सामान्यतः चर्चच्या परिसरात एका उंच मनोऱ्यावर घंटा बसविलेली असते. या मनोऱ्याला ‘घंटाघर’ (बेल टॉवर; Bell tower) म्हणतात. त्यास ‘कँपनीली’ ही इटालियन संज्ञा असून, ती ‘Campana’ (घंटा) या मूळ शब्दावरून आली आहे. सु. सहाव्या शतकापासून चर्चच्या परिसरात अशी घंटाघरे बांधण्यात आली. अकराव्या शतकापर्यंत बहुतांश चर्चमध्ये घंटाघर असणे नित्याचे झाले.

घंटाघराच्या मनोऱ्याचे पाया, मधला भाग, घंटाकक्ष (Belfry) आणि छत असे चार ढोबळ भाग असतात. साधारणपणे घंटाघर चर्चलगत थोड्या अंतरावर असून पडवीवजा मार्गाने चर्चला जोडलेली असत. विविध शैलीत घंटाघरांची संरचना केलेली आढळते. सुरुवातीची घंटाघरे ही साधी, वर्तुळाकार मनोऱ्यांच्या स्वरूपांची होती (साधारणत: ६व्या ते १० व्या शतकापर्यंत). मनोऱ्याच्या छतालगत लहान, वर्तुळाकार, उघड्या कमानी असत. मनोऱ्याच्या छतावरील अर्धवर्तुळाकार कमानींना तोलून धरणाऱ्या दंड गोलाकार खांब असलेल्या जागेत प्रत्यक्ष घंटा टांगलेली असे (घंटाकक्ष). सुरुवातीचे मनोरे कलाकुसरविहीन असत. मात्र नंतरच्या काळात त्यांचे रूप अधिकाधिक विकसित होत गेले.

अकराव्या शतकापर्यंत घंटाघराच्या मनोऱ्याचा पाया वर्तुळाकार असे आणि त्यानंतरच्या काळात तो चौरस झाला. अशा चौरसाकृती घंटाघरांमध्ये भित्त‍िस्तंभ (प्रक्षेपित केलेल्या उभ्या भिंत पट्ट्या; लेसेन; lesenes) आणि मनोऱ्याला अनेक टप्प्यांमध्ये विभागणाऱ्या अर्धवर्तुळाकार-कमान रांगांनी सजावट केली जात असे. ही संरचना इटालियन वास्तुकलेच्या रोमनेस्क काळाचे वैशिष्ट्य होय. मध्ययुगीन काळात घंटाघराच्या मनोऱ्यावरील छत पिरॅमिडच्या आकाराचे होते. चौदाव्या शतकात मनोऱ्याची उंची अधिक वाढविण्यात आली आणि घंटाकक्ष असलेला टप्पा मनोऱ्यातील इतर टप्प्यांपेक्षा दुप्पट उंचीचा बांधला जाऊ लागला.

रोमनेस्क काळात घंटाघराच्या छतासाठी घुमटासारख्या इतर आकारांना प्राधान्य दिले जाऊ लागले, त्यामुळे पिरॅमिडच्या आकाराचे छत कालबाह्य ठरत गेले. पुढे इटलीमध्ये रोमनेस्क शैलीचे पुनरुज्जीवन झाले, तेव्हा उत्तर यूरोपातील गॉथिक शैलीत न बांधलेल्या,परंतु इतर विविध  शैलीतील महत्त्वाच्या संकल्पनांचा अंगीकार करून बांधलेल्या इतर चर्चेला अशी घंटाघरे असलेली चर्चेस सार्थ पर्याय ठरली.

विसाव्या शतकातील इमारत बांधकामात काँक्रिटसारख्या नवीन घटकांमुळे उंच, विलग असे मनोरे बांधणे सहज साध्य झाल्याने पुन्हा एकवार घंटाघरे चर्चच्या बाजूला बांधली जाऊ लागली.

उत्तर इटलीमध्ये घंटाघरे स्मारक म्हणूनही बांधली जात. सम्राटाच्या सत्तेचे प्रतीक म्हणून ती असत. त्याचप्रमाणे टेहळणी करण्यासाठीही त्यांचा उपयोग केला जात असे. एकोणिसाव्या शतकात पुनरुज्जीवित घंटाघरे ही केवळ रूढ अर्थाची घंटाघरे न राहता, त्यांची उपयोजना कारखाने, घरे, उंच इमारत संकुले आणि शैक्षणिक संस्था यांच्या उभारणीतसुद्धा केली जाऊ लागली. किंबहुना कित्येकदा घड्याळासाठी या घंटाघरांचा उपयोग न करता, केवळ एक कलात्मक इमारत म्हणूनही असे मनोरे बांधले गेले. या घंटाघरांवर बरेचदा घड्याळ लावलेले असते. लोकांना प्रार्थनेच्या वेळा कळण्यासाठी, लग्न किंवा दफनविधीच्या वेळीसुद्धा घंटांना टोले देण्याची प्रथा काही ठिकाणी आढळते. नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षा  मिळावी  यासाठी प्रार्थना करण्यासाठी  काही चर्चमधील घंटाघरात विशेष कक्ष किंवा खोली असते. (Exconjuratory)

