चर्च वास्तूतील शेवटच्या बाजूला गोलाकार, अर्धवर्तुळाकार किंवा बाकदार घुमट असलेला भाग. लॅटिन शब्द ॲबसीस (absis) या शब्दावरून अॅप्स (apse) शब्द तयार झाला असून त्याचा अर्थ कमान किंवा घुमटाकार असा होतो. सुरुवातीच्या काळात चर्च वास्तूमध्ये अर्धवर्तुळाकृती आरेखनातील घुमटाकृती छत मोठ्या प्रमाणावर आढळत. रोमन काळात अर्धवर्तुळाकार भिंतींनी इमारतीचा शेवटचा भाग बंदिस्त करणे अशी मूळची संकल्पा होती. त्या काळात देवालये, बॅसिलिका आणि सार्वजनिक इमारतींमध्ये या प्रकारांची रचना दिसून येते. इ. स. पू. काळातील रोमन देवालयांमध्ये अर्धवर्तुळाकृती जागेत इष्टदेवतेच्या मूर्तीची स्थापना असायची. ख्रिस्ती धर्म संकल्पनेमध्ये अर्धवर्तुळ हे एकात्मतेचे आणि ईश्वराच्या अचूकतेचे प्रतीक मानले आहे. त्याचबरोबर अर्धवर्तुळाकृती वास्तू हे स्वर्गाचे एक रूप मानले जाते.
कॉन्स्टंटीन पहिला (३०६—३३७) याच्या काळात बॅसिलिकेच्या पश्चिमेकडील भाग अर्धवर्तुळाकार होता. बायझंटिन चर्चमध्ये पूर्व दिशेला असा अर्धवर्तुळाकार भाग बांधायला सुरुवात झाली. नंतर इ.स.सहाव्या आणि सातव्या शतकात कॅथलिक चर्चच्या रोमन शाखेने या कमानदार भागाची योजना पूर्व दिशेला करायला सुरुवात केली. इथल्या भिंती संगमरवराने सुशोभित केल्या जात. छताच्या घुमटावर कुट्टिमचित्रणामध्ये (मोझेइक) देवाचे मूर्तस्वरूप दर्शविण्याची प्रथा होती.
सातव्या शतकात ख्रिस्ती प्रार्थनापद्धती आणि विधींचे स्वरूप बदलले. चर्चच्या मधल्या मुख्य भागाच्या दोहो बाजूला असलेल्या नेव्ह (nave) आणि मुख्य भागापेक्षा अरुंद असलेल्या भागाच्या (aisle) टोकाला अशा अर्धवर्तुळाकार भिंती बांधल्या जाऊ लागल्या. क्रूसच्या आकाराच्या चर्चमध्ये छेदित बाजूंच्या शेवटाला अर्धवर्तुळाकृती भिंती बांधल्या गेल्या. धर्मगुरू आधी चर्चमधील नेव्हच्या शेवटाला असलेल्या अर्धवर्तुळाकार जागेत बसायचे. पुढे ते गायनस्थळी (कॉयर) बसू लागले आणि त्यांनी वेदी (altar) या अर्धवर्तुळाकार भागात हलवली. त्यायोगे लोकांसमोर प्रवचन करणे सोपे झाले. धार्मिक विधी या वेदीवर करता येऊ लागल्या.

चर्चमध्ये वेदी अर्धगोलाकार भागात उंचीवर बांधलेली असे, याला बेमा (Bema) असे संबोधले जाई. सर्वसाधारणतः इटलीमध्ये अॅप्सचे स्वरूप साधे राहिले, परंतु रोमनेस्क काळात (इ.स. १० —१३ वे शतक) या अर्धवर्तुळाकार आराखड्याला विविध रूपे लाभली. फ्रान्समध्ये चर्चमधील वेदीभोवती प्रदक्षिणा पथ योजून या अर्धवर्तुळाकार भागाला बाहेरून विशेष सुशोभित केले गेले. प्रक्षेपित भिंती, सुशोभित छज्जे आणि तशाच सुशोभित कमानी यांनी या बाह्यरूपात वेगळी भर घातली. बायझंटिन काळात (इ.स. ३३० — १४५३) वास्तुविशारदांनी कमानी आणि घुमटाकृती छताचा वापर करून या प्रकारच्या अर्धगोलाकार वास्तू अधिक प्रचलित केल्या. वेगवेगळ्या तऱ्हेने कुट्टिमचित्रण आणि इतर सुशोभीकरणाची साधने वापरून या वास्तूंच्या सौंदर्यात आणि भव्यतेत भर घातली. उदा., इस्तंबूल येथील हागिया सोफिया.

पूर्व बायझंटिन चर्चमध्ये किमान तीन अर्धगोलाकार भिंती असलेली चर्च आढळते. कधीकधी या अर्धगोलाकार भिंतीमध्ये आणखी अर्धवर्तुळाकार भिंती बांधल्या जात. अशा अधिकच्या अर्धवर्तुळाकार भागात लहान प्रार्थनाघरे विकसित केली जाऊ लागली. उदा., इंग्लंड मधील लंडनच्या वेस्टमिन्स्टर ॲबीमध्ये (अधिकृत नाव कॉलिजिएट चर्च ऑफ सेंट पीटर) अशा प्रकारची प्रार्थनाघरे आहेत.
रोमन काळातील या वास्तूंचे रूप साधे आणि वापराला अनुरूप होते. गॉथिक काळात अशा अर्धगोलाकार भिंतीना वेगवेगळे बांधकाम साहित्य, तंत्रज्ञान आणि सुशोभीकरणाची वेगळी आकर्षक रूपे मिळाली. गॉथिक शैलीतील अशा वास्तू द्विकेंद्री टोकदार कमानी, कमानदार पट्ट्यांचे छत (Vault) आणि वास्तूच्या बाहेर स्वतंत्र उभ्या स्तंभावरून बेतलेल्या सुशोभित कमानी (Flying buttresses) यांनी सजलेल्या दिसतात. या पद्धतीच्या बांधकामामुळे वास्तू अधिक उंच बांधणे शक्य झाल्याने या वास्तू अधिक प्रकाशमान, उत्तम वायुवीजन असलेल्या आणि भव्य परंतु बोजड नसलेल्या होत्या.
संदर्भ :
- https://www.britannica.com/topic/apse-church-architecture
- https://www.numberanalytics.com/blog/evolution-of-apse-in-architecture, Sarah Lee AI generated Llama-4-Maverick-17B-128E-Instruct-FP8 July 4, 2025
- https://en.wikipedia.org/wiki/Apse
समीक्षक : श्रृती बर्वे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.