पापुअन भाषासमूहाच्या ट्रान्स न्यू गिनी या शाखेचा एक उपसमूह. अँगन भाषासमूहातील भाषा प्रामुख्याने पापुआ न्यू गिनीच्या पूर्व हायलँड्स प्रांतात बोलल्या जातात. हा प्रदेश मुख्यत्वे मोरोबे, गल्फ आणि पूर्व मध्य प्रांतांमध्ये केंद्रित आहे. या प्रदेशाला क्रातके असे नाव असल्यामुळे अँगन भाषासमूहाला ‘क्रातके भाषासमूह’ या नावाने देखील ओळखले जाते. भौगोलिकदृष्ट्या हा पर्वतीय आणि वनाच्छादित प्रदेश असल्याने येथे भाषिक वैविध्य मोठ्या प्रमाणावर आढळते.

अँगन भाषासमूहात एकूण तेरा भाषांचा समावेश होतो. यामध्ये अंगातिहा ही एक स्वतंत्र भाषा आणि कपाऊ (हम्ताई), मेन्या, याग्वोया, बरुया, सिंबारी, सॅफेयोका (अँपल), लोहिकी (अकोये), अंकावे, कमासा, कवाचा, सुसुआमी, इव्होरी या बारा भाषांच्या उपगटाचा समावेश होतो. कपाऊ ही अँगन भाषासमूहातील सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. या भाषेचे अंदाजे ४५,००० भाषक (१९९८) आहेत. प्रामुख्याने मोरोबे आणि गल्फ या प्रांतात ही भाषा बोलली जाते. कपाऊ भाषेलाच हम्ताई या नावानेही ओळखले जाते. मेन्या ही अँगन भाषासमूहातील दुसरी सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. अंदाजे २०,००० भाषक (२०००) मेन्या ही भाषा बोलतात. तसेच  बरुया भाषेचे साधारण ६,६०० भाषक (१९९०) असल्याची नोंद आढळते. कवाचा, अंकावे, लोहिकी या भाषांचे भाषक अगदीच नगण्य आहेत. यामुळे या समूहातील काही भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

अँगन भाषासमूहाच्या ऐतिहासिक स्थित्यंतराचे तीन प्रमुख टप्पे मानण्यात येतात. यूरोपीय संपर्कपूर्व काळात, भौगोलिक अलगीकरण आणि स्थलांतरामुळे मूळ प्रोटो-अँगन भाषेतून कपाऊ, मेन्या, बरुया यांसारख्या स्वतंत्र भाषा विकसित झाल्या. या टप्प्यात प्रत्येक अँगन भाषेची स्वतःची स्वतंत्र भाषिक ओळख आणि व्याकरण रचना तयार झाली. अँगन भाषा कुटुंबातील सर्व भाषांचे विचलन आणि वर्गीकरण हा प्राथमिक टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यात, यूरोपीय वसाहतवाद आणि आधुनिक प्रशासनाच्या आगमनामुळे अँगन भाषांचा बाह्य संपर्क वाढला. पापुआ न्यू गिनीची संपर्क भाषा म्हणून टोक पिसिन (Tok Pisin) या भाषेचा उदय झाला. तसेच इंग्लिश ही शिक्षण आणि शासन व्यवहाराची भाषा बनली. त्यामुळे अँगन भाषिक लोकांमध्ये द्विभाषिकता (Bilingualism) वाढली आणि स्थानिक अँगन भाषांचा वापर मर्यादित झाला. टोक पिसिनने आंतर-जमाती संवाद आणि व्यापाराचे माध्यम म्हणून स्थानिक भाषांवर प्रभाव टाकण्यास सुरुवात केली, ज्यामुळे अँगन भाषेची व्याप्ती कमी झाली. समकालीन तिसऱ्या टप्प्यात अँगन भाषांचे भाषिक विस्थापन (Language Displacement) आणि विलुप्त होण्याचे आव्हान अधिक गंभीर झाले. शिक्षण, शहरीकरण आणि नोकरीच्या संधींसाठी तरुण पिढी टोक पिसिन आणि इंग्रजीला प्राधान्य देत आहे. यामुळे अनेक कुटुंबांमध्ये भाषेचे हस्तांतरण (Transmission) थांबले आहे. परिणामी, कमासा आणि सुसुआमी या भाषा अत्यंत लुप्तोन्मुख (Critically Endangered) स्थितीत पोहोचल्या आहेत.

बहुतेक अँगन भाषांमध्ये इ, ए, अ, ओ आणि उ पाच स्वर आढळतात. काही भाषांमध्ये /ɨ/ हा मध्य उच्च स्वर किंवा दुहेरी स्वरदेखील वापरले जातात. व्यंजनांची संख्या भाषेनुसार बदलते. काही भाषांमध्ये कंठद्वारीय स्पर्श व्यंजने (Glottal stop) देखील आढळतात. बरुया व सिंबारी भाषांमध्ये व्यंजनांची संख्या इतरांपेक्षा जास्त आहे. तर लोहिकी भाषेत व्यंजनयुग्मे (Gemination) आढळतात. अँगन भाषांच्या शब्दरचनेत विविध प्रकारचे प्रत्यय आढळतात. नाम व क्रियापदे यांची रचना त्या प्रत्ययांवर आधारित असते. याग्वोआ भाषेत प्राणी व मानवांना लिंगानुसार वेगवेगळे चिन्ह जोडले जाते. संख्यांमध्ये प्रामुख्याने एकवचन आणि अनेकवचन असून काही भाषांमध्ये द्विवचन ही संकल्पनाही आहे. अँगन भाषांमध्ये काळ आणि क्रियाव्याप्ती या दोन्ही संकल्पनांकरता स्वतंत्र प्रत्यय असल्यामुळे क्रियापदव्यवस्था अत्यंत जटिल आहे. मेन्या भाषेतील खालील उदाहरणावरून हे स्पष्ट होते.

