
संवेदनाहरण ही शरीराची अशी अवस्था आहे की, ज्यामध्ये तात्पुरती संवेदना किंवा वेदना जाणीव होत नाही. हे वैद्यकीय किंवा पशुवैद्यकीय उपचारासाठी आवश्यक असते. या अवस्थेत वेदना मुक्ती , स्नायू शिथिल असणे आणि थोड्या वेळासाठी स्मृती जाणे, बेशुद्धपणा या कारणांचा एकत्रित परिणाम असू शकतो.
रुग्णास वेदना होऊ नयेत अशा पद्धतीने उपचार करण्यासाठी संवेदनाहारकांचा वापर करण्यात येतो. संवेदनाहारकांचा वापर होण्यापूर्वी रूग्णाला इतर व्यक्तींच्या साहाय्याने बांधून ठेवून किंवा त्याचे हात पाय बांधून शस्त्रक्रिया, जखमा शिवणे यासारखे उपाय करावे लागत असत. बधिरीकरण न केलेल्या रुग्णाचा विचार करता हे अयोग्य होते.
संवेदनाहारकशास्त्र यास बधिरीकारण विज्ञान किंवा प्रचलित सामान्य भाषेत भूलविज्ञान असेही म्हणतात.

वर्गीकरण : प्रामुख्याने संवेदनाहरणाचे तीन प्रकार करण्यात येतात :
(अ) सार्वदेहिक संवेदनाहीनता : (Regional anaesthesia). मध्यवर्ती चेतासंस्थेचे कार्य संवेदना आणि वेदना यांना प्रतिसाद देणे हे असते. परंतु सार्वदेहिक संवेदनाहीनतेमध्ये संवेदना जाणवत नाहीत. तात्पुरती शुद्ध हरपण्यामुळे हा परिणाम होतो. यासाठी श्वासमार्गातून योग्य त्या औषधाची वाफ दिली जाते किंवा योग्य ते औषध शिरेतून दिले जाते.
(ब) गाढ झोप : (Sedation). सामान्य झोपेमध्ये जसे बाह्य संवेद क्षीण होतात त्यापुढील अवस्थेस मराठीमध्ये सुषुप्ती असे नाव आहे. हा शब्द संस्कृतमधून आलेला आहे. याचा अर्थ स्वप्नावस्था आणि जागृतावस्थेच्या पुढील अवस्था असा होय. या अवस्थेत मध्यवर्ती चेतासंस्था पूर्णपणे दडपली जात नाही. बेशुद्धी न येता ताणरहित अवस्थेमध्ये व्यक्ती राहते. दीर्घकालीन स्मृतीवर या अवस्थेत परिणाम होत नाही. परंतु अल्पकालीन स्मृतीची आठवण गाढ झोपेत राहात नाही.
(क) क्षेत्रीय आणि स्थानिक संवेदनाहीनता : (Regional and local anaesthesia). शरीराच्या विशिष्ट भागाकडून नेले जाणारे संवेद चेतासंस्थेकडे जाऊ न देणे हे क्षेत्रीय संवेदनाहारकांचे कार्य आहे. आवश्यकतेनुसार सार्वदेहिक संवेदनाहारकासमवेत अथवा स्वतंत्र याचा वापर करता येतो. या प्रकारच्या संवेदनाहरकामुळे रुग्ण पूर्णपणे शुद्धीवर असतो.
स्थानिक संवेदनाहारके डॉक्टर थेट जेवढा भाग बधिर करायचा तेथे स्प्रे किंवा लहानशा अंत:क्षेपणामधून देतो. उदा., दातातील कीड स्वच्छ करणे किंवा दात काढणे.
परिघीय चेता अवरोध ( Peripheral nerve block ) साधण्यासाठी योग्य औषध शरीराचा एखादा भाग बधिर होतो. उदा., अपघातग्रस्त हात किंवा पाय, पायाची बोटे किंवा पूर्ण अवयव.
पाठीच्या कण्याजवळील भूल : चेता-अक्षीय अवरोध (Neuraxial blockade) याचा अर्थ मज्जारज्जूजवळील विशिष्ट भागात योग्य ते बधिरीकरण औषध देऊन त्याच्या खालील भागाकडून मेंदूकडे येणाऱ्या संवेदना अवरोधित करण्याचा प्रकार होय. ही औषधे बहुधा मज्जारज्जू आवरणाखाली किंवा मस्तिष्क मेरुद्रवात दिली जातात.
संवेदनाहारके किंवा बधिरीकरण योग्य आणि किती वेळासाठी आवश्यक आहे, यानुसार अनेक औषधी रसायने वापरात आहेत. यात सार्वदेहिक, स्थानिक, निद्रापक (Hypnotic), विदलनीय (Dissociative), वेदनाशामक (Sedatives), संलग्न (Adjuncts), चेता आणि स्नायू यापासून येणारे संवेद अवरोधी (Neuromuscular blocking), अमली (Narcotics) आणि वेदनाशामक (Analgesic) औषधी रसायनांचा समावेश होतो.
