डग्लस, फ्रेडरिक : (फेब्रुवारी १८१८ ? -२० फेब्रुवारी १८९५). मानवी हक्कांसाठी लढणारा प्रसिद्ध आफ्रिकन अमेरिकन नेता, गुलामगिरी विरोधात झालेल्या दास्यमुक्ती आंदोलनातील एक अग्रणी सुधारक आणि लेखक. मूळ नाव फ्रेडरिक ऑगस्टस वॉशिंग्टन बेली. जन्म टॅलबोट काउंटी (मेरिलंड) येथे झाला. त्याची आई हॅरिएट बेली मूळ अमेरिकन वंशाची तर वडील आफ्रिकन व यूरोपियन वंशाचे होते. त्याचे प्रारंभीचे आयुष्य गुलामगिरीतच गेले. पुढे ॲना मरे या कृष्णवर्णीय तरुणीशी त्याचा विवाह झाला आणि ते मॅसेच्युसेट्सच्या न्यू बेडफोर्डमध्ये स्थायिक झाले.

डग्लस १८३८ नंतर गुलामगिरी विरोधी चळवळीत सामील झाला. ‘द लिबरेटर’ या दास्यमुक्ती समर्थक वृत्तपत्राचे संपादक विल्यम लॉइड गॅरिसन यांच्या विचारांनी प्रभावित होऊन तो त्यांच्या ‘अमेरिकन अँटी स्लेव्हरी सोसायटी’शी जोडला गेला. अमेरिकेत दक्षिण भागातून ज्यांना गुलामगिरीतून मुक्त होण्याची इच्छा होती अशांना उत्तरेत पळवून नेण्यासाठी ज्या अनेक संघटना व व्यक्तींनी आपला जीव धोक्यात घालून कार्य केले त्यात डग्लसही होता.
अमेरिकन यादवीच्या दरम्यान डग्लसने गुलामगिरी प्रथा नष्ट करण्याची, तसेच कृष्णवर्णीय लोकांसाठी मताधिकाराची मागणी केली. यानंतर गुलामगिरी मुक्ततेचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यावर तो समानता आणि मानवी हक्कांच्या प्रसारासाठी अखेरपर्यंत काम करत राहिला. पुढे डग्लस अब्राहम लिंकन यांचा सल्लागार बनला. गुलामगिरीतून मुक्त झालेल्यांनी उत्तरेसाठी शस्त्र हाती घ्यावे व गुलामगिरी विरुद्धच्या संघर्षात प्रत्यक्ष भाग घ्यावा अशी भूमिका त्याने मांडली. यादवीनंतरच्या पुनर्बांधणीच्या कालखंडात डग्लसची डोमिनिकन प्रजासत्ताक येथे राजदूत म्हणून नेमणूक झाली. तसेच तो फ्रीडमॅन सेव्हिंग बँकेचा अध्यक्ष म्हणून नियुक्त झाला. अशा पदांवर नेमणूक केलेला तो पहिला अमेरिकन कृष्णवर्णीय होता. १८७१ साली सेंटो डोमिंगो कमिशनचा सहायक सचिव म्हणून त्याने काम पहिले. अध्यक्ष बेंजामिन हॅरिसन (१८३३-१९०१) यांच्या काळात डग्लसची हैती गणराज्यात निवासी मंत्री म्हणून नेमणूक झाली.
डग्लसने तीन आत्मचरित्रे लिहिली. ‘नॅरटिव्ह ऑफ द लाइफ ऑफ फ्रेडरिक डग्लस, ॲन अमेरिकन स्लेव्ह’ (१८४५) या आत्मकथनात त्याने गुलाम म्हणून मेरिलंडमधील आपल्या अनुभवांचे वर्णन केले. गुलामगिरीचे वर्णन करणारे ते अव्वल दर्जाचे आफ्रिकन अमेरिकन साहित्य मानले जाते. पुढे ‘माय बाँडिज अँड माय फ्रीडम’ (१८५५) व ‘लाइफ अँड टाइम्स ऑफ फ्रेडरिक डग्लस’ (१८८१) अशा त्याच्या आत्मचरित्राच्या पुढील विस्तारित आवृत्त्या निघाल्या.
