अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेच्या व्यापार वसाहती भरभराटीस आल्या, तेव्हा त्यांना एकसमान विनिमय माध्यम असावे याची जाणीव झाली. विनिमय माध्यम म्हणून चलन उदयास आले आणि चलनाच्या गरजेतून अमेरिकन बँकिंगचा उदय झाला. अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशात वित्तीय सेवा आणि सर्व प्रकारच्या बँकांची स्थापना अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात झालेली दिसून येते. सुरुवातीच्या काळापासून खाजगी बँकांची निर्मिती ही संपत्तीचे व्यवस्थापन आणि खात्यांची सुरक्षितता या तत्त्वांवर स्थापना केली गेली. इ. स. १८६३ मध्ये अमेरिकन काँग्रेसने राष्ट्रीय चलन कायदा पास केला. याच काळात अमेरिकन क्रांतिकारी लढाया झाल्या. त्यांना पैसा पुरविण्यासाठी पेनसिल्व्हेनिया येथे इ. स. १८६४ मध्ये ‘बँक ऑफ वेस्ट ग्रीन व्हॅली’ या बँकेची स्थापना झाली. अमेरिकेतील राष्ट्रीयकृत बँका सरकारकडून कर्जरोखे विकत घेत आणि भांडवल गरज भागविण्यासाठी कर्जरोखे वित्तीय नियंत्रकाकडे जमा करून रोकड प्राप्त करीत. यातूनच चलनाचा उदय झाला. बँका सदर भांडवल परतफेड करायला असमर्थ ठरल्यास सरकारकडून कर्जरोखे विकले जाऊन बँकांना मदत केली जायची. याच दशकात गुंतवणूक बँकांची स्थापना झाली. सरकारी कर्जरोखे आणि बाँड विक्रीचे प्रमुख कार्य यांनी स्वीकारले. इ. स. १९१४ मध्ये फेडरल रिझर्व्ह चलन अस्तित्वात आले. इ. स. १९३० च्या जागतिक महामंदीनंतर काँग्रेसने फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स ॲक्ट पास केला. त्यामुळे प्रत्येक खातेदारास अडीच लाख डॉलर्सपर्यंत सुरक्षितता प्राप्त झाली. आज बँका नवीन तंत्रज्ञान व नवनवीन विद्युतीय (इलेक्ट्रॉनिक) स्रोत वापरून नफा वाढवत आहेत. उदा. डेबिट कार्ड , क्रेडिट कार्ड, एटीएम मशिन, युपीआय इत्यादी.
अमेरिकन अर्थव्यवस्थेत २०२४-२५ मध्ये सुमारे ४,५८७ अमेरिकन बँका कार्यरत असून २५९.४ अब्ज डॉलर्स एवढा नफा या बँकांनी अमेरिकन अर्थव्यवस्थेत नोंदविला आहे. यामध्ये जेपी मॉर्गन बँक, बँक ऑफ अमेरिका, सिटी गृप, गोल्डमन सॅक इत्यादी प्रमुख बँका कार्यरत आहेत. अमेरिकन बँकिंगवर ‘फेडरल पद्धतीचे’ आणि ‘स्टेट बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट’चे नियंत्रण आहे. फेडरल रिझर्व्ह पद्धती आणि फेडरल रिझर्व्ह बँक ही अमेरिकन बँकिंगची मध्यवर्ती बँक प्रस्थापित झाली. अमेरिकेचा मोठा विस्तार पाहता फिलाडेल्फिया, अटलांटा, रिचमंड, शिकागो, बोस्टन, न्यूयॉर्क, सेंट लुईस, कँसस सिटी, डलास, क्लीव्हलँड, सॅन फ्रान्सिस्को आणि ओहायओ या १२ ठिकाणी फेडरल बँका प्रस्थापित झाल्या. ज्यांना ‘फेड बँका’ असेही म्हटले जाते. इ. स. १९१३ च्या फेडरल रिझर्व्ह ॲक्टनुसार अमेरिकन बँकांना सुरक्षितता, लवचिक चलन पद्धती, रोजगारनिर्मिती, किंमत स्थैर्य आणि समतोल व्याजदर अशा उद्दिष्टांसाठी सदर बँकांची स्थापना झाली आहे. आधुनिक काळात बँकिंग क्षेत्रावर संपूर्णपणे पर्यवेक्षण व नियंत्रण, ठेवीसाठी वित्तपुरवठा, हुंड्यांची पुनर्वटवणूक, सरकारसाठी विमा आणि इतर परकीय संस्थांना वित्तपुरवठा करणे यांसाठी सदर बँकां कार्य करीत आहेत.
