पामा-न्युंगन भाषासमूहातील भाषांचा एक उपसमूह. या भाषासमूहाचा प्रसार ऑस्ट्रेलियाच्या मध्य आणि उत्तर भागातील विशेषतः नॉर्दर्न टेरिटरी आणि साउथ ऑस्ट्रेलिया या राज्यामध्ये दिसून येतो. हा प्रदेश प्रामुख्याने वाळवंटी आणि अर्ध-वाळवंटी असून विरळ लोकवस्तीचा आहे. भाषिक तुलनात्मक अभ्यासावरून असे अनुमान काढता येते की, या भाषा इ.स.पू. ५,००० ते ३,००० च्या दरम्यान वेगळ्या झाल्या असाव्यात; मात्र लिखित पुराव्यांच्या अभावामुळे त्यांच्या प्राचीन इतिहासाचा अचूक मागोवा घेणे कठीण आहे. अरंडिक भाषासमूहातील भाषांच्या विभाजनासंदर्भात भाषाशास्त्रज्ञांमध्ये तसेच अरंडा लोकांमध्येही विविध मते आढळतात. या भाषासमूहातील भाषांच्या वर्गीकरणासंदर्भात अभ्यासकांमध्ये एकवाक्यता दिसत नाही. एच. कॉक यांनी अप्पर अरंडिक (Upper Arandic) आणि कायतेत्ये या केवळ दोनच बोलीभाषा वेगळ्या केल्या आहेत. ग्लॉटोलॉगमध्ये अरंडिक समूह हा पाच ‘अरंडा/अरेरंटे’ बोलीभाषांचा समुच्चय मानला असून त्यात कायतेत्ये आणि लोअर सदर्न (lower southern) किंवा लोअर (lower) अरंडं/अरंडा या दोन स्वतंत्र भाषा दिल्या आहेत. यांपैकी अरंडं ही भाषा आता लुप्त झाली आहे. एथ्नोलॉगमध्ये अरंडिक या भाषासमूहात आठ स्वतंत्र भाषा गणल्या गेल्या असून त्यांची विभागणी काही प्रमाणात वेगळी आहे.
पूर्व अरंडा, पश्चिम अरंडा, कायतेत्ये, अल्यावर्र आणि अनमत्येरे भाषा या अरंडिक समूहातील प्रमुख भाषा आहेत. अरंडिक भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. एस.बी.एस या वृत्तसंस्थेच्या (SBS Australian Census Explorer) अहवालानुसार अरंडा या भाषेचे अंदाजे ३,००० भाषक, कायतेत्ये भाषेचे केवळ १००-२०० भाषक आणि अल्यावर्र या भाषेचे साधारण १,५०० ते २,००० भाषक आहेत. या भाषासमूहातील बहुतेक भाषा या गंभीर धोक्याच्या स्थितीत आहेत, हेच वरील आकडेवारीवरून दिसून येते.
अरंडिक भाषांच्या ऐतिहासिक विकासाचे तीन प्रमुख टप्पे ओळखता येतात. प्रारंभिक टप्पा हा पामा-न्युंगन भाषापरिवारातून वेगळे होणे आणि स्वतंत्र भाषिक ओळख निर्माण होणे; दुसऱ्या टप्प्यावर यूरोपीय भाषांच्या संपर्कामुळे इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढलेला दिसतो. याच कालावधीत भाषांची लोप प्रक्रिया सुरू झाल्याचे आढळते. तिसऱ्या म्हणजेच समकालीन काळात भाषिक पुनरुज्जीवनाचे प्रयत्न होताना दिसतात. त्याचप्रमाणे शैक्षणिक उपक्रमांद्वारे भाषिक संवर्धनाचे प्रयत्नही होताना दिसतात.
अरंडिक भाषांच्या लिखित परंपरेचा विकास अलीकडच्या काळात झाला आहे. पारंपरिक साहित्यामध्ये मौखिक साहित्य, गाणी आणि पौराणिक कथा यांचा समावेश होतो. आधुनिक लिखित साहित्यामध्ये बायबलचे भाषांतर, शैक्षणिक साहित्य आणि व्याकरण कोश यांचा समावेश होतो. या भाषांकरिता लॅटिन लिपीवर आधारित लेखनपद्धती अलीकडेच विकसित केल्या गेल्या आहेत.
अरंडा भाषेच्या पूर्व, पश्चिम व मध्य बोलींमध्ये ध्वन्यात्मक आणि शब्दसंग्रहात्मक वैविध्य आढळते. कायतेत्ये भाषेमध्ये उच्चारण, क्रियापद रूपांतर इ. स्तरावर प्रादेशिक वैविध्य दिसून येते. ध्वनिस्तरावर अरंडिक भाषांमध्ये स्वर आणि व्यंजनांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी दिसून येते. या भाषा प्रामुख्याने प्रत्ययप्रधान असून यांमध्ये क्रियापद रूपविकारी प्रणाली आढळते. अरंडिकमध्ये सर्व शब्द स्वराने सुरू होतात. कर्ता-कर्म-क्रियापद ही या भाषांमधील मूलभूत वाक्यरचना आहे. सर्वनाम व्यवस्थेमध्ये या भाषांमध्ये समावेशक/असमावेशक असा स्पष्ट भेद आढळून येतो. या भाषांमध्ये पर्यावरणाशी निगडित शब्दसंपत्ती विपुल प्रमाणात आढळते. अरंडिक भाषकांची झपाट्याने घटणारी संख्या लक्षात घेता त्यांच्या संरक्षणासाठी ठोस शैक्षणिक व समुदायाधारित उपक्रमांची गरज आहे.
संदर्भ :
- Green, Jenny, A Learner’s Guide to Eastern and Central Arrernte, Alice Spring, Australia, 2005.
- Henderson, John and Dobson, Veronica, Eastern and Central Arrernte to English Dictionary Alice Spring, Australia, 1994.
- Koch, H., The Arandic subgroup of Australian languages, In Claire Bowern and Harold Koch (Ed.), Australian Languages: Classification and the Comparative Method, Amsterdam, 2004.
- https://glottolog.org/resource/languoid/id/aran1266.
समीक्षक : सोनल कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.