डग्लसने आयर्लंड आणि ग्रेट ब्रिटनमध्ये दोन वर्षे घालवली. येथे आपल्या लेखणीने आणि असामान्य वक्तृत्वाने त्याने कृष्णवर्णीयांबद्दल तेथील जनतेत सहानुभूती निर्माण केली. यामुळे फार मोठे जनमत जागृत होऊन दास्यमुक्तीसाठी झटणाऱ्या अनेक नेत्यांचा त्याला पाठिंबा मिळाला. अमेरिकेत परतल्यावर डग्लसने गुलामगिरी नष्ट करण्यासाठी ‘नॉर्थ स्टार’ हे वृत्तपत्र सुरू केले (१८४७-५१). पुढे हे वृत्तपत्र आणि गेरिट स्मिथचे ‘लिबर्टी पार्टी’ एकत्र करून ‘फ्रेडरिक डग्लस पेपर’ हे नवे वृत्तपत्र सुरू केले (१८५१).
डग्लस हा न्यूयॉर्कमधील पहिल्या महिला अधिकार परिषदेत (सेनेका फॉल्स कन्व्हेन्शन, १८४८) सहभागी होणारा एकमेव आफ्रिकन अमेरिकन होता. स्त्रियांच्या सार्वजनिक क्षेत्रातील सहभागाविषयी, त्यांच्या हक्कांविषयी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविषयी त्याची मते अत्यंत सुधारणावादी व रोखठोक होती. सेनेका परिषदेनंतर डग्लस स्त्री-हक्क चळवळीचा समर्थक म्हणून ओळखला जाऊ लागला. डग्लसने प्रारंभी अमेरिकेतील महिला हक्क चळवळीतील प्रमुख नेत्या एलिझाबेथ कॅडी स्टँटन (१८१५-१९०२) आणि सुसान बी. अँथनी (१८२०-१९०६) यांच्याशी साहचर्य ठेवून स्त्रियांच्या हक्कांच्या समर्थनाची भूमिका घेतली; तथापि पुढे राजकीय मर्यादांमुळे सार्वत्रिक मताधिकार शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने कृष्णवर्णीय पुरुषांच्या मताधिकाराला पाठिंबा दिला. यामुळे उभय नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले. १८७० च्या पंधराव्या घटनादुरुस्तीने अमेरिकन संविधानात वंश, रंग किंवा पूर्वीच्या गुलामगिरीच्या आधारे कोणालाही मताधिकार नाकारणे निषिद्ध ठरवले गेले. या तरतुदीच्या आधारे आफ्रिकन-अमेरिकनांनी दक्षिणेत मतदार शक्ती एकत्रित करून प्रभाव निर्माण करावा अशी डग्लसची अपेक्षा होती. त्याने स्वातंत्र्य व समानतेच्या संघर्षात शिक्षण आणि साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करत सर्व मुलांसाठी शाळा खुल्या करण्यासाठी जागृती केली.
रोचेस्टर (न्यूयॉर्क) येथील घर एका आगीत नष्ट झाल्यानंतर डग्लसने वॉशिंग्टन डी. सी. येथे स्थलांतर केले (१८७२). तेथे त्याने ‘न्यू नॅशनल इरा’ हे वृत्तपत्र सुरू केले, मात्र आर्थिक कारणांमुळे ते बंद पडले (१८७४). डग्लस आणि ॲना यांना एकूण पाच मुले झाली. चार्ल्स आणि रॉसेट या त्याच्या मुलांनी ‘द नॉर्थ स्टार’ या वृत्तपत्राच्या निर्मितीत मदत केली. ॲनाच्या मृत्यूनंतर (१८८२) डग्लसने हेलन पिट्स या स्त्रीवादी चळवळीत कार्य करणाऱ्या श्वेत महिलेशी विवाह केला (१८८४).
वॉशिंग्टन, डी. सी येथे त्याचे निधन झाले.
संदर्भ :
- Blight, David, Frederick Douglass: Prophet of Freedom, Simon & Schuster, New York, 2018.
- Douglass, Frederick, My Bondage and My Freedom, Miller, Orton & Mulligan, New York, 1855.
- Douglass, Frederick, Narrative of the Life of Frederick Douglass, An American Slave, Boston, 1845.
- Reynolds, David, America, Empire of Liberty: A New History, Penguin Books, London, 2009.
समीक्षक : श्रद्धा कुंभोजकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.