
इश्तार द्वाराच्या उभारणीसाठी वापरलेल्या विटा वस्त्रगाळ मातीच्या असून लाकडी साच्यातून काढलेल्या होत्या. प्राण्यांचे चित्रण करण्यासाठी पुन:पुन्हा वापरता येतील अशा साच्यातून विटा घडविल्या होत्या. प्राण्यांचे डोळे किंवा इतर महत्त्वाच्या भागावर विटांच्या जोडकामाची रेघ येणार नाही, अशाप्रकारे साच्यातून वैशिष्ट्यपूर्ण विटा घडविण्यात आल्या होत्या. उन्हात सुकविलेल्या विटा त्यावर तकाकी येण्याची प्रक्रिया करण्यापूर्वी भट्टीत भाजून काढल्या होत्या.
इश्तार द्वारावर बॅबिलोनियन संस्कृतीतील रक्षणकर्ता देव असलेला मार्डुक व त्याचा दास ड्रॅगन आणि वादळाचा स्वामी व इच्छित पर्जन्याचा देव असलेला अदाद किंवा इश्कुर व त्याचा सेवक आजच्या बैलाचा (आता नामशेष झालेला) पूर्वज ओरॉक्स या दोन प्रमुख देवतांचे अंकन होते. ड्रॅगनचे डोके व शेपूट सापाची, अंग खवले असलेल्या सिंहाचे आणि मागच्या पायाला बाकदार नख्या असे स्वरूप होते. या द्वारावर प्रजननाचे प्रतीक असलेल्या फुलांच्या नक्षीचे सुद्धा चित्रण होते. शहरात प्रवेश करणाऱ्या माणसांकडे बघणाऱ्या, त्यांच्या वाईट नजरांपासून रक्षण करणाऱ्या, साध्या विटात घडवलेली काही प्राण्यांची चित्रे होती. उत्थित चित्रांचे असे नऊ थर होते.
जर्मन पुरातत्त्वशास्त्रज्ञ रोबेर्ट कोल्डेव्हाइ यांचे बॅबिलोनिया प्रांताचे उत्खनन १८९९ — १९१७ पर्यंत सुरू होते. पहिल्या महायुद्धाच्या काळात उत्खनन थांबले (१९१४). परंतु या काळात पुरातत्त्ववेत्यांनी इश्तार द्वाराचे आणि बाजूच्या भिंतींचे जवळपास सर्व अवशेष शोधून काढले होते. उत्खननात शोधून काढलेले अवशेष सुरक्षित ठेवणे किंवा जर्मनीत पाठवणे त्या परिस्थितीत कठीण झाले. हे अवशेष पोर्तुगालमधील पोर्तो युनिव्हर्सिटीमध्ये पाठवले गेले. कोल्डेव्हाइच्या निधनानंतर (१९२५) पर्गमान संग्रहालयाच्या विभागाच्या संचालकांनी पोर्तो युनिव्हर्सिटीकडे पाठपुरावा करून हे अवशेष बर्लिनला आणले. सर्व विटा साफ करून क्रमवार लावण्याचे काम करण्यात आले. विटा क्रमवार लावताना, जिथे मधला योग्य तुकडा अजिबात मिळत नसेल, केवळ तो तुकडा नव्याने तयार करून भिंतीवरील सर्व शिल्पे आणि इतर भाग उभारण्यात आले. अंतिमत: १९३० मध्ये पर्गमान संग्रहलयात इश्तार द्वाराची प्रतिकृती स्थापित झाली.
पर्गमान संग्रहालयातील इश्तार द्वारावर निळ्या रंगाबरोबर सोनेरी आणि तपकिरी रंगांची योजना प्राण्यांच्या चित्रासाठी केली आहे. तर फुले व किनार यांसाठी काळा, पांढरा आणि सोनेरी रंग वापरलेला आहे. विटांना लकाकी देण्यासाठीच्या प्रक्रियेत वालुकाश्म, गारगोटीचे खडे आणि झाडांची राख वापरली आहे. हे मिश्रण उच्च तापमानाला वितळवून, थंड करून, त्याची वस्त्रगाळ पूड करून त्यात या विटा घोळवून प्रक्रिया करण्यात आली आहे. विविध रंग प्राप्त करण्यासाठी कोबाल्टसारखे घटक त्यात मिसळले आहे. रंगाचे लेपन विशिष्ट भागावर करून त्या विटा पुन्हा उच्च तापमानाला भाजल्या आहेत. या विटांमधील सांधे हे केवळ १ ते ६ मिमी. इतके बारीक असून हे सांधे डांबराने भरलेले आहेत.

तत्कालीन राजा दुसरा नेबुकॅड्नेझर (इ.स.पू. ६०५ ते ५६२) याने बॅबिलोनियन येथे इश्तार द्वाराचे बांधकाम करण्याचा आदेश दिला होता. या द्वाराच्या बांधकामाचा उद्देश दर्शविणारा शिलालेख अकेडियन क्यूनिफॉर्म लिपीत (अणकुचीदार खिळ्यांची लिपी; cuneiform script ) आहे. साठ ओळींचा शिलालेख १५ मी. उंच आणि १० मी. लांब एवढा भव्य आहे. शिलालेखानुसार द्वार आणि त्यावरील छत देवदार लाकडाचे होते आणि प्रत्यक्ष द्वारावर फक्त देवतांचे चित्रण केलेले होते.
इश्तार द्वाराचे काही महत्त्वाचे भाग आजही मूळ जागेवर आहेत. या द्वारच्या जतनाचे आणि पुनर्निर्मितीचे काम करताना नवीन विटांचा उपयोग केलेला आहे. वर्ल्ड मॉन्युमेंट्स फंड आणि इराकच्या राष्ट्रीय पुरातन वास्तू आणि वारसा मंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून या द्वाराच्या संवर्धनाचे काम २००९ पासून सुरू आहे. वर्ल्ड मॉन्युमेंट्स फंडच्या निर्देशानुसार इश्तार द्वाराचे संगणकीकृत रेखांकन पूर्ण केले गेले, ज्यात केवळ प्रत्येक वीटच नव्हे तर त्याची सद्यस्थिती सुद्धा नोंदवलेली आहे.
संदर्भ :
- https://www.wmf.org/videos/documentation-ishtar-gate-babylon?lang=english Accessed on July 29, 2025.
- https://smarthistory.orgAccessed on August 7,2025.
- https://madainproject.com/timeline_of_excavation_and_reconstruction_of_the_ishtar_gate Accessed on August 16, 2025.
- ‘A Wonder to Behold : Craftsmanship and the Creation of Babylon’s Ishtar Gate’, article by Clare Fitzgerald, first appeared in ISAW Newsletter 25 (Fall 2019). Accessed on August 15, 2025.
- ‘The Great Gate of Ishtar: A door to wonder’,Amanda Ruggeri, https://www.bbc.com/culture/article/20150302-ancient-babylons-greatest-wonder. Accessed on August 16, 2025.
समीक्षक : श्रृती बर्वे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.