संवेदनाहारकांचा प्रभाव : संवेदनाहारकांच्या वापराने होणारी गुंतागुंत यांचा परिणाम मिश्र आहे. ज्या कारणासाठी उपयोग करायचा याचे परिणाम रुग्णाचे वय, त्याची आरोग्य स्थिती आणि कोणत्या संवेदनाहारकाचा वापर केला आहे यावर अवलंबून असते. यातील प्रमुख रुग्णाची ताण सहन करण्याची क्षमता अधिक महत्त्वाची ठरते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर जर रुग्ण गंभीर झाला तर मृत्यू, ह्रदय बंद पडणे आणि फुफ्फुसामध्ये रक्ताची गुठळी अशी गुंतागुंत ओढवते. सौम्य परिणामामध्ये मळमळ आणि उलटी झाल्याची भावना किंवा रुग्णालयात पुन्हा दाखल करावे लागणे यांचा समावेश होतो. स्थानिक संवेदनाहारकाचा परिणाम श्वास घेण्यास अडथळा किंवा अचानक तीव्र ताप येण्यात होतो.
वैद्यकीय परिणाम : संवेदनाहारके तीन कारणांसाठी वापरली जातात : (१) निद्रा स्थिती येण्यासाठी (Hypnosis), (२) जाणीव कमी होण्यासाठी (Loss of consciousness), वेदना कमी होण्यासाठी. वेदना शमन ही स्वायत्त प्रतिक्षेपी क्रिया आहे. (३) स्नायू शिथिल राहावेत म्हणून.
प्रत्येक संवेदनाहारकाचा अंतिम परिणाम वेगळ्या प्रकारचा होतो. उदा., स्थानिक संवेदनाहारकाचा परिणाम वेदनाशामक असतो. बेंझोडायझेपाइन (Benzodiazepine) प्रकारातील रसायने थोड्या प्रमाणात स्मृतिनाशकारक (Amnesia) आहेत, तर सार्वदेहिक संवेदनाहारके वरील तीनही परिणाम घडवतात. शस्त्रक्रियेमध्ये इच्छित अंतिम परिणाम याबरोबर रुग्णावर कमीत कमी दुष्परिणाम होतील या प्रमाणात देणे हे संवेदनाहरकाचे उद्दिष्ट असते.
संवेदनाहारकाचे अंतिम उद्दिष्ट गाठण्यासाठी दिली जाणारी रसायने /औषधे मेंदूतील विविध पण परस्परांशी संलग्न भागांवर परिणाम करतात. उदा., संमोहन (Hypnosis) हा मेंदूतील विशिष्ट केंद्रावरील परिणाम असतो. याचे स्वरूप गाढ झोपेप्रमाणे असते.
संवेदनाहारकांच्या प्रभावामुळे स्मृतिऱ्हास होतो. मेंदूतील विशिष्ट भागावर परिणाम झाल्याने असे होत असावे. स्मृती हे मेंदूचे एक महत्त्वाचे कार्य आहे. स्मृती दोन प्रकारची असते : सांगता येण्याजोगी आणि न सांगता येण्यासारखी (Declarative and non-declarative). सांगता येण्यासारखी स्मृति आठवणीच्या स्वरूपात असते. उदा., तुमचे शिक्षण, मित्र, आई-वडील, शिक्षक, आवडता विषय, शाळा, अडचणीत आणणारे प्रसंग वगैरे. सांगता न येण्यासारखी स्मृती तुमच्या कौशल्याच्या स्वरूपात असते. तुमचे चित्रे काढणे, सायकल किंवा गाडी चालवणे, गाणे म्हणणे हे शब्दात वर्णन करता येत नाही. स्मृती ही अल्पकालीन स्मृती, दीर्घकालीन स्मृती आणि आयुष्यभर राहणारी स्मृती अशा तीन प्रकारची असते. मेंदूतील चेतापेशी (Neurons) किती चेतापेशींच्या संपर्कात आहेत त्यावरून स्मृती विकसित होते. चेतापेशी संपर्क दुसऱ्या चेतापेशी संपर्कस्थानाद्वारे (Synapse) होतो. संपर्कस्थान लवचिकता (Synaptic plasticity) हे चेतासंस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. संवेदनाहारके किती प्रमाणात दिली आहेत यावर स्मृतिनाश अवलंबून असतो. श्वासावाटे दिलेल्या संवेदनाहारकामुळे तात्पुरती शुद्ध हरपते. मिडाझोलामसारख्या संवेदनाहारकामुळे दीर्घकालीन स्मृतिनाश झाल्याचे आढळले आहे.
संवेदनाहारकाच्या प्रभावात असताना व्यक्ती स्वप्न पाहू शकते. तसेच आपल्याला भूल दिली आहे. शस्त्रक्रिया चालू आहे. सर्जन आपल्याशी बोलत आहे याचा अर्थ आपण जागे आहोत. एका पाहणीनुसार २२% रुग्णांना भूल दिलेली असता स्वप्ने पडतात. हजारातील एक किंवा दोन व्यक्ती थोड्याफार प्रमाणात जाग्या असतात. याला संवेदनाहारक स्थिती जाणीव किंवा भूल जागृतावस्था (Anaesthesia awareness) म्हणतात .
