नारू हा आजार शरीरात प्रवेश केलेल्या गिनी वर्म नावाच्या परजीवी सूत्रकृमीमुळे होतो. गिनी वर्म या सामान्य इंग्रजी नावाने तर वैद्यकीय भाषेमध्ये ड्रॅकन्क्युलायसिस या नावाने हा आजार ओळखला जातो. हा आजार युरोपियन प्रवाशांना पश्चिम आफ्रिकेतील गिनिया प्रदेशांत आढळल्याने यांचे नाव गिनी वर्म असे दिलेले आहे. या परजीवी गिनी वर्मचे शास्त्रीय नाव ड्रॅकन्क्युलस मेदिनेन्सिस  असे आहे. याचा अर्थ ‘मदिना येथील लहान ड्रॅगन’ असा होतो. साधारणत: मदिना शहरास भेट देणाऱ्या हज प्रवाशांमध्ये हा आजार दिसून येत असे.

नारू : प्रसार

रोगप्रसार : नारू हा सूत्रकृमी (Nematode) संघातील परजीवी आहे. नारू परजीवीचे सूक्ष्म अपरिपक्व अळ्या असलेले सायक्लॉप पिण्याच्या पाण्यातून शरीरात प्रवेश करतात (अळी हा शब्द बहुधा प्रौढ न झालेल्या कीटकासाठी वापरण्यात येतो). सायक्लॉप संधिपाद संघातील कवचधारी वर्गामधील गोड्या पाण्यात आढळणारा १-२ मिमी. लांबीचा सजीव आहे. जठरातील अम्ल माध्यमात सायक्लॉप मृत होतो. त्याच्या शरीरातील नारूच्या अळ्या मानवी अन्नमार्गात विखुरल्या जातात. नर व मादी नारूचे मानवी अन्नमार्गात फलन होते. फलनानंतर नर मृत होतो. मादी अन्नमार्गातून पायांकडील भागात स्थलांतर करते. मादी पावलांच्या घोट्याकडील भागात जाण्याचा प्रयत्न करते. वर्षभरात मादी सूत्रकृमी प्रौढ होते.

सायक्लॉप हा नारूचा द्वितीय आश्रयी आहे. नारूच्या अळ्या पाण्यातील खाद्याबरोबर सायक्लॉपच्या शरीरात प्रवेश करतात. अळ्यायुक्त सायक्लॉप असलेले पाणी पिण्याने अळ्या मानवी अन्नमार्गात येतात. मानव हा नारूचा प्राथमिक आश्रयी आहे (ज्या आश्रयीमध्ये परजीवी प्रजननक्षम असतो त्यास प्राथमिक परजीवी असे म्हणतात). अशा तऱ्हेने नारूचे जीवनचक्र पुन्हा चालू राहते.

फोडातून बाहेर आलेल्या नारू परजीवीचे टोक

लक्षणे : परजीवी शरीरात असल्याचे वर्षभरात कळू शकत नाही. मादी सूत्रकृमी पायाच्या त्वचेखाली पोहोचल्यावर झालेल्या अधिहर्षता (Allergy) क्रियेमुळे परजीवी शरीरात असल्याची लक्षणे दिसून येतात. परजीवीच्या शरीरातील द्रवामुळे आपल्या शरीरातील घटकांची प्रतिक्रिया अधिहर्षतेच्या स्वरूपात होते.  त्वचेखाली वेदनादायक पाण्यासारख्या द्रवाने भरलेला फोड येतो. फोडाच्या सभोवती खाज सुटते. अधिहर्षता, श्वास घेण्यास अडचण, उलट्या आणि वेदना अशीही असू शकते काही दिवसांनी फोडाच्या तळाशी छिद्र दिसू लागते. छिद्रातून पांढऱ्या रंगाच्या परजीवीचे टोक दिसू शकते. पुन्हा पुन्हा पाण्यात पाय धुताना या मादी परजीवीमधून नारूच्या अळ्या पाण्यात सोडल्या जातात.

निदान : मादी नारू पायांवरील फोडातून बाहेर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नारूचा संसर्ग झाल्याचे सहसा कळून येत नाही. पूर्व चाचण्या उपलब्ध नाहीत.

उपचार : नारू झाल्याचा संशय आल्यास मेबेंडॅझोल (Mebendazol) वैद्यकीय सल्ल्याने घेतल्यास सूत्रकृमीचा नाश होतो. प्रौढ सूत्रकृमीवर याचा परिणाम होतो. सूत्रकृमीची अंडी तशीच राहतात. दोन आठवड्यांनी आवश्यकतेनुसार दुसरा डोस घ्यावा लागतो. मेबेंडॅझोलचा सहपरिणाम म्हणजे पोटात वेदना होतात.