मेन्या भाषेतील क्रियापदाची रूपे :

रूप अर्थ उपसर्ग प्रत्यय इतर माहिती
ka-neme-a तो आला ka- (कर्ता) -a (भूतकाळ) एकवचन, पुरुष
ka-neme-e तो येईल ka- (कर्ता) -e (भविष्यकाळ) एकवचन, पुरुष
ka-neme-te तो येईल ka- (कर्ता) -te (अवास्तव) एकवचन, पुरुष
ka-neme-ete तो आला होता ka- (कर्ता) -ete (अवास्तव भूतकाळ) एकवचन, पुरुष

 

वरील तक्त्यात, ‘ka-‘ हा कर्त्याचा उपसर्ग आहे, ‘-a’ हा भूतकाळाचा प्रत्यय आहे, ‘-e’ हा भविष्यकाळाचा प्रत्यय आहे, ‘-te’ हा अवास्तव (irrealis) प्रत्यय आहे आणि ‘-ete’ हा अवास्तव भूतकाळाचा प्रत्यय आहे. या सर्व घटकांचा वापर क्रियापदाच्या रूपांमध्ये केला जातो. यामुळे क्रियापद प्रणाली अत्यंत समृद्ध आणि गुंतागुंतीची बनते.

अँगन भाषांमध्ये कर्ता–कर्म–क्रियापद हा मुख्य वाक्यक्रम आहे. या भाषांची शब्दसंपदा समाजाच्या दैनंदिन जीवनाशी व सांस्कृतिक प्रथांशी घट्टपणे जोडलेली आहे. डोंगर, जंगल, नद्या, पिके यांसारख्या निसर्ग आणि पर्यावरणवाचक संकल्पनांसाठी शब्दवैविध्य अधिक प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे नातेसंबंधासाठी शब्दसंपदा खूप तपशीलवार आहे. वडील, आई, मामा, आत्या, भावंडे यांच्यासाठी वेगवेगळे शब्द वापरले जातात. अनेकदा आईच्या बाजूचे नाते आणि वडिलांच्या बाजूचे नाते वेगळ्या शब्दांनी दर्शवले जाते. भौगोलिकदृष्ट्या जवळच्या प्रदेशातील ऑस्ट्रोनेशियन व एलेमन भाषांमधून अँगन भाषांनी काही शब्द स्वीकारले आहेत. आधुनिक काळात इंग्रजी व टोक पिसिन या संपर्कभाषांमधून नवे शब्द आले आहेत.

अँगन भाषांपैकी कपाऊ, सॅफेयोका, बरुया, अंगातिहा या भाषांवर विपुल संशोधन साहित्य उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मेन्या, याग्वोआ आणि सिंबारी या भाषांसंदर्भात संशोधन झाले आहे. अंकावे, इव्होरी, लोहिकी, कवाचा आणि कमासा या भाषांच्या शब्दयाद्या उपलब्ध आहेत. कपाऊ भाषेतील ध्वनिविचार, क्रियापद संरचना आणि वाक्यरचना याविषयी सविस्तर साहित्य उपलब्ध आहे. कपाऊच्या तुलनेत इतर अँगन भाषांचे लिखित व संशोधन साहित्य कमी प्रमाणात आहे. अँगन भाषांच्या लिखित परंपरेचा विकास अत्यंत अलीकडच्या काळातील आहे. पारंपरिक साहित्यामध्ये मौखिक साहित्य, गाणी आणि पौराणिक कथा यांचा समावेश होतो. आधुनिक लिखित साहित्यामध्ये शैक्षणिक साहित्य, व्याकरण कोश आणि भाषांतरीत साहित्य यांचा समावेश होतो.

 

संदर्भ :

  • Healey, A. & Lloyd, J. The Angan Language Family, The Linguistic Situation in the Gulf District and Adjacent Areas, Papua New Guinea, (Karl Franklin, Ed.) Pacific Linguistics at the Australian National University, Canberra, 1973.
  • Lloyd, Richard and Lloyd, Joy, The dialects of the Baruya language, Language Data, Asian-Pacific Series 12, Healey, Phyllis M.(E), 1981.
  • Mimica, Jadran, Of Humans, Pigs, and Souls: An Essay on the Yagwoia Womba Complex, HauBooks, Chicago, 2020.
  • Whitehead, Carl, A reference grammar of Menya, an Angan language of Papua New Guinea, University of Manitoba, Winnipeg, Manitoba, 2004. (Ph.D. thesis)
  • Whitney, Henry, and Whitney, Virginia, Akoye Phonology Essentials, Summer Institute of Linguistics, 2000.
  • https://asjp.clld.org/ Date: 17/11/2025.
  • https://www.ethnologue.com/ Date: 17/11/2025.
  • https://www.sil.org/resources/archives/22658 Date: 17/11/2025.

समीक्षक : रेणुका ओझरकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.