कार्यरत नसलेली घंटाघरे वास्तुकलेचा उत्तम नमूना म्हणून संवर्धित केली जातात. परंतु जेथील घंटाघरात घंटेचे टोले देण्याची पद्धत आहे, तेथे मात्र घंटाघरे कसोशीने संवर्धित केली जातात. पीसा येथील कलता मनोरा (११७३ – १३७२) हे घंटाघराचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. व्हेनिस येथील बाराव्या शतकातील सेंट मार्कचे घंटाघर सौंदर्यदृष्ट्या विशेष प्रसिद्ध आहे. साधारणत: ९९ मी. उंचीची आणि चौरस पायाची ही इमारत मुळात दीपगृह म्हणून बांधली गेली. सोळाव्या शतकात या मनोऱ्याला सध्याचे रूप दिले गेले. त्यावर घंटेसाठी कक्ष उभारला गेला. उतरत्या छतावर तांब्याचे पत्रे लावले गेले आणि अगदी वर फिरणाऱ्या तबकडीवर गॅब्रिएल या देवदूताचा पुतळा उभारला गेला. हा पुतळा पवनदर्शक अर्थात वातकुक्कुटाचे काम करतो. इ.स. १६०९मध्ये गॅलिलिओने या मनोऱ्यावरून आकाशमंडळाचे आणि तारकांचे निरीक्षण केले होते. एका अर्थाने वेधशाळा म्हणूनही या मनोऱ्याचा वापर झाला. वारंवार झालेल्या भूकंपात आणि नंतर वीज पडल्यामुळे ढासळलेल्या सेंट मार्कच्या घंटाघराची  पुनर्बांधणी करण्यात आली. मुळात सु. तीन टन वजनाच्या घंटेला वर घंटाकक्षात घेऊन जाण्यासाठी स्वयंचलित पाळण्याची योजना केली गेली आणि नंतर १९६२ मध्ये ही यंत्रणा कायम स्वरूपी करण्यात आली. इंग्लंडमध्ये एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांत चर्चवास्तूंमध्ये उत्तुंग घंटाघरे बांधण्यात आली.

घंटाकक्ष : (Belfry; बेलफ्री). घंटेच्या आवाजाचे वर्धन व्हावे, अशी घंटाकक्षाची रचना केलेली असते. घंटेचा नाद दूरवर ऐकू येण्यासाठी अशी रचना आवश्यक ठरते. बरेचदा इंग्रजी संज्ञा बेलफ्री, घंटा मनोऱ्यासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो, परंतु प्रत्यक्ष जेथे घंटा टांगलेली असते, तो कक्ष किंवा घंटेचे टोले देणाऱ्या कामगाराची राहण्याची जागा, म्हणजे खरा घंटाकक्ष होय.

इंग्रजी भाषेतील बेलफ्रीज आणि बेल या शब्दांचा काहीही संबंध नाही. परंतु जुन्या फ्रेंच बर्फ्रेई या शब्दापासून किंवा मध्ययुगीन काळात तटबंदीला वेढा घालण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडी बरुजासाठी वापरल्या जाणाऱ्या तत्सम शब्दापासून बेलफ्री ही इंग्रजी संज्ञा तयार करण्यात आली आणि त्याचा घंटेशी संबंध जोडण्यात आला.

घंटाकक्षात असलेल्या वातायनी खिडक्यांमुळे खराब वातावरणात सुद्धा घंटानाट स्पष्टपणे ऐकू यावा, अशी संरचना करण्यात येते. जेव्हा घंटाकक्ष नसत, तेव्हा घंटेला घंटा टांगण्यासाठी किंवा बुरुजावर लटकविण्यासाठी चौकटी तयार करण्यात येत असत. साधारणत: या चौकटी छताशी भक्कमपणे जोडलेल्या असायच्या किंवा भिंतीला कंस स्वरूपात आधारलेल्या असायच्या.

संदर्भ :

समीक्षक : श्रृती बर्वे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.