुणांना शिक्षण, स्वावलंबन व व्यायामाचे धडे दिले. शेतकऱ्यांना कृषी विषयक मार्गदर्शन केले.

श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल

अच्युत महाराजांनी साने गुरुजी मानव सेवासंघा’च्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. महाराजांनी हृदयरुग्णांचे दुःख प्रत्यक्ष पाहिले होते. महाराज एकदा दर्यापूरला असताना तेथील एका रिक्षाने ते वारंवार प्रवास करायचे. त्यातच रिक्षावाल्याशी त्यांचा परिचय झाला. रिक्षावाला एकदा दुःखी होता, त्याला महाराजांनी दुःखी असण्याचे कारण विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीला हृदयरोग झाला आहे आणि दारिद्र्यामुळे आपण आपल्या मुलीला वाचू शकत नाही. मुलीच्या- नशीम बानोच्या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांनी पंचवीस-तीसहजार रुपये खर्च सांगितले होते. त्या रिक्षावाल्याची दहा अकरा वर्षांची मुलगी हृदयरोगाने ग्रासली होती. हा महाराजांनी पाहिलेला प्रत्यक्षानुभव होता. महाराजांनी अशाही परिस्थितीत रिक्षावाल्याला आधार दिला आणि मुलगी वाचेल अशी आशाही व्यक्त केली. प्रवचनाच्या ठिकाणी जाऊन हा प्रसंग सांगितला व लोकांनी मदत केली. त्यातून नशीम बानोला जीवनदान मिळाले. या अनुभवातून महाराजांनी प्रेरणा घेऊन साने गुरुजी मानव सेवासंघाच्या माध्यमातून हृदय रूग्णसेवा संस्था स्थापनेचा निर्णय १९८६ साली घेतला. आणि अल्पावधीतच म्हणजेच १९८७ पासून हृदयशस्त्रक्रियेसाठी मदतनिधी कार्यक्रम सुरू केला. २० मार्च १९८८ला प्रथमच’ हृदयरोग निदान तपासणी शिबिरा’चे त्यांनी आयोजन घडवून आणले. आजतागायत याच हार्ट हॉस्पिटलमध्ये हजारो रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. हे हॉस्पिटल आज गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी आधुनिक सोयी सुविधांनी सज्ज आहे.

लेखन कार्य :

अच्युत महाराजांनी  विपुल  प्रमाणात लेखन केले आहे . त्यांच्या लेखनाचा मुख्य विषय हा अध्यात्म असला तरीही त्यांच्या एकूण साहित्यात मानवसेवा आणि सामाजिक विचार निदर्शनास येतो.  श्रीपंचधारास्तोत्र  (१९६१) हा अच्युत महाराजांचा पहिला ग्रंथ आहे. श्रीमद्भागवत  (१९६५-६६,भाषांतरलेखन ), श्रीमहाभारत खंड  १ ते ५  ( १९६७-१९७२  भाषांतरलेखन ) ही त्यांची साहित्यसेवा अतिशय महत्त्वाची व त्यांच्या भव्यप्रतिभेची जाणीव करून देणारी आहे. रुक्मिणीहरण  (१९७२,नाटक), श्री दुर्गासप्तशती‘ (१९७५), ग्रामगीता तत्त्वसार  (१९७८),  संगीत अध्यात्म रामायण (१९८१),संगीत श्रीशिवलीलामृत, श्री एकविरादेवी संस्थान परिचय  (१९८३ ), संगीतभागवत  ( १९८३ ), खेड्यातील माणसं (१९८६), विनाशाचे मूळ  (१९८७, नाटक ), संगीत देवी भागवत  ( १९८७), संगीत श्रीगुरुचरित्र (१९९३), श्रीमद्भागवतगीता अमृत (१९९४), अथर्ववेद , सामवेद यांचा भावार्थ (१९९५), श्रीदास टेकडीदर्शन (१९९६), यजुर्वेद भावार्थ (१९९६), अथर्ववेदभावार्थ (१९९८), ग्रामगीता अमृत  (१९९८, संस्कृत भाषा), श्रीसत्यनारायणकथा (मराठी भावार्थ, १९९८)  हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ होत. रुद्राध्याय अध्याय पाचवा या  (१९९२) हिंदी भाषेतील काव्याचे लेखनही त्यांनी केले आहे.

वैदर्भीय उपेक्षित संतांचे चरित्रलेखन :

विदर्भ भूमीतील काही संत उपेक्षित, दुर्लक्षित राहिलेले आहेत. त्यांना समाजापर्यंत-वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न अच्युत महाराजांच्या लेखणीतून सफल झालेला आहे. वैदर्भीय संतांच्या लोकोध्दाराचा परिचय करून देण्याच्या उद्देशाने महाराजांनी आपल्या लेखणीतून काही महत्त्वपूर्ण संतांची चरित्रे साकारलेली आहेत. महाराजांनी शब्दबद्ध केलेल्या संतचरित्रातून तत्कालीन संतांच्या जीवन कार्याचा परिचय होण्यास मोलाची मदत होते. शिवाय तत्कालीन जे संत दुर्लक्षित राहिले त्यांची माहिती महाराजांनी लिहिलेल्या चरित्रग्रंथातून समाजापर्यंत पोहोचते. महाराजांनी ज्या वैदर्भीय संतांचे चरित्र लिहिले त्यात संत मायबाई, तात्याजी महाराज, चंद्राजी महाराज, ब्रह्मचारी महाराज, स्वामी रामानंद, संत नारायण इत्यादी संतांची चरित्रे आहेत. महाराजानी विविध प्रकारचे धार्मिक, सामाजिक व ऐतिहासिक स्वरूपाचे लेखन केले आहे. त्यांची भाषासाधी, सोपी, तितकीच हृदयस्पर्शी आहे. अच्युत महाराजांना मराठी व्याकरणाची चांगलीच जाण होती. त्यांनी काव्यामध्ये छंद, अलंकार, वृत्तांचा यथोचित उपयोग केलेला आहे.

चांदूर बाजार येथे अल्पशा आजाराने वयाच्या ८९ व्या वर्षी अच्युत महाराजांचे निधन झाले.

संदर्भ:https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C

समीक्षण : कार्यालयीन स्तरावर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.