शस्त्रक्रियेद्वारे सूत्रकृमी जखमेच्या ठिकाणाहून काठीला गुंडाळून काढण्यात येतो. या प्रक्रियेला सूत्रकृमीच्या लांबीनुसार काही दिवस किंवा आठवडे लागू शकतात. जखमेवर आवश्यकतेनुसार प्रतिजैविक मलम लावला जातो. तसेच जखमेची जागा स्वच्छ करून त्याला मलमपट्टी केली जाते.

प्रतिबंधात्मक उपाययोजना : भारतीय कुटुंब आणि आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय नारू निर्मूलन कार्यक्रम राज्य आणि केंद्रीय स्तरावर ५०% सहभागाने १९८३ – ८४ मध्ये सुरू केला. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (National Centre for Disease Control, NCDC) तसेच राष्ट्रीय अधिहर्षता आणि संसर्गजन्य रोग संस्था (National Institute of Allergy and Infectious Diseases, NIAID) यांच्या सहकार्याने यासाठी आराखडा बनवण्यात आला. नारू आढळल्यानंतर त्याची नोंद प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. रुग्णांवर उपचार म्हणून  टेमेफॉस (Temephos, 50% EC) नावाचे पिण्याच्या पाण्यातील डास, सायक्लॉप , इतर अळ्या नष्ट करणारे औषध एक मिग्रॅ. प्रति एक लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून पाणी पुरवण्यात आले. वर्षातून आठ वेळा अळीनाशक घातल्याने आणि नायलॉनच्या जाळीतून पाणी गाळल्याने सायक्लॉप आणि पर्यायाने नारूच्या अळ्यांचा प्रसार थांबला. ज्या गावात नारू आढळला, तेथे सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्यात आले आणि रुग्णांना त्वरित उपचार देण्यात आले. उघड्या पायऱ्यांच्या विहिरी व तलाव बंदिस्त करण्यात आले. कूपनलिकेचे पाणी पिण्यासाठी वापरल्याने सायक्लॉपचा शरीरातील प्रवेश थांबला. १९९० मध्ये नारू निर्मूलन झाल्याचे लक्ष्यात आल्यानंतर १० वर्षे ‘नारूचा रोगी कळवा’ अशी मोहीम राबवण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेने २००० मध्ये भारतास नारू उच्चाटन झाल्याचे प्रमाणपत्र दिले.

१९८६ पर्यंत दरवर्षी सुमारे ४८ दशलक्ष व्यक्तींमध्ये नारूचा आजार होत असल्याच्या नोंदी आहेत. परंतु १९८६ मध्ये पिण्याच्या पाण्यातून पसरणाऱ्या नारूचे उच्चाटन करण्यासाठी अंगोला, सेंट्रल आफ्रिका रिपब्लिक, साऊथ सुदान आणि माली हे देश एकत्र आले. भारत, पाकिस्तान, बांगला देश, म्यानमार येथे तोपर्यंत नारूमुळे होणारे आजार कमी झाले होते. तलावांमध्ये उतरण्यास बंदी, पायऱ्यांच्या विहिरी बंदिस्त करणे यामुळे मानवी शरीरातून नारूच्या अळ्या पाण्यात प्रवेश करण्याची साखळी खंडित झाली होते. याचा परिणाम २०२३ मध्ये जगभरात नारूच्या अवघ्या १४ रुग्णांची नोंद झाली होती. देवीच्या आजारानंतर नारू आजाराचे उच्चाटन झाले.

पशुवैद्यक : ड्रॅकन्क्युलस मेदिनेन्सिस  या परजीवीचा संसर्ग कुत्रा, मांजर आणि बबून यांच्यामध्येही होतो. पाळीव जनावरांच्या आजारांवर लस बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत. ड्रॅकन्क्युलसच्या काही प्रजाती सरीसृप आणि अमेरिकेतील सस्तन प्राण्यांमध्ये परजीवी असल्याचे आढळले आहे.

नारू झाल्यानंतर प्राण्यांमध्ये त्वचाव्रण (Skin ulcer), अधस्त्वचीय गाठ (Subcutaneous nodule) अशी लक्षणे दिसून येतात. सूत्रकृमी काठीला गुंडाळून काढला जातो आणि पशुवैद्यकीय सल्ल्याने औषधे दिली जातात.

पहा : राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, राष्ट्रीय अधिहर्षता आणि संसर्गजन्य रोग संस्था.

संदर्भ : 1. https://en.wikipedia.org/wiki/Dracunculiasis

  1. https://www.msdmanuals.com/home/infections/parasitic-infections-roundworms-nematodes/dracunculiasis#Transmission_
  2. https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/dracunculiasis-(guinea-worm-disease)

 

समीक्षक : मोहन मद्वाण्णा

 


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.