आचार्य बुद्धघोषांनी निर्धारित केलेला पाली त्रिपिटक साहित्यातील सुत्तपिटकाच्या खुद्दकनिकायातील (पाचव्या निकायातील) आठव्या क्रमांकाचा ग्रंथ. थेरगाथा भिक्खूंनी, तर थेरीगाथा या भिक्खुंणीनी रचलेल्या आहेत. थेरगाथा हे भिक्खूंचे स्वकथन असून सामान्य जीवन आणि प्रव्रज्या घेतल्यानंतर जीवनात घडून आलेले बदल यांचे वर्णन त्यांनी काव्यमय गाथांमध्ये केलेले आहे. थोडक्यात, हा ग्रंथ बुद्धकाळातील भिक्खूंच्या पद्यबद्ध जीवनाचे संस्करण आहे. तथागत बुद्धांच्या समकालीन भिक्खूंच्या जीवन परिचयाची बरीच माहिती या ग्रंथात मिळते. अरण्य, पर्वत तसेच लेण्यांमध्ये ध्यानसाधना करणाऱ्या अनेक स्थविरांचे वर्णन व चित्रण या ग्रंथात आहे. या ग्रंथामध्ये भिक्खूंचे आंतरिक जीवन आणि त्यांचे प्राकृतिक नैसर्गिक बोध अशा दोन प्रकारांचे वर्णन दिसून येते.

बुद्धांच्या प्रमुख थेरांनी (प्रव्रजित भिक्खूंनी) त्यांच्या जीवनातील अनुभव, साधना, निर्वाणाचा (तृष्णामुक्ती) मार्ग सांगणाऱ्या गाथा आणि अनेक नैसर्गिक वर्णने या ग्रंथात काव्यमय स्वरूपात आहेत. या गाथांमध्ये भिक्खूंच्या अनुभवांमध्ये निराशा नसून सुखाचा व आनंदाचा स्पर्श आहे. वर्णनांमध्ये अद्वितीय, सोपी आणि सूक्ष्म नैसर्गिक निरीक्षणे मिळतात.

जगातील सर्व संस्कार किंवा निर्माण झालेल्या वस्तू या अनित्य आहेत. या सत्याचा साक्षात्कार करूनच तथागत बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर थेरांनी मार्गक्रमण केले आहे. म्हणून चित्ताची विमुक्तीच थेरांचे सर्वांत मोठे सुख आहे. त्यांचे जीवन हे जगाप्रति अनुराग आणि आसक्तीप्रति विषाद या दोन्ही दृष्टिकोनापासून विमुक्त आहे. सुख आणि दुःख हे थेरांप्रति निरर्थक झाले आहेत. या स्वानुभावातून थेरांनी या गाथांची रचना केली, हे थेरगाथा ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

‘धम्मपदा’ प्रमाणे या ग्रंथातील गाथा ताल व सुरात गाता येऊ शकतात. या गाथांमध्ये लयबद्धता असल्याने थेरगाथेचे साहित्यशास्त्र व काव्यशास्त्राच्या दृष्टीने महत्त्व आहे. यामध्ये अर्हत भिक्खूंच्या जीवनाचे अनुभव व सफल जीवनाच्या प्राप्तीचे शब्द हे काव्यशैलीत शब्दबद्ध आहेत. बुद्धांकडून थेरांनी ज्ञान, शिक्षण, तत्त्वज्ञान इ. विषय ग्रहण करून आपल्या जीवनाचे ध्येय साध्य केले. या ग्रंथातील गाथांच्या अध्ययनांमधून मानवी जीवनाचे वास्तविक स्वरूप समजून घेता येते .

थेरगाथेतील भिक्खूंची  काही उदाने :

(१) अंधाऱ्या रात्री जळत असलेल्या अग्नीप्रमाणे, तथागतांच्या या प्रज्ञेला पाहा; ती आलोक तसेच ज्ञानदृष्टी देणारी आहे. आपल्या जवळ येणाऱ्यांच्या शंकांचे समाधान करणारी आहे – अर्हत भिक्खू कंखारेवत.

(२) जो दुःखाचा संचय करीत नाही, तो निर्वाणाच्या अगदी जवळ पोहोचतो- अर्हत रट्ठपाल.

(३) मी आम्रपाली व राजा बिंबिसार यांचा पुत्र होऊन जन्मलो. तथागताच्या श्रेष्ठ धम्माद्वारे मी अभिमानाचा त्याग केला – अर्हत विमल कोण्डञ्ञ

(४) पूर्वी मी आई आणि वडील दोन्हीकडून परिशुद्ध ब्राह्मण जातीचा होतो, पण आज मी सुगत धम्मराज शास्त्याचा पुत्र आहे – अर्हत अंगुलीमाल

थेरगाथा ग्रंथामध्ये २६४ थेरांचा समावेश असून यामध्ये प्रस्तावनेतील तीन गाथांसहित एकूण १,२७९ गाथा ह्या ३६ विभागांमध्ये विभाजित आहेत.

संदर्भ :

  • डॉ. विमलकीर्ति, थेरगाथा,  सम्यक प्रकाशन, नवी दिल्ली, २००५.
  • डॉ. विमलकीर्ति,पालि शब्दकोश, प्रगतीवादी प्रकाशन, नागपूर, २०२०.
  • भगत, एन.के. (संपादक),थेरगाथा, पाली विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई, २०१८.
  • भिक्खु डॉ. धर्मरत्न, गौतम, एस. एस., थेरगाथा, गौतम बुक सेंटर प्रकाशन, नवी दिल्ली, २०१३.
  • स्वामी द्वारिकादासशास्त्री, थेरगाथापालि -थेरीगाथापालि, बौद्धभारती प्रकाशन, वाराणसी, २०२०.

समीक्षक : सतीश पवार


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.