(क्रॉस). चर्च वास्तूतील ख्रिस्ती क्रूससारखे दालन. चर्चमध्ये प्रवेशद्वारा लगतच प्रशस्त मध्य दालन नेव्ह असते, साधारणत: त्याला काटकोनात छेदणारे ट्रान्सेप्ट असते. ट्रान्सेप्ट नेव्हपेक्षा लांबीने कमी असून सहसा उत्तर दक्षिण असतात. चर्चच्या मध्यवर्ती भागात जेथे नेव्ह आणि ट्रान्सेप्टला एकमेकांना छेदतात, त्याला क्रॉसिंग म्हणतात. या मध्यवर्ती दालनाच्या चौकोनाच्या चार स्तंभावर अनेकदा उंच मनोरे किंवा शिखरांची रचना असते. क्वचित तेथे घुमट बांधलेला असतो. उदा., सेंट पॉल कॅथीड्रल, लंडन.
ट्रान्सेप्टचा जो भाग नेव्हच्या भिंतीबाहेर प्रक्षेपित असतो, त्याला ‘भुजा’ म्हणतात. लॅटिन क्रॉस चर्चमध्ये या भुजांची लांबी नेव्हपेक्षा कमी आहे, तर ग्रीक क्रॉस चर्चमधील ट्रान्सेप्टमधील भुजा, नेव्ह आणि वेदी असलेली भुजा या चारही समान लांबीच्या असतात.

ट्रान्सेप्टमुळे चर्चचा मध्यवर्ती भाग ठळकपणे उठून दिसतो. धार्मिक विधींसाठी या भागाचा उपयोग होतो, तसेच या भागात अधिक भाविकांना सामावून घेता येते. ट्रान्सेप्टमध्ये ख्रिस्ती संतांना समर्पित जागा असतात. प्रार्थनेवेळी इतर भाविक मुख्य प्रार्थनेला व्यत्यय न आणता ट्रान्सेप्टमध्ये इच्छित संतांपुढे प्रार्थना करू शकतात.

रोमनेस्क काळातील चर्चमध्ये ट्रान्सेप्ट सर्वप्रथम आढळतात. काही बॅसिलिकांमध्ये ट्रान्सेप्टच्या भुजा काटकोनी असतात. परंतु काही ठिकाणी विशेषतः जर्मनीतील चर्चमधील ट्रान्सेप्टच्या भुजा अर्धवर्तुळाकार आहेत. कधी कधी या भुजांच्या शेवटी तीन अर्धवर्तुळाकार भिंती बांधलेल्या आढळतात. काही कॅथीड्रलमध्ये मुख्य ट्रान्सेप्टच्या जोडीला आणखी एका लहान ट्रान्सेप्टची रचना केलेली आढळते, उदा., इंग्लंडमधील सॅलिसबरी कॅथीड्रल, उत्तर फ्रान्समधील आठव्या शतकातील सेंट रिक्विअर चर्च (Church of St-Riquier). रेनेसान्स आणि बरोक काळात अधिक प्रशस्त व भरपूर प्रकाश असण्यासाठी चर्चमधील ट्रान्सेप्ट आणखी प्रशस्त करून मध्यवर्ती भागात विशाल घुमट बांधण्यात आले.
संदर्भ :
- https://www.britannica.com/technology/transept
- https://www.newadvent.org/cathen/15018a.htm
- https://en.wikipedia.org/wiki/Transept
समीक्षक : श्रृती बर्वे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.