संवेदनाहरण तंत्र : संवेदनाहरण हा प्रत्यक्ष उपचारांचा भाग नाही. उपचार करण्याऱ्या व्यक्तीस या तंत्राच्या मदतीने उपचार करणे, निदान आणि रुग्ण बरे करण्यासाठी मदत होते. रुग्णाला वेदना होत असताना उपचार करण्यात गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असते. सर्वांत उत्तम भूलतज्ञ रुग्णास कमीत कमी धोका पोहोचेल आणि अंतिम साध्य आवश्यक उपचार करण्यासाठी मदत करेल असा प्रयत्न करतो. भूल देण्यातील पहिली पायरी शस्त्रक्रिया पूर्व तपासणी होय. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, प्रत्यक्ष रुग्ण तपासणी आणि प्रयोगशाळेतील चाचण्या यावरून रुग्ण शस्त्रक्रिया सहन करू शकेल याची खात्री केली जाते. यातून भूलतज्ञ रूग्णावर भूल रसायनांचा कमीत कमी परिणाम होईल याचा अंदाज करतो. रुग्णाच्या पूर्ण वैद्यकीय माहितीवरून अचूक निदान होण्याचा वाटा ५६ %, रुग्ण प्रत्यक्ष तपासण्याने निदान अचूक होणे ७३ % आणि प्रयोगशाळेतील तपासण्याचा वाटा अवघा ३ % असतो. घाईघाईने केलेल्या शस्त्रक्रिया-पूर्व रुग्ण पाहणीनंतर झालेल्या शस्त्रक्रियेमध्ये गुंतागुत होण्याची शक्यता ११ % असते.
भूलतंत्रातील सुरक्षितता प्रशिक्षित वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञ यांच्यावर अवलंबून असते. भूलशास्त्र (Anaesthesiology) वैद्यकीय क्षेत्रातील प्रगत विज्ञान बनले आहे. या विज्ञानातील डॉक्टर भूलतज्ञ (Anaesthesiologist) या नावाने ओळखला जातो. या भूल देण्याच्या कामासाठी अतिरिक्त प्रशिक्षित व्यक्ती आवश्यक असतात. उदा., भूल प्रशिक्षित परिचारिका, भूल सहायक, भूल तंत्रज्ञ, शल्य विभाग तंत्रज्ञ वगैरे. जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक भूलतज्ञ संघाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार फक्त भूलतज्ञ डॉक्टरच्या सल्ल्यानुसार भूल दिली जाते आणि शस्त्रक्रिया कराव्या लागतात. किरकोळ उपचार स्थानिक भूल देऊन रुग्णालयात करता येतात. उदा., दात काढणे किंवा त्वचा फाटल्यावर टाके घालणे वगैरे.
प्रशिक्षित जागृत भूल तज्ञ सतत रुग्णाची काळजी घेतो. तो भूल देणारा डॉक्टर असो वा नसो. ज्या ठिकाणी भूल देणारा डॉक्टर नसेल तेथे अनुभवी आणि भूल तज्ञ संघटना प्रशिक्षित प्रमाणपत्र असलेली व्यक्ती उपलब्ध केली जाते. अशी व्यक्ती रुग्णाचा रक्तदाब, श्वास, रक्तातील कार्बन डायऑक्साइड, श्वास मार्ग, हृदय ठोके यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवते.
रुग्णाचे वजन कमी किंवा अधिक, रुग्णाचे वय जसे अर्भक, लहान मुले, तरुण, वृद्ध याप्रमाणे भूल रसायनांचे प्रमाण कमी किंवा अधिक करावे लागते. रुग्ण तंबाखू, मद्यपान किंवा मादक द्रव्य सेवन करत असेल तर त्याची पूर्वकल्पना रुग्ण इतिहासातून मिळते. मातेवर शस्त्रक्रिया करताना माता आणि पोटातील बाळ या दोघांच्या सुखरूप असण्याची काळजी करावी लागते. किती वेळात शस्त्रक्रिया पूर्ण होणार याचा अंदाज भूल तज्ञास असणे आवश्यक असते. कारण रुग्ण शस्त्रक्रियेनंतर किती वेळाने शुद्धीवर येणार आणि लवकर कसा बरा होणार हे शल्यकर्मी आणि भूलतज्ञ यांच्या सहकार्यावर अवलंबून असते.
पहा : चेतासंस्था.
संदर्भ : 1. https://www.britannica.com/science/anesthesia
- https://en.wikipedia.org/wiki/Anesthesia
- https://www.who.int/teams/integrated-health-services/patient-safety/research/safe-surgery/tool-and-resources
समीक्षक : मद्वाण्णा, मोहन
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.