फेडरल रिझर्व्ह बँक ही व्यापारी बँकांप्रमाणे नफा कमविते. फेड बँका व खाजगी बँका या क्रेडिट युनियन माध्यमांतून बँकिंग व्यवहार करताना दिसतात. क्रेडिट युनियन या बँका को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीप्रमाणे स्वतःच्या सभासदांना बँकिंग सेवा पुरवितात आणि सभासदांमध्ये नफ्याचे वाटप करतात. यामुळे बँकिंग सेवा कमी खर्चात देणे, तसेच व्याजदर कमी पातळीवर ठेवणे यांमध्ये यशस्वी होतात.
जागतिक पातळीवर सर्व वित्तीय संस्था विविध पद्धतीने आणि गुंतागुंतीच्या व्युहरचनेतून नफा कमवितात. यामध्ये व्याजदर उत्पन्न आणि बिगर व्याजदर उत्पन्न असे दोन प्रमुख स्रोत आहेत. पारंपरिक पद्धतीने लोकांकडून ठेवी स्वीकारणे आणि जास्त व्याजदराने कर्ज देणे हा व्याजदर उत्पन्नाचा स्रोत आहे; तर आधुनिक पद्धतीने बँकांची रीटेल प्रोडक्ट विकणे किंवा सेवा उपलब्ध करणे, भागांची खरेदी विक्री, ग्राहकांच्या संपत्तीचे व्यवस्थापन, डेबिट आणि क्रेडिट कार्डवरील शुल्क, जागतिक बाजारपेठेत वित्तीय सेवा उपलब्ध करून देणे, मोठ्या प्रमाणावरील सेवा उपलब्ध करणे, तंत्रज्ञानामुळे सेवांचा खर्च कमी करणे इत्यादी बिगर व्याजदर उत्पन्न स्रोत आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा सुमारे ४० टक्के वाटा अमेरिकन बँकांच्या बिगर व्याजदर या स्रोतातून निर्माण होत आहे. अमेरिकन बँकिंग उद्योगातील मालमत्ता वाढीचा दर २.१० टक्के आहे (२०२५).
बिगर व्याजदर उत्पन्न बँकांच्या आधुनिक गुणवत्ता सेवा, ग्राहक व बँकेचे वित्तीय नाते, तांत्रिक वृद्धी, कॅशलेस व्यवहार, म्युच्युअल फंड, निर्हस्तक्षेप धोरण इत्यादी बाबींवर अवलंबून असते. तसेच बँकविस्तार सुलभ नीती, क्रेडिट स्कोर व सिक्युरटायझेशन, कर्जरोख्यांचे वरचे अंडररायटिंग कार्य, विमा विक्री, महाजालकाद्वारे वेगाने सहयोजन, सरकारचे मोठे उत्पन्न देणारे बाँड व पतपत्रे यांचा सुलभ पुरवठा आणि हस्तांतरण इत्यादी बँकांमार्फत करण्यात येते.
आधुनिक काळात सिक्युरटायझेशनमुळे बँकांना उत्पन्नाचा नवीन स्रोत मिळाला आहे. सिक्युरटायझेशन म्हणजे बँका आपला लोन पोर्टफोलिओ किंवा कर्ज स्वरूपातील येणी दुसऱ्या कंपन्यांना किंवा भांडवल बाजारात सेकंडरी मार्केटमध्ये विकतात आणि स्वतःची रोकड वाढवून ग्राहकांना पुन:पुन्हा कर्ज देऊन नफ्याचे प्रमाण वाढवितात. बँकांची कर्जे कॉलेटरल सिक्युरिटीने सुरक्षित असल्यामुळे त्या सहज सिक्युरटायझेशनमध्ये रूपांतरीत होऊ शकतात. वित्तीय संज्ञेत अशा संस्थांचा समावेश स्पेशल पर्पज व्हेईकल किंवा कॉर्पोरेशन केला गेला आहे. अशा संस्थासुद्धा मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत कार्यरत आहेत.
संदर्भ : Rothbard, Murray, A History of Money and Banking in the United States, Auburn, Alabama, 2002.
समीक्षक : संतोष दास्ताने
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.